प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देणे हे शासनाचे प्राधान्य – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

अमरावती(दि.6एप्रिल):- आवास योजनेतील प्रत्येक बाब जलद पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मिशनमोडवर कामे होत आहेत. त्यामुळे हजारो घरकुलांच्या कामांना गती मिळेल व नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल.
– जिल्हाधिकारी शैलेश नवाल

आवास योजनेतून गरीबांना हक्काचा निवारा
दस्त नोंदणीसाठी जिल्ह्यातील ‘एसडीओं’कडून तीन दिवसांची विशेष मोहिम ग्रामीण भागातील साडेनऊ हजार घरे नियमानुकुल

गोरगरीबांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून ‘सर्वांसाठी घरे’ योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अतिक्रमणधारकांची सुमारे साडेनऊ हजार प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. उपविभागीय अधिका-यांनी तीन दिवसांची विशेष मोहिम राबवून अनेक दस्त नोंदणी प्रकरणांचाही निपटारा केला. अतिक्रमणधारकांचे घरकुलांचे प्रस्ताव मंजूर झाल्याने त्यांचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

आवास योजनांच्या उद्दिष्टानुसार घरकुलांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून गरजूंना घर मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे सुस्पष्ट निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व उपविभागीय अधिका-यांना घरकुल मंजुरीची प्रक्रिया गतीने राबविण्याच्या सुस्पष्ट सूचना दिल्या. त्यानुसार तीन दिवसांत मोहिमेद्वारे अनेक प्रकरणांचा निपटारा झाला. त्यामुळे 9 हजार 493 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे.

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही बँका सुरु होत्या

उपविभागीय अधिका-यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून अतिक्रमणधारक लाभार्थ्यांचे घरकुल प्रस्ताव मंजूर करण्यात येतात. त्यानुसार 26 मार्च ते 28 मार्चदरम्यान मोहिम राबवण्यात आली. ज्या लाभार्थ्यांकडे जागा उपलब्ध नाही, अशा लाभार्थ्यांना बक्षीसपत्राद्वारे जागा उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया गतीने राबवली गेली. एकूण 492 लाभार्थ्यांना बक्षीसपत्राद्वारे जमीनीचा लाभ मिळून त्यांचा जागेचा प्रश्न निकाली निघाला. त्यासाठी 27 व 28 मार्चला सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये, तालुका मुख्यालयाच्या राष्ट्रीयकृत बँका सुरु ठेवण्यात आल्या.
अमरावती उपविभागात गावठाण, ई क्लास, एफ क्लास व इतर शासकीय मिळून 37 गावांतील एकूण 969 प्रकरणे नियमानुकुल करण्यात आली आहेत.

तिवसा- भातकुली उपविभागात गावठाण, ई क्लास, एफ क्लास व इतर शासकीय मिळून 18 गावांतील एकूण 299 प्रकरणे नियमानुकुल करण्यात आली आहेत. चांदूर रेल्वे उपविभागात गावठाण, ई क्लास, एफ क्लास व इतर शासकीय मिळून 35 गावांतील एकूण 3 हजार 398 प्रकरणे नियमानुकुल करण्यात आली आहेत. अचलपूर उपविभागात गावठाण, ई क्लास, एफ क्लास व इतर शासकीय मिळून 101 गावांतील एकूण 2 हजार 709 प्रकरणे नियमानुकुल करण्यात आली आहेत. दर्यापूर उपविभागात 52 गावांतील 709, मोर्शी उपविभागातील 102 गावांतील 1 हजार 315 व धारणी उपविभागातील 11 गावांतील 94 प्रकरणे नियमानुकुल करण्यात आली, अशी माहिती भूसंपादन उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले यांनी दिली. त्याचबरोबर, दस्तनोंदणीच्या 942 प्रकरणांचाही निपटारा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अमरावती, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED