पंढरपूरमध्ये लॉकडाऊनला मोठा विरोध

25

🔸गुन्हे दाखल झाले तरी दुकाने उघडणार व्यापारी

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.9एप्रिल):- जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नव्या आदेशानुसार लॉकडाऊन सुरु झाला आहे. याचा परिणाम म्हणून मंगळवेढा व पंढरपूर शहरातील दुकाने उघडलीच नाहीत. सर्वसामान्य नागरिक लॉकडाऊनमुळे अस्वस्थ आहेच पण छोटे मोठे व्यापारी खवळले आहेत.प्रशासनाला जे काही करायचंय ते करू द्या, आम्ही दुकाने उघडणारच असा आक्रमक पवित्रा आज पंढरीतील व्यापाऱ्यांनी घेतला असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत व्यापाऱ्यांचे बोलणे झाले आहे त्यामुळे व्यापारी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुकाने सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक दुकानदाराना कोरोना तपासणी करून घेणे भाग पाडले. व्यापाऱ्यांनी रांगा लावून कोरोना तपासणी करून घेतली आणि त्यानंतर अचानक लॉकडाऊनचा नवा आदेश आला.रोज वेगळे आदेश कशासाठी काढले जातात? शासन आणि प्रशासन यांच्यात ताळमेळ कसा नाही असे अनेक सवाल संतापलेल्या व्यापाऱ्यांनी विचारले आहेत.

मतदानावर बहिष्कार टाकण्याची टोकाची भाषाही आज सकाळपासून व्यापारी करू लागले आहेत. लॉकडाऊन एकदम करू नका अशा सूचना मुख्यमंत्री यांनी दिलेल्या असतानाही अचानक हा आदेश आला. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर या आदेशाबाबत कित्येकांना माहिती मिळाली त्यामुळे एकाच गोधळ उडाला आहे.जिल्हाधिकारी यांच्या या नव्या आदेशाबाबत संताप व्यक्त होत असतानाच आज पंढरपूर व्यापारी महासंघाने बैठक आयोजित केली होती. मतदानावर बहिष्कार टाकण्यापासून प्रशासनाच्या आदेशाला झुगारून उद्यापासून दुकाने उघडणारच असा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान बैठकीच्या ठिकाणी आ. प्रशांत परिचारक व भाजप उमेदवार समाधान आवताडे आले असता त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याना फोनवरून माहिती दिली.वर्षभर आम्ही हाल सहन केले आहेत, आता हे सहन होणार नसून काही झाले तरी उद्यापासून आम्ही दुकाने उघडू, शिवाय निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार व्यापारी महासंघ करीत आहे अशी माहितीही व्यापाऱ्यांनी फडणवीस याना दिली आहे.व्यापाऱ्यांचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालतो असे फडणवीस यांनी व्यापाऱ्यांना सांगितले आहे त्यामुळे आता हा संघर्ष कोणत्या वळणावर पोहोचतोय ते उद्या दिसणार आहे.