भारतीय बौद्धधम्माचे पुनरुज्जीवक !

(विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्म दिन)

भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार व दिशा देण्याचे भरीव काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषणमुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब प्रेरणादायी ठरले आहेत. जगाच्या इतिहासात असे योगदान देणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये त्यांचे स्थान अग्रणी आहे, असे डॉ.गेल ऑमवेट सांगतात. सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकारासाठी त्यांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता – लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप. बाबासाहेबांना बालपणापासून अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. इ.स.१९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत त्यांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत. हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात ‘पाठ्यपुस्तक’ म्हणून वापरले जाते.

डॉ.भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य-दलित लोकांचा होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्धधम्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते, असेही म्हणतात.

डॉ.आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ होते. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” असे त्यांनी लिहिलेले आहे. प्राचीन हिंदू समाजातील जातीच्या नियमांनुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता तर केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाली होती. शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल असा विचार करुन आंबेडकरांनी शैक्षणिक कामे केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मते हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. यामुळे त्यांचे उच्च जाती हलक्या प्रतीची कामे स्वतः न करता कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत. त्यांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे, याची जाणिव करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बहुजनांना “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” असा संदेश दिला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी.पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले.

त्यांच्या सुरुवातीच्या कारकीर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले. वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. इ.स.१९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स.१९९० मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. १४ एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो. इ.स.२०१२ मध्ये ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे संस्कृतीत केली गेली आहेत.
नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे काम झाल्यावर बाबासाहेब दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात दि.२० नोव्हेंबर १९५६ ला ते नेपाळमधील काठमांडूला ‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट‘च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी ‘बुद्ध की कार्ल मार्क्स‘ या विषयावर भाषण केले.

त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांत भाग घेतला. त्यानंतर त्यानी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या ‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म‘ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी दि.६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीस निश्चित केले गेले.
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे बाबासाहेबांना व अनेक कार्यकर्तृत्वांना त्यांच्या पावन जन्म दिनी विनम्र अभिवादन !!

✒️लेखक:-निकोडे कृष्णकुमार गुरुजी,
(मराठी व हिंदी साहित्यिक)मु. पोटेगावरोड, पॉवर स्टेशनच्या मागे, गडचिरोली.जि. गडचिरोली, मो.नं. ७७७५०४१०८६.

गडचिरोली, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED