जोतीबा फुले : शूद्र क्षितिजावरचा अपूर्व सूर्य !

[महात्मा फुले जन्म दिवस]

धर्म शास्त्रविषयक ज्यांचा गाढा व सखोल अभ्यास होता. ते ज्ञानसूर्य महात्मा फुले आणि त्यांच्या धर्मपत्नी सावित्रीमाई यांनी पुरोगामी विचारसरणीने भारतात स्त्रीशिक्षणाचा पाया घट्ट रोवला. त्यांनी शैक्षणिक, कृषी, जाती पद्धती, स्त्रियांचे आणि विधवांचे राहणीमान उंचावण्याच्या कामी भरीव कार्य केले. स्पर्श व शिवाशिव यात त्या काळात फार मोठा भेदभाव होता. मानवामानवात दुरावा निर्माण करणाऱ्या कलुषित विचाराने बरबटलेल्या मनुस्मृती ग्रंथाचा पगडा सर्वांवर भारी पडत होता. त्यामुळे उच्च, नीच, कनिष्ठ असा भेदभाव सर्वत्र माजला होता. या सर्व प्रकारांतील अंतर कमी करण्याचे कार्य त्यांनी केले. स्त्रीशिक्षण, मागासलेल्याच नाही तर इतरही सर्व जाती-धर्मांतील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनी प्रथम आपल्या निरक्षर पत्नीला शिक्षण दिले. त्याच पुढे शिक्षणसम्राट तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या धर्मपत्नी सावित्रीमाई फुले मार्मिक शब्दांत शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगतात –

“विद्या हे धन आहे रे। श्रेष्ठ साऱ्या धनाहून।। तिचा साठा जयापाशी। ज्ञानी तया मानती जन॥” [शिळाप्रेस्स प्रसिद्ध – १८५४ : काव्यफुले.]

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांचा जन्म दि.११ एप्रिल १८२७ रोजी झाला. त्यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यातील कटगूण हे होते. शिक्षणमहर्षी महात्मा फुले हे थोर विचारवंत होते. समाज परिवर्तनाचे महान क्रांतिकारी कार्य त्यांनी केले. ते उत्तम लेखक व कवीही होते. समाज परिवर्तनासाठी त्यांनी शेती आणि शेतकरी वर्गाच्या दृष्टीने हितावह लिखाण केले आहे. क्रांतिसूर्य फुले दांपत्याने सन १८४८मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांनी स्वार्थी पद्धतीने समाजाचे शोषण होत असल्याचे पाहिले, तेव्हा त्यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. निर्घृणपणे बहुजन समाजाचे, शूद्रांचे, दलितांचे होणारे हाल त्यांनी पाहिले, तेव्हा त्यालाही त्यांनी प्रचंड विरोध करण्यास सुरवात केली. सर्वांना समान हक्क आणि सामाजिक सहिष्णुता यावर त्यांचा भर होता. त्यातूनच मागासलेल्या समाजाला पुढे आणण्याचे काम त्यांनी केले. छोट्या गरीब शेतकऱ्यांना प्रगतीकडे वाटचाल करण्याच्या कामी त्यांनी महान कार्य केले. त्यामुळेच त्यांचा भारतीय सामाजिक क्रांतीचे आद्यप्रवर्तक व वडीलधारी नेते, असा उल्लेख केला जातो. अस्पृश्योद्धारक जोतीरावांना ज्ञानसूर्याची उपमा देऊन सावित्रीमाईंनी त्यांच्या महानतेची पावतीही अशी दिली आहे –

“स्वामी जोतीबांच्या। लागे मी चरणी।। त्यांची गोड वाणी। मनी घुमे।। महार मांगाची। करते मी सेवा।। आवडीच्या देवा। स्मरूणिया।।” [शिळाप्रेस्स प्रसिद्ध – १८५४ : काव्यफुले.]

त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यात फुलमाळी गोऱ्हे कुटुंबात झाला. त्यांचे वडील गोविंदराव हे भाजीपाल्याचा व्यापार करीत असत. त्यांचे आजोबा पुण्यात स्थायिक झाले होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, म्हणून त्यांना फुले नावाने ओळखले जाऊ लागले. महात्मा जोतीराव फुले केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वडिलांना शेतीतील कामांत मदत करण्यास सुरवात केली. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी झाला. त्यांच्या शेजारी काही मुस्लिम आणि ख्रिश्चन कुटुंबे राहत होती. त्यांनी महात्मा फुले यांची बुद्धिमत्ता अफाट असल्याचे ओळखले होते. त्यांनी महात्मा फुलेंच्या वडिलांना त्यांचे पुढचे शिक्षण व्हावे असे सुचविले. त्यानुसार त्यांनी स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण पूर्ण केले. महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत : “विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले।। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”

मानवी हक्कावर थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण व मागासलेल्या जातीतील मुलांमुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि अनुमान होते. इंग्रजी भाषेविषयी सावित्रीमाईंनी लिहिले –

“इंग्रजी माऊली। देई सत्य ज्ञान।। शूद्राला जीवन। देई प्रेमे॥१।। इंग्रजी माऊली। शूद्रांना पान्हा पाजी।। संगोपन आजी। करतसे॥२।। इंग्रजी माऊली। तोडते पशुत्त्व।। देई मनुष्यत्त्व। शूद्रलोका।।३।।” [शिळाप्रेस्स प्रसिद्ध – १८५४ : काव्यफुले.]

दि.४ सप्टेंबर १८७३ रोजी शिक्षणप्रेमी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. ब्राह्मण या उच्च जाती वर्गाकडून शूद्र आणि अतिशूद्र समाजाचे शोषण थांबवणे, हा मुख्य उद्देश या सत्यशोधक समाजाचा होता. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरवात केली. त्यांनी जातीभेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली. महातेज क्रांतिसूर्य महात्मा फुलेजींनी मानवता धर्म उजागर करताना नकलून ठेवले –

“एक सूर्य सर्वां प्रकाश देतो।। उद्योगा लावतो।। प्राणीमात्रा।।१।। मानवासहित प्राण्यांचे जीवन।। सर्वांचे पोषण।। तोच करी।।२।। सर्वां सुख देई जनकाच्या परी।। नच धरी दूरी।। कोणी एका।।३।। मानवाचा धर्म एकच असावा।। सत्याने वर्तावा।। जोती म्हणे।।४।।” (म.फुले समग्र वाङ्मय : अखंडादी काव्यरचना : भाग १ला – मानवाचा धर्म एक.)

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीमाई यांनी केले. त्यांनी १९ स्त्रियांसह या विभागाचे कार्य सुरू केले. त्याचवेळी त्या कन्याशाळेच्या शिक्षिका म्हणूनही कार्य करीत होत्या. त्यांच्या खांद्यास खांदा लावून फातिमामाई शेख साथ देत होत्या. येथे या दोघींचेही पुण्यस्मरण करून चरणी नतमस्तक होणे मी माझे अहोभाग्य समजतो. पुण्याच्या भिडे वाड्यात जोतीबा फुले आणि सावित्रीमाई यांनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. स्त्री-पुरुष या भेदापलीकडे स्पृश्य-अस्पृश्य ही सामाजिक दरी मोठी असल्याने त्या काळात दीन दलिताना शिक्षणाचा मुळी हक्कच नव्हता. कर्मठ व धर्ममार्तंडांचे टक्केटोणपे, शेण, मानवी मलमूत्र विष्ठा व दगडगोटे जागोजाग स्वागतालाच. पण, सामाजिक दुर्दैवाच्या या दशावतारांना आडवे करून फुले दाम्पत्याने स्त्रीशिक्षणाची पहिली ‘ज्ञानज्योती’ प्रज्वलित केली. धर्मपत्नी सावित्रीमाईंना कणाकणातून ज्ञान वेचायला शिकवणाऱ्या जोतीबांचा त्यांच्या जीवनपद्धतीवर सर्वात मोठा प्रभाव पडला होता. तो काव्यसुमनांद्वारे असा व्यक्त केला –

“काळरात्र गेली। अज्ञान पळाले॥ सर्वा जागे केले। सूर्याने या॥ शूद्र या क्षितिजी। जोतीबा हा सूर्य॥ तेजस्वी अपूर्व। उगवला॥ [शिळाप्रेस्स प्रसिद्ध – १८५४ : काव्यफुले.]

शिक्षणसम्राट महात्मा फुले हे निर्मिकात दि.२८ नोव्हेंबर १८९० मध्ये विसावले. त्यानंतर त्यांचे विचार, आचार व त्यांची शिकवण सत्यशोधक समाजाने उचलून धरली आणि सत्यशोधक चळवळ खऱ्या अर्थाने वेग घेऊ लागली. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ती चळवळ पोहोचली. छत्रपती शाहू महाराजांनी तर सत्यशोधक चळवळीस जाहीर पाठिंबाच दिला होता.
!! त्या ज्ञानदात्या राष्ट्रपित्यास जन्मदिनी पुरोगामी संदेश परिवारातर्फे विनम्र अभिवादन !!

✒️लेखक:-सत्यशोधक – श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.(संत-लोक साहित्याचे गाढे अभ्यासक.)
मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी,ता. आरमोरी, जि. गडचिरोली.
प्रतिक्रियेसाठी इमेल Krishnadas.nirankari@gmail.com

गडचिरोली, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED