कर्तव्यनिष्ठडॉ. बाबासाहेब आणि मदमस्त महंत-महाराज

मानवजातीला कलंक लावणारे मनुचे कायदे गाडून टाकून तथागत गोतम बुद्धांच्या तत्वावर आधारित स्वातंत्र्य समता आणि विश्वबंधुत्व जपणारा नवासमाज निर्माण करण्याचा अहोरात्र ध्यास घेऊन प्रत्यक्षात सतत कृतीशील असणारे बाबासाहेब हिंदू कोड बिल तयार करण्यात व्यस्त होते तेव्हांची ही घटना आहे.आपल्या देशात देव-देऊळ ही कल्पना मांडून त्यांना समर्पक अशा कथा पोथी-पुराणात घुसवून हे देवांनी सांगितले आहे असे सांगून सामान्य लोकांवर धार्मिक गुलामगिरी लादली गेली होती आणि ती अजूनही आहे.हा बिनभांडवलीचा धंदा असल्यामुळे अनेक उपटसुंभ भगवे पांघरून आजच्या घडीला देखील लोकांना सर्रास लुबाडताना दिसतात.परंतु अंगावर भगवे आणि डोक्यावर मागच्या बाजूला बुचडा असला की कुणालाच काही बोलता येत नाही.कारण त्यांच्याबद्दल एखादी शंका आपल्या स्वतःच्या मनात जरी आली तरी गालावर मारुन घेऊन कान पकडणारे आपण पाहतो मग त्या बुवा-बाबा, पंडीत-पुजारी आदींवर उघडपणे शंका व्यक्त करणे तर खूप दूरची गोष्ट आहे.कारण आपल्या कडे अशा भ्रामक कथा आणि कथानायकांची प्रतिमाच बनविले गेले आहेत.

उघडा-नागडा, केस अस्ताव्यस्त पसरलेले आणि उगाचच आकाशाकडे पाहून हसणारा, डोळे मिचकावणारा, बोटं मोजणारा,गांजा आणि तत्सम नशापान करणारा हा त्यांच्या दृष्टीने अगदी वरच्या श्रेणीतील महाराज समजला जातो. भगवं धारण करुन एखादे मंदिर अथवा मठ हेच आपले मुख्यालय बनवून राज करणा-यांची इथे कमी नाही. कारण यांच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या कल्पनांमुळेच दर दहा फुटांवर देवळांची निर्मिती करुन त्यांच्या रोजगाराची हमी योजना अस्तित्वात आली आहे. देशावर कुठलीही आपत्ती येवो यांच्या कमाईत कधीच खंड पडत नाही. प्रसंगी लोक स्वतः कर्ज काढून यांच्या उदरनिर्वाहाची सोय करतात. कारण एकच ! भीती आणि श्रद्धा.भीती याची की असे जर नाही केलं तर भविष्य अंधकारमय होणार आणि श्रद्धा नव्हे, अंधश्रद्धा अशी की,आपण यांना देणं म्हणजे मोठं पुण्यकर्म ! डायरेक्ट देवालाच पोहोच करणे होय. कारण ती कुणा जीत्या जागत्या आई-बापांची नव्हे तर साक्षात ब्रम्हाची म्हणजेच देवाची लेकरं हे मनात खोलवर बिंबवण्यात आलेले आहे. एवढं प्रस्थ,एवढं महत्व या इथल्या महंत, पुजारी, आचार्यांनी आपल्या बाबत तयार करून ठेवले आहे.

पूर्वीपासूनच भगवे आणि खादी यांचे घनिष्ठ संगनमत आहे. वास्तविक सर्वधर्मसमभाव या तत्वानुसार तयार करण्यात आलेले जगातील एक आदर्शवत असे भारतीय संविधान देशात लागू झाल्यानंतर तरी हे विषारी मिश्रण टाकून द्यायला हवं होतं परंतु धार्मिक अधिष्ठान असल्यामुळे उलट अलिकडच्या काळात असे महंत-आचार्य, महाराज-पंडीत आणि राजकारणी यांनी सहकारी तत्वावर राजकीय वखारी खोलून जोरात व्यवसाय करण्यात व्यस्त आहेत. मुळात भीतीपोटी देऊळ धर्माचे पालन म्हणून महंत-महाराजांकडे गर्दी होते. मग मतलबी राजकीय नेते त्या गर्दीचे रुपांतर एकगठ्ठा मतदारात करून घेण्यासाठी महाराजांच्या सत्संगात हजेरी लावतात.आणि आपले नेते सत्संगात जातात म्हणून राजकारण्यांचे बगलबच्चे महाराजांकडे रतीब लावतात. असे एकमेकांच्या भेटीबरोबरच अनेक पूरक उद्योग या राजकीय पुढारी आणि महाराज मंडळींमध्ये बिनबोभाट सुरू असतात आणि आजही सुरूच आहेत.
केवळ आणि केवळ देव आणि धर्माच्या भीतीने इथली जनता सारासार विचार न करता त्यांच्या नादी लागल्यामुळे त्यांना दिवसेंदिवस अधिक बळ मिळत आहे.असो!महाराज महंतांची एवढी पार्श्वभूमी कथन करायचे कारण म्हणजे,विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू कोड बिल तयार करण्यात अतिशय व्यस्त होते अशावेळी हरिनारायण ओझा उर्फ हरिहरानंद सरस्वती ज्याने काशी क्षेत्रचा धर्मगुरू म्हणून स्वामी करपात्री महाराज या नावाने वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रसिद्धी मिळवली होती.

रामराज्य परिषद नावाचा राजकीय पक्ष स्थापन करुन १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत तीन खासदार ही त्याने निवडून आणल्यामुळे राजकारणात जो माज येत असते त्या मस्तीच्या जोशमध्ये येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्या हिंदू कोड बिलासंबंधी चर्चा करण्यासाठी पत्राद्वारे आव्हान दिले.
करपात्री महाराज म्हणाला की, डॉ.आंबेडकर एका अस्पृश्य समाजाचे आहेत. आमचे सगळे धर्मग्रंथ तर संस्कृतमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना आमचे ग्रंथ आणि शास्त्राबद्दल काय आणि किती माहिती असणार आहे? तरी देखील ते हिंदू कोड बिल तयार करण्यात का रस घेत आहेत ते कळत नाही.जर त्यांनी आमचे शास्त्र आणि संस्कृतीमध्ये दखल घेऊन काही बदल आणि दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.करपात्री महाराज दिल्ली तील यमुना नदीच्या काठावर असलेल्या निगम बोट घाटाजवळील एका आश्रमात रहात होते.एक खास पत्र लिहून हिंदू कोड बिल बाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आश्रमात येण्याचे निमंत्रण पाठविले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अतिशय संयमी,शांत आणि सुशील स्वभावाचे होते.त्यांनी त्या निमंत्रणाचा आदरपूर्वक स्वीकार करून महाराजांना कळविले की, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, मराठी अथवा अन्य कुठल्याही भाषेत मी चर्चा करण्यास तयार आहे.जर एखाद्या प्रश्नावर आपल्याला चर्चाच करावीशी वाटत असेल आणि काही शंका असतील तर आपण सोयीनुसार माझ्याकडे येऊन आपल्या शंकांचे निरसन करून घेऊ शकता.
हा निरोप कळताच करपात्री महाराजांच्या डोक्याला झिणझिण्या आल्या. महाराजपणाचा मान असल्यामुळे त्यांचा शब्द म्हणजे सर्वांना प्रमाण मानायची प्रथा रूढ करण्यात आल्याने महाराजांना माज ही होताच.त्यांना बाबासाहेबांच्या या निरोपाचा खूप राग आला. त्यांनी बाबासाहेबांच्या पत्राला त्वरित उत्तर धाडले.त्या पत्रात त्यांनी बाबासाहेबांना जवळजवळ सूचना वजा धमकीच दिली की, डॉ.आंबेडकर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. तुम्हाला कदाचित याचा विसर पडलेला दिसतो की, तुम्ही एक साधू-सन्याशाला तुमच्या कडे येण्यास सांगत आहात.
साधूने तुमच्याकडे येऊन नव्हे, तर तुम्ही स्वतः साधू महाराजांकडे येऊन चर्चा केली पाहिजे.आणि असेच करण्याची पद्धत आहे.एवढ्यावरच थांबणारे अथवा हार मानणारे ते बाबासाहेब कसले ?

करपात्रींच्या पत्राला त्यांनी तितक्याच ताकदीने आणि तत्परतेने उत्तरादाखल लिहिले की, मी धर्म, तो मग कुठलाही असो त्यातील धर्मगुरूंना आणि त्यांच्या तप आणि त्यागाचा आदर करतो, वंदन करतो.मात्र आता ज्यांच्याशी माझा जो पत्रव्यवहार सुरू आहे ते आता साधू अथवा महाराज राहिलेच कुठे ? ते तर राजकीय पुढारी झाले आहेत. तसे नसते तर एखाद्या साधू अथवा संन्याशाला हिंदू कोड बिल बद्दल काय देणं घेणं आहे ?
भारतातील सर्वच महिलांना संपत्ती बाळगण्याचा,संपत्तीत वाटा असण्याचा, घटस्फोट मागण्याचा, पुनर्विवाह करण्याचा नैसर्गिक हक्क जर या हिंदू कोड बिलद्वारे मिळत असेल तर यात वाईट काय आहे ? मानवतेला धरून तर आहे. या उलट मला असे वाटते की,या विषयावर आपण गलिच्छ राजकारण करत आहात.आणि राजकीय दृष्टीकोनातून आपल्याला कदाचित विसर पडला असेल की,मी आता या क्षणी स्वतंत्र भारताचा कायदा मंत्री आहे. आणि मंत्री हा शासनाचा एक जबाबदार घटक असल्याने मी मंत्री या नात्याने जिथे जनतेच्या हितार्थ कुठलेही कार्य चालत नसेल आणि लोकशाही यंत्रणेचा गळा घोटला जात असेल अशा कुठल्याही ठिकाणी जाणे गैर समजतो.

आपल्या पत्राला आंबेडकरांकडून आलेले उत्तर वाचून करपात्रींना आश्चर्य आणि अवघड वाटले तरी आपले म्हणजे, एका साधू-महंत महाराजाचे आयुष्यात प्रथमच कोणी तरी ऐकले नाही अशी पराभूत मनोवृत्ती लपवून त्यांनी पत्र लिहून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला येण्याची तयारी तर दर्शवली परंतु आपल्या हयातीत एकदाही त्यांना भेटायला गेले नाहीत.आज भारतातील कुठल्याही प्रांतातील कुठल्याही राजकीय पक्षातील इतकेच नव्हे तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर राजकारण करत आपलं आयुष्य उजळून घेणारा विशेष म्हणजे जगातील एका आदर्शवत संविधानाची शपथ घेऊन संसद आणि विधिमंडळाची पायरी चढणारा एकही पुढारी,मी नेता म्हणत नाही कारण नेता म्हणवून घेण्याची लायकीच आज कुणाजवळ नाही. तर एकही पुढारी असा नाही जो कुण्या महाराजासमोर वाकत नाही. आणि असा एकही महाराज नाही जो पुढा-यांच्या अनैतिक व्यवहाराच्या संबंधात सामिल नाही.

जोपर्यंत धर्म आणि राजकारण ही दोन्ही क्षेत्रं एकमेकांना पूरक उद्योग करत राहतील तोपर्यंत जनतेचे हित टांगणीलाच राहणार यात यत्किंचितही शंका नसावी.हिंदू कोड बिलच्या माध्यमातून सर्व धर्मीय तमाम भगिनींना माणूस म्हणून जगण्याचा आणि आपले अस्तित्व राखण्याचा मान मिळवून देणा-या डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला तमाम माता भगिनींच्या वतीने कोटी कोटी प्रणाम !.

✒️लेखिका:-हेमलता वठारे

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED