व्यापारी, दुकानदारांच्या लसीकरणाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे निर्देश

26

✒️अकोला(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अकोला(दि.6एप्रिल):- कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधाबाबत उपाययोजनांची अंमलबजावणी करत असतांना जे लोक अधिक लोकांच्या संपर्कात येतात अशा व्यापारी, दुकानदार, दुध- भाजीपाला विक्रेतेइ. चे लसीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. त्यासाठी जिल्ह्याच्या एक ॲक्शन प्लॅन तयार करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे जिल्हा प्रशासनाला दिले.

पालकमंत्री ना. कडू यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन भवनात छत्रपती सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील कोविड संदर्भातील अद्यावत स्थिती सादर करण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्या करणे, ४५ वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण, त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी ना. कडू म्हणाले की, जिल्ह्यात ज्या ज्या व्यक्ती एका पेक्षा अनेक व्यक्तिंच्या संपर्कात येतात. तसेच जे ४५ वर्षांच्या वयावरील आहेत. अशा लोकांचे लसीकरण करावे. त्यासाठी व्यापारी, दुकानदार, भाजीपाला विक्रेते अशा समुह घटकांची निवड करावी. जिल्ह्यात येत्या काळात या लोकांचे लसीकरण करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करावा. मास्क न वापरणारे तसेच गर्दी करणाऱ्या वा त्यास जबाबदार लोकांवर कारवाई करा. जोखमीच्या व अतिजोखमीच्या व्यक्तिंच्या चाचण्या व पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्यांवर भर द्यावा,असेही निर्देश ना. कडू यांनी दिले. तसेच कोरोना मुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिंची उत्पन्न गट निहाय यादी करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.