आंतरराज्य गुन्हेगारी टोळीतील दोन चोरट्यांना अटक

34

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.9एप्रिल):-आंतरराज्य इराणी गुन्हेगारी टोळीतील दोन चोरट्यांना अटक करीत त्यांचेकडुन २लाख २८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कारवाई हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली असून चोरट्यांनी शहरातून मोबाइल हिसकावून नेल्याचे प्रकरणी छानबीन केली असता हे चोरटे आंतरराज्य स्तरावर गुन्हेगारी करीत असल्याचे उघड़कीस आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार दि.६ एप्रिलचे सायंकाळच्या दरम्यान शहरातील विविध ठिकाणावरुन ३ मोबाईलसंच दोन अनोळखी इसमांनी मोटरसायकलने येवुन हिसकावून नेल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या. सदर तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी अपराध क्र. ०३४७/२०२१ कलम ३७९ अ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपास केला.

हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.हवा. शेखर डोंगरे यांनी त्यांचे पथकासह परिसरात माहीती घेत आरोपीचा शोध घेतला, सदर गुन्हयातील मुद्देमाल चोरणारे चोरटे हे शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नांदगांव चौक येथून वडनेर मार्गाने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरुन वडनेर रस्त्यावर चोरट्यांचा शोध घेतला असता, त्यांना दारोडा टोल नाक्याजवळ दोन इसम बजाज पल्सर मोटरसायकलने संशयितरित्या फिरताना आढळले. त्यांची विचारपुस केली असता ते उडवा उडवीचे उत्तरे देवू लागले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचेजवळ ७ मोबाइल संच मिळाले. सदर आरोपी शेख साखी जहागीर बाशा(३३)रा. गंगानगर, गुंटकल, अनंतपुर (आंध्र प्रदेश ) तसेच मोहम्मद शब्बर मोहम्मद शब्बीर(१९) रा. बांगरडीपल्ली, झहीराबाद, मेडक ( आंध्र प्रदेश ) अशी त्यांची नावे आहेत.

त्यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता, त्यांनी ३ मोबाईल हे हिंगणघाट शहरातुन चोरल्याचे सांगीतले तर २ मोबाईल तेलंगना राज्यातील मैनूर व आदिलाबाद येथुन चोरल्याचे सांगीतले. तसेच मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्यांनी ती दासनगर, बोरगांव जि. निझामाबाद येथुन चोरल्याचे सांगीतले. तसेच आदिलाबाद शहरामध्ये एका वृध्द महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅम सोन्याची चेन चोरल्याचीसुद्धा
कबुली दिली. त्यांचे स्वतःचे २ मोबाईल व नगदी रकम २ हजार ५०० रूपये, २० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, सात
अॅन्ड्राईड मोबाईलसंच, बजाजपल्सर मोटरसायकल तसेच नगदी रकमअसा एकुण २ लाख २८ हजार ५०० रूपयेचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला.
त्यांचेकडुन हिंगणघाट पोलिसांचेअंतर्गत ०१ गुन्हा तसेच तेलंगाना राज्यातील ०४ गुन्हे उघडकीस आले आहे.

सदर आरोपी हे इराणी टोळीचे सराइत गुन्हेगार आहेत त्यांचे विरूध्द इतर राज्यातसुद्धा बऱ्याचश्या गुन्ह्याची नोंद आहे.सदरची कामगीरी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक. अमोल लगड,डि. बी. पथकाचे पोहवा शेखर डोंगरे, नापोशी निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, पोशि सचिन भारशंकर, विजय काळे यांनी केली.