साहित्य हे समाज बदलास चालना देणारं असावं -जेष्ठ कवी व लेखक राजाभाऊ शिरगुप्पे

44

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.5एप्रिल):-साहित्याने नेहमी समाज ढवळून काढला पाहिले. आज कल्पनेच्या जगात रमवणारे साहित्य काही कामाचे नाही. कारण, आजचा काळ हा पुन्हा एकदा लढा देण्याचा आहे. असे प्रतिपादन जेष्ठ लेखक राजाभाऊ शिरगुप्पे यांनी व्यक्त केले. ते कवी व समीक्षक मा. वसंत भागवत, संपादित व लिखित विद्रोही कविता आणि खदखद या दोन कवितासंग्रहांच्या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलत होते.

रविवार दि. 4 एप्रिल, 2021 रोजी दुपारी 12:30 वा. निर्मिती प्रकाशनच्या आदित्य सभागृह येथे हा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. यावेळी बोलताना राजाभाऊ म्हणाले, समानतेचं स्वप्न आम्ही गेली कित्येक वर्षे पाहत आहोत. ती स्वप्ने पुर्ण होण्यासाठी लेखक, कवींची गरज आहे. ज्योतीचा वणवा व्हायचा असेल तर साहित्याने हा समाज ढवळून काढला पाहिले. म्हणून या वळणावर साहित्यिकांची मोठी गरज आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना, तळमावले येथील प्रसिद्ध कवी उध्दव पाटील म्हणाले, या जगात विद्रोहातुनच क्रांती घडली आहे. महामानवांचे विचार तिची उर्जा आपल्याला देतात. ज्यातुन वैचारिक उठाव होतो व समाज बदलाची एक नवी दिशा निर्माण होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन बोलताना प्रा. डाॅ. अमर कांबळे म्हणाले, साहित्यिक चळवळीत आज नवनवीन माणसे आम्हाला जोडली जात आहेत. सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय झुंडशाहीला विरोध करणारे कवी आज लिहतात ही बाब आमच्यासाठी आनंददायी आहे. कारण, त्यामुळे आशावाद वाढला जाईल व विद्रोहाचा रथ अधिक जोमाने पुढे नेला जाईल. यावेळी प्रा. डाॅ. कपिल राजहंस यांना ऑस्ट्रेलिया विद्यापीठाकडून डी. लिट पदवी मिळाली, त्याबद्दल निर्मिती प्रकाशनकडुन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रकाशन समारंभास ऍड.अधिक चाळके, चंद्रकांत सावंत, प्रदिप पाटील, प्रा. अजित सग्रे, मंदार पाटील, पंकज खोत, वैभव कांबळे, गंगाधर म्हमाने, विजय कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. निर्मिती प्रकाशनचे अनिल म्हमाने यांनी प्रास्ताविक केले. संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका प्रा. डाॅ. शोभा चाळके यांनी निवेदन केले तर आभार शांतीलाल कांबळे यांनी मानले.