भाजपाच्या ताब्यातील बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राष्ट्रवादी काँग्रेस ने लावली पळवून

33

🔹बीड जिल्हा बँकेवर प्रशासक आणण्याची मुंढे, पंडित यांची खेळी यशस्वी

🔸भाजपसह माजी मंत्री पंकजा मुंढे यांना मोठा धक्का

✒️अतुल उनवणे(विशेष प्रतिनिधी)मो:-9881292081

बीड(दि.8एप्रिल):-पालकमंत्री धनंजय मुंडे यांची राजकीय ताकद आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांचे सहकारातले डावपेच असे समिकरण जुळवत खेळलेली खेळी यशस्वी झाली. भाजपच्या ताब्यात असलेल्या बीड जिल्हा बँकेवर अखेर प्रशासक मंडळाची नेमणूक झाली.

लातूरचे विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांनी याबाबत बुधवारी काढलेल्या आदेशात पाच सदस्यीय प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी औरंगाबाद विभागाचे अपर आयुक्त अविनाश पाठक आहेत. तर, शिखर बँकेचे माजी व्यवस्थापकिय संचालक प्रमोद कर्नाड, सनदी लेखापाल जनार्दन रणदिवे, सहाय्यक निबंधक अशोक कदम आणि अशोक कवडे यांचा प्रशासक मंडळात सदस्य म्हणून समावेश आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालकांच्या निवडीसाठी निवडणुक जाहीर झाली. मात्र, सेवा सोसायटी मतदार संघातील ११ जागांसाठीचे सर्वच उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने उर्वरित सात मतदार संघातील आठ जागांसाठी निवडणुक झाली. २० मार्चला मतदारानंतर २१ मार्चला मतमोजणी झाली. यात कल्याण आखाडे, भाऊसाहेब नाटकर, राजकिशोर मोदी, अमोल आंधळे, रविंद्र दळवी, सुर्यभान मुंडे, सुशिला पवार, कल्पना शेळके यांचा समावेश आहे.

दरम्यान, कोरम पूर्ण होण्यासाठी किमान १३ संचालकांची गरज होती. मात्र, आठच संचालक असल्याने कोरम पूर्ण होत नसल्याचा अहवाल निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी सहकार प्राधिकरणाला कळवला होता. त्यामुळे प्रशासक मंडळाची नेमणूक होणार हे निश्चितच होते. त्यानुसार अखेर बुधवारी वरिल पाच जणांच्या प्रशासक मंडळाची नेमणूक झाली.

*मक्तेदारी मोडीत काढली..*

जिल्हा बँकेवर अनेक वर्षांपासून भाजपचे वर्चस्व होते. अनेक वेळा विविध पक्षांची आघाडी असली तरी वर्चस्व भाजपचेच असे. मागच्या वेळीही भाजपचीच बँकेवर सत्ता होती. दरम्यान, सेवा सोसायटीच्या ११ पैकी सात ते आठ मतदार संघावर भाजपचेच वर्चस्व असे आणि उर्वरित सात मतदार संघातील आठ जागांमध्येही भाजपच बाजी मारायचा.

बँकेतील सत्तेच्या जोरावर भाजपमधील काही मंडळींनी अनेक कागदावरील संस्था आणि व्यक्तींचा मतदार यादीत समावेश केलेला आहे. प्रशासकांची नेमणूक करुन अवसायनातील पण भाजपच्या मर्जीतल्या संस्था मतदार यादीतून बाहेर काढत भाजपची मक्तेदारी मोडीत काढण्याची राष्ट्रवादीची खेळी आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीने सुरुवातीपासून टाकलेले डाव यशस्वी झाले आणि अखेर प्रशासकांची नेमणूक झाली.