वेल्हाणे येथील शेतकऱ्यांवर लॉकडाऊन मुळे शेतमाल गुरांसमोर टाकण्याची वेळ

31

✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

वेल्हाणे(दि.12एप्रिल):- कोरोना महामारीच्या संकटकाळात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग कोलमडून पडले. त्याच प्रमाणे शेती व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी राजाने देखील काही स्वप्न बघितली होती, की आता कोरोना गेला आता आपण आपल्या शेतीत चांगल्या पद्धतीचे उत्पन्न घेऊ आणि त्यातून दोन पैसे मिळवु. पण फेब्रुवारी-मार्च दरम्यान कोरोना ची दुसरी लाट सुरू झाली, आणि सरकारने त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. अनेक ठिकाणी लॉकडाऊनची घोषणाही झाली.

पण या सर्व गोष्टीचा फटका शेतकऱ्यांच्या शेतमालाला अप्रत्यक्षरीत्या बसताना दिसत आहे. धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील युवा प्रगतिशील शेतकरी जितेंद्र रमेश बोरसे यांनी दोन लाख रुपये खर्च करून शेडनेटमध्ये काकडी पिकाचे उत्पन्न घेतले. त्यासाठी लागणाऱ्या रोपांचा खर्च जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये त्यांनी केला. पण आता त्यांच्या काकडीचे उत्पन्न निघायला लागले आणि सरकारने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे हा युवा शेतकरी पूर्णत: संकटात सापडला आहे. त्याच्या काकडीला रुपये-दोन रुपये किलोने मागणी आहे. त्यातून त्याने टाकलेला खर्चही निघत नाही. तसेच ज्या वाहनाने हा शेतीमाल मार्केटला पाठवला जातो. त्या वाहनाचे भांडे सुध्दा यातुन वसूल होणे कठीण आहे.

महाराष्ट्रात मागणी नाही म्हणून आपली काकडी गुजरात मध्ये सुरत मार्केटला पाठवण्याचा त्यांनी निर्णय घेतला, पण सर्वत्र कोरोनामुळे परिस्थिती सारखीच असल्यामुळे शेवटी त्यांनी आपली काकडी तोडुन जनावरां पुढे टाकली आहे, आणि निराशा व्यक्त केली आहे. हिच परीस्थिती गावातील पपई उत्पादक शेतकरी धनसिंग बहादुरसिंग पवार यांची झाली आहे, कोरोना काळात लॉकडाऊन मुळे पपई पिकावर ट्रॅक्टर फिरवावा लागत आहे. मागील वर्षी देखील जितेंद्र बोरसे या युवा शेतकऱ्याने शिमला मिरचीचे उत्पादन घेतले, आणि त्यांना कोरोना संकटकाळामुळे याच प्रकारच्या निराशेला सामोरे जावे लागले. नाविन्याची कास धरणारे हे युवा शेतकरी जर असेच निराशेच्या गर्क छायेत जाऊ लागले तर येणारा भविष्यकाळ हा कठीण आहे. म्हणून शासनाने शेतकर्‍यांच्या या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि शेतमालाच्या भावा संदर्भात नवीन नियमावली जाहीर करावी, अशी आशा शेतकरी जितेंद्र बोरसे व धनसिंग पवार यांनी पुरोगामी संदेश च्या तालुका प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे.