समतेचे महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर!!

34

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम..

भारतीय संविधानाचे शिल्पकार, अर्थतज्ञ, स्त्री-उद्धारक , विचारवंत, तत्वज्ञ, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या तत्त्वावर राष्ट्राची उभारणी करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती (जन्म 14 एप्रिल 1891 मृत्यू 6 डिसेंबर 1956) बाबासाहेबांचा जन्म मध्यप्रदेशातील महू या ठिकाणी झाला .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारत देशाचे नाहीतर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आहेत.अस्पृश्य समजल्या गेलेल्या महार जातीत बाबासाहेबांचा जन्म झाला.लहानपणापासून अस्पृश्यतेचे चटके सहन करत करत वाढले.शाळेत गेल्यापासून अस्पृश्यता काय असते.अस्पृश्यतेने कसे वागवले जाते, हा संघर्ष मनात पेटता राहिला. व्हरांड्यात बसून शिक्षणाचे धडे घेतले.म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणास्थान आहे.विद्यार्थी जीवनात जर बाबासाहेबांचे चरित्र अभ्यासले तर नक्कीच त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार.

कारण शिक्षणामुळे आपली परिस्थिती बदलू शकते याची जाणीव त्यांनी नेहमी केंद्रस्थानी ठेवली म्हणून यशाचे उंच शिखर ते गाठू शकले. अस्पृश्यतेचे जे चटके आपल्याला बसलेत ते चटके इतरांना बसू नयेत यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने भारतातील प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य समता बंधुता न्याय मिळवून दिला. आज आपण जे काही स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते स्वातंत्र्य फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे आपल्याला मिळालेले आहे याची प्रत्येक भारतीय नागरिकांनी जाणीव ठेवावी.

त्यांच्या ज्ञानाला मर्यादा नव्हत्या, ते ज्ञानाचे महर्षी होते.त्यांनी अर्थशास्त्रात सर्वोच्च पदव्या मिळवल्या होत्या. भारतातील सर्वोच्च पद त्यांच्याकडे चालून आलेत पण त्यांना पदाची लालसा नव्हती. संपूर्ण मानव जातीचे कल्याण व्हावे एवढाच ध्यास त्यांना होता. शिक्षण क्षेत्रात त्यांनी मिळवलेल्या पदव्या त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतात. विद्वत्तेला शीलाची जोड असल्यामुळे एवढा मोठा पल्ला त्यांनी गाठला.बाबासाहेबांना विषमतेवर आधारलेली वर्णव्यवस्था मान्य नव्हती, डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की, प्रत्येक माणूस स्त्री असो वा पुरूष तो निसर्गतः स्वतंत्र्य आहे. कोणी कोणाला स्वातंत्र्य दिलं नाही कुणी कोणाचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही. समाजातील कोणत्याही एका गटाने दुसर्‍या गटावर कोणत्याही कारणास्तव अन्याय करू नये. प्रत्येक मानवाला जगण्याचा समान अधिकार आहे. त्यावेळेच्या चातुवर्ण व्यवस्थेबद्दल बाबासाहेबांना प्रचंड चीड होती.ब्राह्मण, क्षेत्रीय, वेश्य ह्या तीन वर्णांची सेवा अस्पृश्य समजल्या गेलेल्या शुद्राने करावी ही अन्यायकारक व्यवस्था त्यांना मान्य नव्हती.आपला देश समाज हा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या तत्त्वावर आधारलेला असावा. हिंदूच्या समाजव्यवस्थेत अस्पृश्यांना स्वाभिमानाने जगता येणे शक्य नाही.यासाठी समाजातील अन्यायकारक गोष्टी मुळासगट नष्ट झाल्या पाहिजे.

यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तरच तो संघर्ष करील .
डॉक्टर बाबासाहेबांचा संघर्ष हा केवळ राजकीय किंवा नागरी हक्कासाठी नव्हता तर माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी त्यांचा संघर्ष होता. माणसाला माणूस म्हणून जगायचे असेल तर त्याला जगण्यासाठी सामाजिक अधिकार, आर्थिक अधिकार व संधी मिळाल्याशिवाय त्याचे जगणे शक्य नाही असा त्यांचा विचार होता. आपल्या अधिकारासाठी आपण स्वतः संघर्ष केला पाहिजे.लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृतभारत, जनता, प्रबूद्धभारत इत्यादी वृत्तपत्रद्वारे प्रबोधनास सुरुवात केली.सार्वजनिक कामासाठी त्यांनी संस्था सुरू केल्या.
जातीव्यवस्था,वर्णव्यवस्था,स्त्री पुरुष समानता यामुळे समाजामध्ये अन्यायकारक व्यवस्था होती.जी काही नैसर्गिक संसाधने आहेत.त्याचे समान वाटप नसल्यामुळे शूद्रातिशूद्र यांचे जगणे असह्य झाले होते.माणूस म्हणून जन्माला येऊन पशुपेक्षा हिन दर्जाची वागणूक समाजातील काही घटकांना दिली जात होती.अस्पृश्यांना समाजामध्ये हिन वागणूक दिली जात आहे याची त्यांना जाणीव व्हावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.ज्या तळ्यावर पशुपक्षी पाणी पीत होते.पण शुद्रांना पाणी पिण्यास मज्जाव होता. चवदार तळ्याचा सत्याग्रह हा माणसाला माणूस म्हणून जगण्याची जाणीव करून देण्यासाठी केलेला सत्याग्रह होय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश असेल,मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी हा सत्याग्रह नव्हता तर प्रत्येक माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळते का?याची जाणीव करून देण्यासाठी हा सत्याग्रह होता.आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागतो ही शिकवण यातून अस्पृश्यांना मिळाली. हिंदू असून अस्पृश्यांना हिंदू धर्मात जी वागणूक मिळाली ती अपमानास्पद होती म्हणून डॉक्टर बाबासाहेब म्हणतात.

” हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ” धर्माला त्यांनी धर्म म्हणून स्वीकारल नाही तर धम्म म्हणून स्वीकारल. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या तत्व प्रणालीचा स्वीकार केला.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर येथील 20जुलै1942 सभेत स्त्रियांना संबोधित करताना सांगतात की, स्त्रियांनी जबाबदारीने वागावे,आपल्या मुला-मुलींना सर्व सुविधा द्याव्यात, मुलामुलींना खूप शिकवा.त्यांना महत्वकांक्षी बनवा,योग्य त्या वयात त्यांची लग्न करा,लग्नाची घाई करू नका, लग्न ही एक जोखीम आहे.लग्नानंतर मुलीने आपल्या पतीबरोबर मैत्रिणीप्रमाणे राहावे.लग्न करणाऱ्यांनी जास्त मुल जन्माला घालू नये.कुटुंब नियोजनाविषयी डॉक्टर बाबासाहेब आपले विचार मांडतात. त्यांच्या विचाराचे तंतोतंत पालन झाले असते तर लोकसंख्येचा विस्फोट झाला नसता, स्त्रियांच्या संघटनेवर डॉक्टर बाबासाहेबांचा खूप विश्वास होता.स्त्रियांना विश्वासात घेऊन समाजाची सुधारणा केली पाहिजे असा त्यांचा विचार होता. प्रत्येक मुलीने आपल्या पतीची त्यांच्या कार्यात साथ द्यावी, सहकार्य करावे परंतु पती जर गुलामासारखे वागवत असेल तर आपण ती गुलामी झुगारून द्यावी. सन्मानाने, स्वाभीमानाने जगावे. देशाची प्रगती ही स्त्रियांवर अवलंबून आहे, एखादा देश प्रगतीपथावर आहे की नाही हे तेथील स्त्रियांच्या प्रगतीवर अवलंबून आहे. ज्या देशात स्त्रियांची प्रगती अधिक तो देश प्रगत समजावा.ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना हीन दर्जाची वागणूक दिली ती मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेबांनी जाळून टाकली. स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन, प्रसूती रजा, मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला आहे.

डॉक्टर बाबासाहेबांचा स्त्रियांच्या कर्तुत्वावर विश्वास होता म्हणून त्यांनी स्त्रियांना संपूर्ण सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी 24 फरवरी 1949 रोजी हिंदू कोड बिल संसदेत मांडले, हिंदू धर्मातील स्त्रियांसाठी समानतेचा मसुदा तयार केला होता.हिंदू कोड बिलासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 वर्ष सहा महिने 26 दिवस काम केले होते.हिंदू कोड बिलात विवाह, विधवा पुनर्विवाह, पोटगीचा अधिकार, घटस्फोटाचा अधिकार, दत्तक विधान कायदा इत्यादी कायद्याचा समावेश होता.
हिंदू कोड बिलाला त्यावेळेच्या सुशिक्षित समजल्या गेलेल्या उच्चवर्णीय पुरोगामी विचारांच्या लोकांनी विरोध केला. शंकराचार्य ब्रह्मानंद सरस्वती, स्वामी करपात्री, शंकराचार्य जेरेशास्त्री, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा ही विरोध होता. जेरेशास्त्री यांनी तर कहरच केला ते म्हणाले की, हिंदू कोड बिलामध्ये सख्या बहिण-भावाचा विवाह लावण्याचे कलम आहे. त्याकाळातील सनातनी मंडळीना वाटलं असाव की, हजारो वर्षे स्त्रियांना आम्ही गुलामगिरीत ठेवलं,आमचा वर्ण जात नष्ट होऊ नये यासाठी प्रयत्न केले आणि डॉक्टर बाबासाहेब जे की अस्पृश्य आहे ते हा कायदा पास करून स्त्रियांना हक्क अधिकार देत आहेत.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की,ज्या स्त्रीयांसाठी मी लढलोत्या स्त्रियांनी थोडी ताकद दाखवली असती तर हिंदुकोडबील पास झाले असते.परंतु स्त्रियांच्या दुर्बलतेचा फायदा पुरुषानी घेतला.असो हिंदू कोड बिल त्यावेळी पास झाले नसले तरी आजपर्यंत स्त्रियांच्या हक्कासाठी जे काही कायदे होत आहेत.ते हिंदू कोड बिलातील कायदे आहेत. याची आधुनिक स्त्रियांनी जाणीव ठेवावी. आपला उद्धारकर्ता कोण? याची आपल्याला जाणीव असावी.डॉक्टर बाबासाहेबांचा जातिव्यवस्थेमुळे प्रचंड छळ झाला, जातीव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय एकसंघ राष्ट्रनिर्माण होणार नाही असे ते म्हणतात. बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत साकार करण्यासाठी आपल्याला सर्व महापुरुषांना जातीच्या चौकटीतून बाहेर काढावे लागेल,तरच महापुरुषांच्या स्वप्नातला भारत साकार होईल.

✒️लेखिका:-श्रीम. मनिषा अंतरकर (जाधव)
saiantarkar@gmail.com