भरभरून जीवन जगा !

माणसाचे जीवन हे क्षणभंगुर आहे. या क्षणभंगुरतेची अनेक वेळा प्रचिती येते. अचानक काहीतरी घडते. होत्याचे नव्हते होते. कधी स्वप्नातही विचार केला नाही असे काहीतरी घडून जाते. चालता बोलता माणसे निघून जातात. ही जीवनाची क्षणभंगुरता कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अधिक प्रकर्षाने जाणवली. जगापासून ते आपल्या घरापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. संपूर्ण जगात या विषाणूने हाहाकार घातला आहे. मृत्यू तांडव चालू आहे. कोणत्या व्यक्तीला कधी प्रादुर्भाव होईल ? याचा काही नेम नाही. कोरोना झाल्यामुळे आलेली मृत्यू समीपता आणि त्यामुळे निर्माण झालेले भितीदायक वातावरण.

मागील काही वर्षापासून माणूस आर्थिक चंगळवाद, भौतिक सुखासीनता, पाश्चिमात्य संस्कृतीचे अघोरी अंधानुकरण या सर्व मायाजाळात गुंतत चाललाय. आम्ही आमची सुखी, समृद्ध आणि संपन्न भारतीय संस्कृती विसरून जात आहोत.

आर्थिक सुबत्ता, भौतिक संपन्नता, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कमवलेली स्थावर-जंगम मालमत्ता, प्रसिद्धी, पद, प्रतिष्ठा या सगळ्यांपेक्षा आनंद, सुख, समाधान या वेगळ्या संकल्पना आहेत. हे दिवसेंदिवस विसरत चाललो आहोत. मागच्या काही वर्षापासून माणूस निव्वळ भौतिक सोयी-सुविधा आणि भरमसाठ धनदौलत, संपत्ती कमावण्याच्या मागे लागला आहे. स्पर्धेच्या आजच्या युगात आम्ही विसरत चाललोय पैसा हे साध्य नसून; साधन आहे. माणसे, माणसामाणसातील प्रेम,आपुलकी, माया, ममता, वात्सल्य, जीवाभावाचे नाते-गोते आणि माणुसकी हेच आयुष्यात सुख आणि आनंद निर्माण करु शकतात. शोकांतिका म्हणजे या सगळ्यांपासून माणूस भरकटत चालला आहे. माणसातील माणूसपण आजच्या घडीला जिवंत राहिलेले नाही.

सगळं जीवनच कालबाह्य होत चालले आहे. जणूकाही मानवी संवेदनांना एखाद्या विषाणूने ग्रासले आहे. संवेदनाच संपत चालल्या आहेत. कशाचेच सुख वाटत नाही, कशाचे दुःख वाटत नाही. सगळे काही मिळत असले; तरी आनंद वाटत नाही. अफाट धनदौलत, पद, प्रतिष्ठा, मानसन्मान असूनही समाधान नाही. अजून काहीतरी मिळवायचे. अजून काहीतरी पाहिजेच आहे. हे मिळाले की सुखी होऊ. ते मिळाले की समाधानी होऊ. हे चालूच आहे. वस्तू मिळेपर्यंत वस्तूंची किंमत, त्यापासून मिळणाऱ्या सुखाची किंमत फक्त मिळेपर्यंत. एकदा ते मिळाले; की त्याची किंमत मात्र कवडीमोल. एवढ्या प्रचंड हव्यासापाठीमागे लागलाय माणूस की त्याचा शेवट कुठे आणि कसा होईल? याचा अंदाजही लागू शकत नाही.

प्रशस्त, देखणे, टुमदार, सर्व सोयीसुविधांनी युक्त घर आहे ; पण त्या घराला घरपणच उरलेले नाही. सोन्यासारखी माणसे आहेत. आई, बाबा, भाऊ, बहीण पत्नी, मूलंबाळ सगळी-सगळी नाती आहेत. पण त्या नात्यात ओलावाच उरला नाही. प्रत्येक नात्यात ओलावा असावा, तो तसाच टिकून राहावा यासाठी कुणी प्रयत्नही करत नाही. प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार मला काय गरज आहे? माझ्याकडे सगळं काही आहे मला कोणाचीही गरज नाही. पण लक्षात घ्या हा भ्रम आहे.. निव्वळ भ्रम… हे वेळोवेळी सिद्ध झालंय…. कसला पैसा…?… कुणाची धनदौलत…? कुठला मानसन्मान…? कुठली पद, प्रतिष्ठा‌….? कसली स्थावर-जंगम मालमत्ता…? कशाची प्रसिद्धी…? कुठला बढेजावपणा…? एवढे सगळे मिळाले म्हणजे आयुष्य सुखी आणि समृद्ध झाले असे नाही. किती आणि कुठंपर्यंत या सर्वांचा उपयोग…? या सर्वांपेक्षाही आयुष्यात आणखीन काही महत्त्वाचे असते….? भौतिक सुखाने सुख मिळाल्याचा केवळ आभास निर्माण होतो. प्रत्यक्ष समाधान मिळत नाही.

सुख, समाधान, आनंदासाठी आपल्या माणसांचे प्रेम, माया, ममता, आपुलकी, वात्सल्य आणि त्यांचा आनंददायी सहवासच आवश्यक असतो. पैसा, धनदौलत, प्रतिष्ठा मानसन्मान तुम्हाला समजून घेऊ शकत नाही. तुमच्या डोक्यावरून मायेने हात फिरवू शकत नाही. तुम्हाला कुरवाळू शकत नाही. तुम्हाला कुशीत घेऊ शकत नाही. तुमचे दुःख समजून घेऊ शकत नाही. तुमच्या वेदना त्यांना कळत नाहीत. त्यासाठी आपली माणसेच लागतात.

अभिमान वाटावा असं एक तरी नातं हवं…. ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं की अक्षरशः बांध फुटावा…. कुणाजवळ तरी हंबरडा फोडून रडता यावं… कुणाला तरी सगळं सुख-दुःख सांगता यावं….आयुष्यात कोणीतरी हवं त्याचं सगळं ऐकून घ्यावं आणि ज्याला आपलं सगळं काही सांगावं… कोणीतरी हवं ज्याला आपलं असणं हवंहवंस वाटावं. ज्याला आपलं रुसणं नकोसं वाटावं. आपण आनंदातच राहावं. आपल्या आयुष्यात दुःख येऊच नये आणि आलेल्या दुःखाला सामोरे जाण्याचे धैर्य त्यांनी आपल्याला द्यावं. आपल्या असण्याचा ज्याच्यावर फरक पडावा. आपल्या नसण्याने ज्याला विरह वाटावा. अशी हक्काची जिवाभावाची माणसं आपलं दुःख समजू शकतात. आपल्याला समजू शकतात. या सगळ्या समजून घेण्यामुळेच आपण सुखी,समाधानी, आनंदी राहू शकतो.

कशासाठी जगतो आहोत आम्ही ? आणि कुणासाठी जगतो आहोत आम्ही ? या दोन प्रश्नांची उत्तरे अगदी मध्यरात्री जरी कोणी विचारली तरी ती सांगता यावीत.. या प्रश्नांची उत्तरे सापडली नाहीत ; तर मात्र माणूस नाईलाजाने आत्महत्येकडे वळतो. आजच्या धावपळीच्या एकविसाव्या शतकात माणसाचे जीवन कसे झाले आहे. यावरील माझी एक सुंदर कविता आहे.

 

हा क्षण शेवटचा…..

 

 

नाही क्षणाचा विश्वास

क्षणभंगूर जीवन

अरे माणसा जगणे

कधी घेणार जाणून….?

 

 

राग, लोभ, दंभ भारी

कसे जडले मनाला….?

गर्व साठता डोक्यात

धार येतसे शब्दाला

 

 

नाही कळतो माणूस

अर्थ काय त्या दृष्टीला….?

माणुसकी नसे जिथे

अर्थ काय त्या धनाला…?

 

 

क्षण क्षण ओसरती

अल्प काळाचे सोबती

कोण, कधी, कसा जाई

सारा हिशोब वरती

 

 

चुका होतात जगती

नका दु:खवू कुणाला

लागे माणसा-माणूस

सुखा-दुःखाच्या क्षणाला

 

 

नको वासना वाईट

हित चिंतावे सर्वांचे

दया, क्षमा करूनिया

खुली दालने मनाचे

 

 

जगताना मनी धरा

हाच क्षण शेवटचा

प्राण जाता देहातून

राहो सुगंध स्मृतीचा

 

✒️लेखक:-मयूर मधुकरराव जोशी(ग्रीन पार्क जिंतूर जि परभणी)9767733560,7972344128

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED