खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी गमावला!: अशोक चव्हाण

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.१०एप्रिल):-देगलूरचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे अकाली निधन धक्कादायक असून, त्यांच्या रूपात मी खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी गमावल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

आ. अंतापूरकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, मागील काही दिवसांपासून त्यांचे आजारपण वाढतच होते. परंतु, अंतापूरकरांचे व्यक्तीमत्व संघर्षशील होते. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला होता व अनेकदा खडतर परिस्थितींवर मात केली होती. कोरोनातूनही ते बरे झाले होते. त्यामुळे या आजारपणातून ते बाहेर पडतील, अशी आशा होती. परंतु, दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घालून सर्वसामान्यांमधील एक लोकप्रिय नेतृत्व हिरावून घेतले.

आ. रावसाहेब अंतापूरकर एक मनमिळाऊ, संवेदनशील लोकप्रतिनिधी होते. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. राजकारणात नवखे असताना देखील पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. आमदार असताना व नसतानाही त्यांनी प्रामाणिकपणे लोकांची कामे केली. त्यामुळेच जनतेने त्यांना दुसऱ्यांदा आमदार केले. ते अतिशय अभ्यासू होते. देगलूरच्या विकासासाठी त्यांच्या अनेक संकल्पना होत्या व त्याअनुषंगाने ते सतत प्रयत्नशील होते. त्यांच्या निधनाने केवळ देगलूर नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील एक सक्षम नेतृ्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

चव्हाण कुटुंबाशी त्यांचे संबंध राजकारणापलिकडचे होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने मी समाजकारणातील सहकारीच नव्हे तर एक कौटुंबिक स्नेही गमावल्याचे सांगून अशोक चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED