महात्मा फुले बुधवार पेठ आणि शेतकऱ्याचा आसूड

29

भारत हा कृषिप्रधान देश होता असे आता म्हणावे लागेल.कारण या देशातील शेतकरी तीनचार महिने कडक थंडीत देशाच्या राजधानीच्या सीमेवर जनांदोलन करतो तरी त्यांची दखल केंद्र सरकार घेत नाही.अशा वेळी महात्मा ज्योतिबा फुले यांची आणि त्यांच्या आसुडाची आठवण येते.त्यांनी लिहलेल शेतकऱ्याचा आसूड किती शेतकऱ्यांनी वाचले असेल हे सांगता येत नाही.अन्यता दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांनी हातात आसूड घेऊन सत्ताधारी पक्षाच्या आमदार खासदारांना आसुडाने झोडपून काढले असते.शेतकऱ्याच्या खांद्यावर असणारा हा असूड केवळ शेतात काम करून घेणाऱ्या जनावरांसाठीच वापरला जातो असे नाही. सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध आणि शोषकांविरुद्धही हा असूड वापरला पाहिजे. दुष्टांच्या निर्दालनासाठी आणि सत्याच्या प्रस्थापनेसाठी या असूडाशिवाय दुसरे कोणते समर्थ साधन शेतकऱ्यांच्या हाती नसते. एवढेच नाही, तर इथल्या सोवळ्या ओवळ्याला कंटाळून आणि शेतकऱ्यांच्या घरात खाण्यापिण्यास काही उरले नाही म्हणून लक्ष्मी सातासमुद्रापलीकडे तिच्या पित्याच्या घरी गेली. एकदा लक्ष्मी नाराज होऊन गेली की, दु:ख आणि दारिद्र्याशिवाय शेतकऱ्यांच्या घरी उरणार तरी काय? तेव्हा तिला परत आपल्या देशात नांदावयास आणावयाचे असेल, तर शेतकऱ्यास सर्व प्रकारच्या विद्या शिकविल्या पाहिजेत. एकदा शेतकरी विद्वान झाला की, तो खांद्यावर असूड टाकून लक्ष्मीला पुढे घालून आपल्या घरी नांदावयास घेऊन आल्याशिवाय राहणार नाही.

हळूहळू भव्य होत जाणारे हे सुंदर रूपक असंख्य अर्थांची प्रचीती देऊन जाते.शेतकऱ्याचा आसूड वाचला तर आपणास नवेच भान आणते. महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:
विद्येविना मती गेली ।

मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला होता. त्यांनी १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती (मेजर कॅंडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत). त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्याचं त्याच बरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केलीत. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण -सगुणाबाई क्षिरसागर यांच्याकडून मिळाली. जोतीराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत, तसेच ते शाळांतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधने नि उपकरणे वापरावी म्हणून शिक्षकांनाही उत्तेजन देत असत. स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला. त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मणेतर विद्यार्थांना नि:शुल्क शिक्षण द्यावे, अशी त्यांनी प्रार्थना केली होती. त्या अर्जातील त्यांचा हेतू सफल झाला होता.पण ब्राम्हणांनी त्याला कसा सुरुंग लावला हे किती लोकांना माहिती आहे.

महात्मा जोतिबा फुले यांनी पुण्यातील बुधवारपेठेतील भिडे वाड्यात मुलीची पहिली शाळा काढली.ती बुधवार पेठ एका ऐतिहासिक आणि सुसंस्कृत शहरातील बदनाम वस्ती म्हणून ओळखल्या जाते.पुण्यात पेशव्यांनी राज्य केले.आजही ब्राम्हणांचे वर्चस्व असून आणि चारही बाजूला अतिशय सुसंस्कृत लोकांची वस्ती असूनही मधोमध असलेले बुधवारपेठ प्राचीन काळापासूनच बदनाम वस्ती का आहे?. का होऊ दिले बुधवार पेठेला बदनाम?. कशी काय तिथे ती वस्ती तयार झाली?. तो काळ होता पेशव्यांचा मावळता काळ,पेशवाई संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती.इंग्रजांनी भारतावर आदिराज्य,पकड करून ठेवली होती.त्याच काळात महात्मा जोतिबा फुले यांचा समाजकार्यातील सुरवातीचा काळ होता.पेशवे संपले याचे एक प्रमुख कारण होते त्यांच्या रंगेल सवयी.त्या काळातील सत्तेवर असलेल्या काही पेशव्यांनी पश्चिम बंगालवरून उदरनिर्वाहासाठी देहव्यापार करणाऱ्या काही नावाजलेल्या गणिका शनिवारवाड्यात ठेवल्या होत्या.खरंतर शनिवारवाडा तेवढ्यासाठीच बांधला गेला होता.असा इतिहास आहे.

मनुवादी समाजाचा कट्टर विरोध असतां नाही त्याकाळात महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरु केली. बुधवार पेठेतील भिडेंच्या वाड्यात.काही पुरोगामी लोकांनी ह्या शाळेचे स्वागतही केले होते. आणि त्यांच्या घरातील स्त्रियांना साक्षरतेचे धडे घेण्यासाठी त्या शाळेत पाठवू ही लागले होते.शाळेत मुलींची आणि महिलांची संख्या हळू हळू वाढू लागली. हे कर्मठ मनुवाद्यांच्या नसलेल्या अस्मितेला धक्का असल्यासारखे होते.जिथे मनुस्मृतीं ने स्त्रियांना पायातले पायदान मानायला सांगितले होते.एक वापरण्याची उपयोगी वस्तू मानण्यास सांगितले होते तिथे जर स्त्रिया सुशिक्षित झाल्या तर त्या अधिकार मागू लागतील. व्यवहार करू व समजू लागतील. हे मनुवाद्यांना पचले नाही,रुचले नाही त्यांनी ती शाळा बंद पडण्याचे आटोकाट प्रयत्न केले.पण काही स्त्रिया शाळेत येण्याचे बंद करत नव्हते.त्यामुळे मनुवादी कर्मठांनी तत्कालीन सत्ताधारी पेशव्यांची मदत घेऊन शनिवारवाड्यात सर्व गणिका सर्वसंमतीने बुधवार पेठेत आणून वसवल्या. त्यामुळे बुधवार पेठ हि गणिकांची वस्ती बनली.परिणामी लोकांनी आपल्या घरातील महिला मुली बुधवार पेठेतील शाळेत पाठवणे बंद केले आणि कालांतराने मुलींची ती पहिली शाळा ह्या कारणाने बंद पडली.परंतु मुलीना शिक्षण देणारी पहिली शाळा बुधवार पेठ भिडेवाड्यात पुणे इथे सुरु झाली हा प्रेरणादायी इतिहास लिहला गेला.हा सत्य इतिहास कोणी लिहत व सांगत नाही. की आज बुधवारपेठेला बदनाम वस्ती करण्याचे कारस्थान तिथल्या गणिकांनी नाही केले तर पुण्यातील पेशव्यांनी आणि स्वतः पुण्यातील उच्चभृ खानदानी कर्मठ मनुवादी महाभागांनी केलेले होते.फक्त आणि फक्त मुलींची पहिली शाळा बंद पाडण्यासाठी बुधवार पेठ प्रसिद्ध झाली होती.

महात्मा ज्योतिबा फुले यांची पहिली शाळा बुधवार पेठ भिडेवाड्यात पुणे येथे सुरु झाली होती ती बंद पडल्या नंतर ओतूरच्या सुवर्ण इतिहासातील काळाच्या पडद्याआड गेलेली काही लक्षवेधी घटना भाऊ कोंडाजी डुंबरे पा. महात्मा जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या प्रथम १० मधली व ओतूर परिसरातील ४ थी शाळा उभारण्याचं व तळागाळातील समाजाला शिक्षणाचचे दार उघडण्याचं काम भाऊनी केले. महात्मा फुलेचे सहकारी ओतूरचे भूमिपुत्र सत्यशोधक चळवळीचे प्रमुख नेते ज्यांनी महात्मा फुलेची सत्यशोधक चळवळ नेटाने पुढे वाढवली,लढविली त्यांच्या नेतृत्वाखाली अनिष्ट रूढी परंपरा सामाजिक शोषण,शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी खूप लढा दिला.बालाजी कुसाजी डुंबरे पा. त्याकाळी असणाऱ्या सावकारी व ब्राह्मणी व्यवस्थेला झुगारून भाऊच्या मार्गदर्शनाखाली आपल्या २ मुलींची लग्न सत्यशोधक पद्धतीने लावून समाजात क्रांती निर्माण करण्याचं काम केले होते . भीमराव महामुनी आपल्या भरदार आवाजातून शाहिरी जलसा या माध्यमातून फुलेचं काम लोकांसमोर मांडण्याचं काम भीमरावांनी केलं.शाश्री महाधट पानसरे सत्यशोधक समाजाचे काम,समाजाची अधिवेशने घेऊन लोकांपर्यंत पोहचविण्याचे व टिकून ठेवण्याचं काम यांनी केलले होते.चिमणाजी माथाजी डुंबरे पा. गणू बापूजी डुंबरे पा. इतरांचे त्यांना मोठे सहकार्य मिळाले होते. (दशरथ भिमाजी पा. डुंबरे पाटील गुरुजी वय ७९ मुक्काम ओतूर जिल्हा परिषद शाळेचे माजी शिक्षक माझे जागरूक वाचक यांनी ही अभ्यासपूर्ण माहिती संदर्भासह मला दिली आहे त्यांचे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो.)

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले (जन्म : ११ एप्रिल १८२७; मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९०), इतर नावे: महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठी भाषेतील नामवंत लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पुश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना १८८८ ला महात्मा ही पदवी बहाल केली होती. महाराष्ट्राला तीन प्रमुख क्रांतिकारी विचारांच्या समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले,शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हटलंय जाते. २४ सप्टेंबर १८७३ रोजी, त्यांनी आपल्या अनुयायांसह, सर्व जातीतील लोकांना समान हक्क मिळवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यात सर्व जाती धर्मातील लोकांनीं एकत्रित येऊन उत्पीडित वर्गाच्या उन्नतीसाठी काम केले.असा इतिहास आहे.पण आज सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते नेते कोण हे शोधावे लागते. इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो असे म्हणतात.शिवराय,फुले,शाहू आंबेडकर या महान महापुरुषांना भटा ब्राम्हणांनी त्यांच्या जातीत त्यांना बंधीस्थ केले आहे.त्यामुळेच मराठा ओबीसी,मागासवर्गीय आदिवासी हा मोठय संख्येने मनुवादी विचारांच्या पक्ष संघटनांचा समर्थक आहे. ११ एप्रिल ही महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कोण किती प्रमाणात साजरी करतो.हा १९४ वर्षा नंतर ही संशोधनाचा विषय आहे.आज सर्वच क्षेत्रात मुली,महिला मान,सन्मान प्रतिष्ठा मिळवीत आहेत. ते केवळ महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारामुळे हे आजच्या सुशिक्षित मुली महिलांनी विसरू नये.महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कष्ट,त्याग आणि जीद्धीला त्यांच्या जयंती निमित्याने कोटी कोटी प्रणाम.सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा !!!.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई,अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य.