अभिवादानाचा अनोखा उपक्रम -14 तास अभ्यास- विकासाचा ध्यास

14 एप्रिल ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिवस- जयंती उत्सव गावा गावापासून तर देशभर देशाबाहेर साजरा केला जातो. महामानवास अभिवादन केले जाते. 14 एप्रिल ला सरकारी सुट्टी त्यामुळे सरकारी कार्यालयात प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन एवढ्या पुरता कार्यक्रम होतो. अर्थातच काही ठिकाणी चर्चा वगैरे आयोजित केली जाते. समाजात ज्या प्रकारे उत्साहात जयंती साजरी केली जाते तशी सरकारी कार्यालयात अपवादानेच होते.

2. मी 22 सप्टेंबर 2008 ते 29जुलै 2010 या पावणे दोन वर्षे संचालक समाज कल्याण पुणे येथे होतो. विचार केला, जयंतीची- 14 एप्रिल ची सरकारी सुट्टी आहे . यासाठी की या दिवशी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी कार्य व त्याचे जीवन नीट समजून घ्यावे. अनेक ठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी होता यावे यासाठी सुट्टी आहे, वीकएंड साठी नाही.

3. समाज कल्याण विभागाची निर्मिती बाबासाहेब यांच्यामुळे झाली. सुरुवातीला मागासवर्गीयांचे कल्याण या नावाने हा विभाग सुरू झाला. समाज कल्याण विभागाच्या निर्मितीचा इतिहास आहे. आता हा सरकारचा सामाजिक न्यायाचा विभाग झाला आहे. तेव्हा, या विभागाने 14 एप्रिल 14 तास साजरी केली तर,ज्या उदेशाने सरकारने सुट्टी दिली आहे तो उद्देश थोडाफार का होईना साध्य होईल आणि बाबासाहेब यांचे विचारांचा जागर करताना आपलेही ही आत्मचिंतन होईल, नवीन ऊर्जा , नवीन संकल्प ,मजबूत टीम तयार होऊन चांगले प्रशासन करता येईल असा विचार मी केला.

4. संचालक म्हणून सहकारी अधिकाऱ्याशी चर्चा केली. सूर निघाला की आतापर्यंत कधीही 14 तास जयंती झाली नाही. दुसरे असे की सरकारचे असे आदेश नाहीत की14 तास जयंती करा. 14 एप्रिल सुट्टीचा दिवस आहे तेव्हा 14 तास जयंती कशाला? मी ठरविले, की 14 तास जयंती साजरी करून त्यांचे विचारांचा जागर महाराष्ट्रभर करायचा . त्यानुसार जाणीवपूर्वक कृती करण्याचा प्रयन्त करायचा. हेच खरे बाबासाहेबाना अभिवादन ठरेल. पूर्वी झाली नाही म्हणून करू नये असे काही नाही. सरकारने कुठे सांगितले 14 तास जयंती करू नका म्हणून ? सुट्टी कशासाठी? संचालक म्हणून परिपत्रक काढले. उद्देश लिहला आणि कार्यक्रम रूपरेषा ठरविली. जिल्हा/ विभाग कार्यालये, वसतिगृह , आश्रमशाळा यासाठी कार्यक्रम आखणी विभागीय व जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांवर सोपविले .मात्र,” 14 तास अभ्यास आणि विकासाचा ध्यास” या नावाने उपक्रम केला पाहिजे असे ऐच्छिक बंधन घातले. 14 एप्रिल2009 व 2010- दोन्ही वर्ष केला. पहिल्या वर्षी प्रतिसाद कमी होता. मात्र, या उपक्रमामागील भूमिका समजल्यामुळे दुसऱ्या वर्षी 14 एप्रिल2010 ला प्रचंड उत्साहात सलग 14 तास सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत जयंती साजरी झाली.ह्या बाबतचा पत्रव्यवहार कार्यालयात उपलब्ध असेलच. जे अधिकारी त्यावेळी कार्यरत होते त्यांना माहीत आहे.

5. सर्व अधिकारी कर्मचारी या अनोख्या उपक्रमात स्वइच्छेने सहभागी झालेत. बाबासाहेबांचे जीवन व कार्य यावर माहिती देणेसाठी ,माझ्या आठवणी प्रमाणे पुणे येथील संचालनालय येथील कार्यक्रमात उल्हास जी पवार, संजय जी आवटे, mkcl चे देशपांडे जी, अरुण जी खोरे यांना निमंत्रित केले होते. या उपक्रमाचे उदघाटन अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका चे देवणीकर साहेब यांचे हस्ते झाले. मधल्या वेळेत, ज्ञानेश्वर हॉस्टेल व जनाबाई हॉस्टेल चे मुलामुलींनी अभिवादन रॅली काढली, बाबासाहेब यांचे पुतळ्या पर्यन्त.

6. या उपक्रमात, समाज कल्याण विभाग राबवित असलेल्या महत्वाच्या योजनांच्या यश अपयशाची चर्चा, मी कसा घडलो, शोषित वंचितासाठी मी काय करू शकतो, विभागाची कामगिरी व प्रतिमा कशी उंचावयाची , समाज घटकांशी संवाद, त्यासाठी सुरू केलेले कार्यक्रम कसे लोकाभिमुख करता येतील , या व अशा विषयांवर मुक्त चर्चा झाली, अधिकाऱ्यांनी विषयांचे सादरीकरण केले. अनेकांनी मनोगत मांडले, अनुभव कथन केले. गोष्टी सांगितल्या. अतिशय मनोरंजनात्मक पद्धतीने जयंती साजरी झाली. “बाबासाहेब “यांचे विचार खरं तर शासन प्रशासनातील कर्मचारी अधिकारी यांचे मध्ये रुजविणे फार गरजेचे आहे असे मला वाटल्यामुळे हा उपक्रम आम्ही आमचे अधिकाराचा वापर करून आयोजित केला. करतो म्हटलं तर होऊ शकते. इच्छाशक्ती , धाडस दाखवावे लागते. आम्ही करून दाखविण्यात थोडेफार यशस्वी झालोत. असे चांगले उपक्रम सुरू करण्याला किंवा सुरू ठेवण्याला काही व्यक्ती विरोध करत असतातच. आपण मात्र चांगले घडावे यासाठी सतत कार्यरत राहिले पाहिजे.

7. त्यावेळचे उपसंचालक( प्रशासन) राजेंद्र कलाल आणि विभागीय समाज कल्याण अधिकारी पुणे उमाकांत कांबळे यांनी खूप मेहनत घेऊन छान ,नीटनेटके ,साजेसे, यशस्वी आयोजन केले. योजनांची विकास प्रदर्शनी लावण्यात आली होती. काहींची नेहमीप्रमाणे कुरकुर तेव्हाही सुरू होती. होतच असते. राज्यात सर्वत्र हा उपक्रम विभागीय समाज कल्याण अधिकारी यांचे मार्गदर्शनात जिल्ह्याचे अधिकारी ,वार्डन यांनी परिणामकारक रित्या राबविला. एक दशकांपूर्वी राबविलेल्या हा उपक्रम जयंती ची आठवण करून देतो. सर्वांचे आभार आणि शुभेच्छा,साथ दिल्याबद्धल, आजही मानतो.

8. वर्ष 2010 हे महाराष्ट्र राज्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुद्धा होते. संचालक समाज कल्याण विभाग( मरा) पुणे हा सरकारचा एकमेव राज्यस्तरीय विभाग असेल ज्यांनी त्यांचे प्रशासकीय नियंत्रणातील सर्व ठिकाणी 14 तास अभ्यास विकासाचा ध्यास हा उपक्रम सलग 14 तास राबवून बाबासाहेबाना अभिवादन केले. मी संचालक पदाच्या अधिकाराचा वापर केला, पुढाकार घेतला आणि आदेश काढला. हे समाज कल्याण विभागाच्या इतिहासात पहिल्यांदा घडले आणि राज्यात सुद्धा. यापूर्वी कधीही कुठेही सरकारी कार्यालयात 14 तास सलग जयंती झाल्याचे मी तरी ऐकले नाही . माझी बदली झालेवर मात्र बाबासाहेबांच्या विचारांच्या जागराचा हा उपक्रम समाज कल्याण विभागाने खंडित केला. पुन्हा सुरू झाला तर चांगले होईल. बाबासाहेबाना सीमित न करता , देशात सर्वत्र व सर्वांपर्यंत, वस्तीवस्तीत, कार्यालयात, शाळा- महाविद्यालयात, समाजात, सगळीकडे पोहचविणे आणि सीमेबाहेर सुद्धा घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. चांगले सांगत असताना चांगले करून दाखविणे आवश्यक आहे. हे आपले कर्तव्य आहे.

9. डॉ बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरुषाचे विचार आदर्श समाज घडविण्यासाठी आधुनिक भारत निर्माणा साठी अंगिकारने व त्यावर अंमल करणे आजची गरज आहे, उद्याचे भविष्य सुनिश्चित करणेसाठी, येणाऱ्या पिढिच्या भल्यासाठी. तेव्हा सरकारने आदेश काढून हा उपक्रम दरवर्षी सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, सर्व कार्यालये चे ठिकाणी 14 तास जयंती साजरी करण्याचे निर्देश द्यावेत. या माध्यमातून ,बाबासाहेबांच्या कार्याची महानता कळेल, संविधानिक मूल्ये रुजविली जातील . शासन- प्रशासनात छान टीम तयार होऊन चांगले प्रशासन करण्यास व न्यायाचे काम करण्यास हा उपक्रम प्रेरणा देतो. शक्ती देतो.मनोबल वाढवितो आणि स्वाभिमान जागृत करतो. संविधानाची शपथ हेच करायला प्रेरित करते. सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वृद्धिंगत करते.

10. हा उपक्रम चांगुलपणा शिकविते आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपत माणुसकीने वर्तन करण्याची शक्ती देते. खरं तर राष्ट्र निर्माणाच्या दिशेने हे एक पाऊल आहे. तेव्हा, सरकारने विचार करावा ही विनंती आहे. माझे पुस्तक “आणखी एक, पाऊल” आणि” प्रशासनातील समाजशास्त्र ” या मध्ये या उपक्रमाबाबत सविस्तर लिहिले आहे. मी विचारवंत अजिबात नाही. मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा एक अनुयायी म्हणून मी माझ्या 29 वर्षाच्या प्रशासकीय सेवेत ,सनदी अधिकारी म्हणून अनेक नवनवीन उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला. यश अपयश येते जाते, प्रयत्न करीत राहिले पाहिजे.

राष्ट्र निर्माते ,संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आणि जयंतीच्या सर्वांना मंगल कामना- शुभेच्छा।

✒️लेखक:-इ झेड खोब्रागडे, भाप्रसे निसंविधान फौंडेशन, नागपूर
14 एप्रिल2021.

नागपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED