त्रिपिटकाचार्य : बौद्ध धम्म अभ्यासक !

(महाबोधी राहुल सांकृत्यायन जन्म दिन व स्मृती दिन)

जागतिक कीर्तीचे भारतीय महापंडित, लेखक तसेच बौद्ध धर्माच्या अभ्यासामुळे ‘त्रिपिटकाचार्य’ या गौरवाने सन्मानित झालेले राहुल सांकृत्यायन यांचा जन्म दि.९ एप्रिल १८९३ रोजी झाला. लहानपणापासून विरक्त वृत्तीचे असल्याने साधू बनण्यासाठी ते काशी येथे गेले. तेथे त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला. या काळात ते आर्य समाजाकडे वळले. नि:स्वार्थी वृत्तीच्या हिंदू मिशनऱ्यांची संघटना उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सन १९१७ मध्ये रशियात झालेल्या क्रांतीने ते प्रभावित झाले.
त्यांचा जन्म उत्तर प्रदेशात जि.आझमगढ कनैला या गावी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे मूळनाव केदारनाथ पांडे. त्यांची माता कुलवंती पिता गोवर्धन हे होत. बौद्ध धम्माची दिक्षा घेतल्यानंतर केदारनाथांनी राहुल हे नाव धारण केले व सांकृत्य हे त्यांचे गोत्र असल्याने ते राहुल सांकृत्यायन या नावाने प्रख्यात झाले. वयाच्या पंधराव्या वर्षी उर्दू मिडल स्कूलची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते घरातून पळून गेले.

वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांचा विवाह झाला होता. पण हा अजाणतेपणी झालेला विवाह म्हणून त्यांनी त्याचे बंधन पाळले नाही. अठराव्या वर्षी ते वाराणसीला गेले व तेथे त्यांनी संस्कृत आणि भारतीय तत्त्वज्ञानाचे अध्ययन केले. त्यांना केवळ विद्वत्ता नको होती, तर साधू व्हायचे होते. त्यांची विरक्ती पाहून छप्रा गावच्या एका महंताने त्यांना वैष्णव धर्माची दीक्षा देऊन त्यांचे पंथीय नाव रामोदार साधू असे ठेवले होते. काही काळ तेथील मठपती म्हणूनही त्यांनी काम पाहिले. नंतर ते छाप्रा गाव सोडून दक्षिण भारताच्या तीर्थयात्रेस गेले.त्यांनी सबंध भारताचा प्रवास केला. त्यांच्या वृत्तीत स्वतःस झोकून देण्याची उत्कटता होती. एकदा मनाने घेतलेल्या गोष्टींकडे ते उत्कटपणे धाव घेत व तिचा संपूर्ण व सखोल वेध घेत.

दक्षिण भारताची तीर्थयात्रा सोडून ते अयोध्येस आले व त्यांनी संस्कृत पाठशाळेत वेदान्ताचा सखोल अभ्यास केला. तेथेच ते आर्यसमाजाकडे आकृष्ट झाले व त्यांनी दयानंदांच्या सत्यार्थ प्रकाशाचे सखोल अध्ययन केले. आर्यसमाजाच्या विचारांचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला. अयोध्येहून ते आग्र्यास गेले व तेथील आर्यसमाजाच्या विद्यालयात दाखल झाले. ख्रिस्ती व इस्लाम धर्मीय आपल्या धर्मप्रसारासाठी आटोकाट प्रयत्नच करतात व हिंदूंवर आघात करतात. म्हणून त्यांनी विरक्त, विद्वान व संघटनाकुशल अशा हिंदू तरूणांची मिशनरी वृत्तीने काम करणारी संघटना उभारण्याचा प्रयत्नही केला. रशियात सन १९१७ मध्ये झालेल्या क्रांतीने ते प्रभावित झाले आणि क्रांतीकडे व साम्यवादाकडे आकृष्ट झाले. त्यांनी साम्यवादी तत्त्वज्ञान सखोलपणे अभ्यासिले. बाइसवी सदी – सन १९३३ हा त्यांचा ग्रंथ याचेच फलित. मार्क्सवादावर त्यांनी बरेच लेखन करून त्याचा प्रचारही केला.

साम्यवाद ही क्यो? – सन १९३४, सोविएत न्याय – सन १९३९, मानव समाज – सन १९४२, आजकी समस्याएँ – सन १९४४, आजकी राजनीति – सन १९४९ आदी हे त्यांचे राजनीतीवरील उल्लेखनीय ग्रंथ होत. नंतर ते बौद्ध धम्माकडे आकृष्ट झाले. त्यांनी पाली भाषा-साहित्याचे व बौद्ध धर्म-तत्त्वज्ञानाचे सखोल अध्ययन केले. लखनौ येथील बोधानंद भिक्खू यांच्याशी परिचय झाल्यावर त्यांनी त्यांच्यासमवेत अनेक बौद्ध तीर्थक्षेत्रांची यात्रा केली. त्यांना यात्रेत परदेशी भिक्खूही भेटले. भारताबाहेरही बौद्ध धम्माचा प्रसार बराच आहे, असे समजल्यावर त्यांनी त्या त्या देशांच्या भाषा व लिपी यांचा अभ्यास केला. उर्दू, हिंदी, संस्कृत-प्राकृत, पाली-अपभ्रंश, इंग्रजी, अरबी, फार्सी, फ्रेंच, तमिळ, कन्नड, चिनी, तिबेटी, जपानी, रशियन, आदी भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते.

बौद्ध धम्माकडे ते अधिकाधिक आकृष्ट झाले आणि त्यांनी श्रीलंकेत जाऊन सन १९३०मध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. साम्यवाद व बौद्ध धम्म-तत्त्वज्ञान या दोहोंच्या समन्वयाने त्यांचे विचार समतोल व अधिक तेजस्वी बनले. सनातन धर्माकडून आर्यसमाजाकडे तेथून साम्यवादाकडे तेथून बौद्ध धम्माकडे व शेवटी मानव धर्माकडे असा त्यांचा वैचारिक प्रवास झाला. नंतर सन १९२७मध्ये ते बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी संस्कृतचे अध्यापक म्हणून श्रीलंकेत गेले. नंतर ते अधिक सखोल अध्ययनासाठी नेपाळमार्गे तिबेटात ल्हासा येथे गेले. तिबेटमधून ते पुन्हा श्रीलंकेत गेले. नंतर बौद्ध धर्मप्रचारासाठी ते लंडन येथे व तेथून यूरोपात गेले. यूरोपात ते अंदाजे तीन महिने होते. सन १९३३मध्ये ते पुन्हा युरोपातून श्रीलंकेत गेले व तेथून भारतात परतले. तेथून पुन्हा दुसऱ्यांदा जमू-काश्मीरमार्गे लडाख येथे गेले. या प्रवासात त्यांनी सुत्तपिटकातील प्रख्यात ग्रंथ मज्झिमनिकायचा हिंदीत अनुवाद केला.

नंतर त्यांनी पुढे धम्मपद, विनयपिटक, दीघनिकाय यांचे हिंदीत अनुवाद केले. तसेच आनंद कौशल्यायन व जगदीश काश्यप यांच्या सहकार्याने खुद्दकनिकायचे अकरा ग्रंथ देवनागरीत आणले. त्यांनी बुद्धचर्या, महामानव बुद्ध हे तथागत भगवान गौतम बुद्धाचे चरित्र असलेले ग्रंथ हिंदीत लिहिले. साम्यवाद ही क्यों? मानवसमाज व राजनीती हे ग्रंथही त्यांनी लिहिले. ते बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी नेपाळ, तिबेट, म्यानमार, जपान, कोरिया अगदी युरोपही पालथा घातला. रशियात काही काळ प्राध्यापक म्हणून काम केले. तेथे एलेना या स्त्रीशी त्यांनी विवाह केला. साम्यवाद व बौद्ध तत्त्वज्ञान या दोघांची सांगड घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. धर्म, तत्त्वज्ञान, राजनीती, इतिहास, पुराण, प्राच्यविद्या, व्याकरण, विज्ञान, चरित्र, आत्मचरित्र, निबंध, नाटक आदी विषयांवर त्यांनी दीडशेच्यावर ग्रंथ लिहिले.

‘विस्मृति के गर्भ में’ ही महापंडित राहुल सांकृत्यायन यांनी सन १९२३ साली लिहिलेली कादंबरी. प्रो.विद्याव्रत, धनदास, धीरेन्द्र आणि चाङ् यांच्यासोबत मितनी हर्पी या साम्राज्याची त्यांनी केलेली यात्रा, इजिप्त साम्राज्यातील अनेक नावांची, शहरांची ओळख करुन देणारी व इतिहासातील एका संस्कृतीचा भाग प्रकाशात आणणारी ही वेगळ्या धाटणीची कादंबरी आहे. मितनी हर्पी साम्राज्याच्या राजकुमारीचा तिच्या बलाढ्य सेनापतीसोबतचा अस्तित्वाचा लढा, थेबिसच्या राजकुमाराची कबर आणि कबरीत लपवलेले अनमोल रत्न, जवाहिरे, चित्रलिपीच्या संशोधकाने उत्सुकतेपोटी व जगासमोर प्राचीन इतिहास शोधण्यासाठी केलेली धडपड, त्यातील विजयी व उकल यांचे दर्शन घडविणारी कादंबरी आहे. वैदिक हिंदू धर्म, आर्यसमाज, साम्यवाद, बौद्ध धर्म आणि शेवटी मानवता हाच धर्म असा सांकृत्यायन यांचा व्यापक वैचारिक प्रवास आहे. हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, सन्मानित डॉक्टरेट, पद्मभूषण आदी मानसन्मान राहुल सांकृत्यायन यांना मिळाले. अशा या महापंडित व महाज्ञानी भारतीय तत्वज्ञानींचे दि.१४ एप्रिल १९६३च्या सुमारास महानिर्वाण झाले.
!! त्यांच्या अनेक अविस्मरणीय स्मृतींना पुरोगामी संदेश परिवारातर्फे विनम्र अभिवादन !!

✒️लेखक:-निकोडे कृष्णकुमार गुरुजी.[संत साहित्याचे गाढे अभ्यासक.]मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.ता. जि. गडचिरोली (९४२३७१४८८३).

गडचिरोली, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED