जल्लोषात जंयती केव्हा साजरी होईल?

32

भिम जयंती अर्थात १४ एप्रिल हा दिवस भारताच नव्हे भारता बाहेर सुद्धां मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. आणि त्याचे कारणही तसेच आहे. हजारो वर्षापासून असलेली मानसिक गुलामी तोडून माणसाला माणूस म्हणून वागणूक दिली, अंधार आणि अज्ञानात फसलेल्या मानवाला शिक्षणाचा प्रकाश देऊन विज्ञानाचा मार्ग दिला. ज्याला झोपडी बांधण्याचा अधिकार नव्हता त्यांना बंधले बांधण्याची ताकद निर्माण करून दिली, ज्यांना गावात प्रवेश नव्हता त्यांच्या हाती गावाचा कारभार दिला, चाकरी करण्यात ज्यांचे आयुष्य निघून जायचे त्या चाकरी लोकांना अधिकारी होण्याची सुविधा करून दिली, ज्यांची ओळख जातीवरून होत होती त्यांना सन्मानाची नावे दिली.

दुरडी मधील गरम भाकर खाण्याचा अधिकार नसलेल्या महिलेल्या घरासोबत गावाचा कारभार बघण्याची संधी दिली, ज्यांना कमरेला झाडू होते त्यांच्या हातात लेखनी दिल्या, ज्यांना अंग झाकायला कपडे नव्हते त्यांना सुटाबुटात आणले, ज्यांना शिक्षण, संपती आणि प्रगतीचे रस्ते बंध होते तेथेच त्यांच्या शिक्षण संस्था उभ्या राहून जिवनात भरभराट आली, ज्यांना गुमामाचे आणि लाचारीचे जिवन जगावे लागत होते त्यांचा स्वाभिमान आणि स्व सन्मान जागृत करून मानुस बनवले. आणि हे सर्व काही करताना फुकटात नाही मिळाले तर त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खुप मोठा संघर्ष करावा लागला, आपल्या कुटूंबाकडे दुर्लक्ष करून सर्व सामान्य लोकांच्या भविष्याची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केली. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान आहेत आणि राहतील. मानवाच्या जिवनाला अद्भुत कलाटणी देऊन, विकासाची सर्व रस्ते सर्वांसाठी कायम खुली करून दिली आणि माणव प्रगतीकडे वाटचाल करू लागला. एवढी मोठी क्रांती रक्ताचा एकही थेंब न सांडू देता केल.

त्यांनी त्याग आणि समर्पण केले म्हणून आमचा थाट आहे. आणि याची जाणीव म्हणून भिमंयतीचा आनंद खुप मोठा आहे. जयंती चा आनंद प्रत्येकाला असायलाच पाहिजे, परंतू जयंती साजरी का करायची याचा उद्देश सुद्धा स्पष्ट पाहिजे. आज पर्यंत आम्ही एकच दिवस धुमधडाक्यात जयंती साजरी केली, डिजे, ढोल, तासे यांच्या तालावर भान हरवून नाचलो. नाचण्यामागे आनंद होता. आज आमचे चे अस्तित्व, आमचा स्वाभिमान, आमचा रुबाब, दरारा फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आहे म्हणून तो आनंद नाचण्यातुन एक दिवस व्यक्त केला जात होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची, समर्पणाची आणि त्याची जाणीव खुप कमी लोकांना आहे. जयंती च्या माध्यमातून समाजापर्यंत त्यांचे कार्य जाऊन, ज्या घटकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जिवाचे आणि जिवनाचे राण केले त्यांना तरी जागृत करणे हे जयंती साजऱ्या करणाऱ्या लोकांचे महत्त्वाचे काम होते. फक्त तालावर नाचले म्हणजे जयंती जल्लोषात साजरी होत नाही. जातीच्या उच्चाटनासाठी आणि सर्वांगीण मानवी विकासासाठी लढा देणाऱ्या महापुरुषालाच एका जातीत बंद करून ठराविक लोकांचा कैवारी बनवून ठेवले, यापेक्षा बौद्धिक अपंगत्व कोणते असेल? मानवाच्या कल्याणासाठी मुलभूत अधिकार बहाल करताना तर कोणत्याही जातीचा विचार बाबासाहेब आंबेडकर यांनी केला नाही, मुलभूत अधिकार सर्वांना सारखेच दिले.

कोणत्याही जाती धर्माचे देशात वर्चस्व मान्य केले नाही वा कोणत्याही जातीधर्माला विषेश महत्त्व दिले नाही, प्रतत्येकाला देशाच्या बांधणीसाठी योगदान देण्याचे कर्तव्य सुद्धा बहाल करून दिले. परंतु आमच्या डोक्यात जातीयता एवढा ठासून भरलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की एकाच जातीचे उद्धारक म्हणून आपल्या बुद्धीची गरीबी दाखवून देतात. मी पहिले आणि अंतिम भारतीय आहे असे म्हणणाऱ्या आणि त्याप्रमाणे वागणाऱ्या महापुरुषाला जातीत बंद करून आपण कोणता तिर मारतो हेच कळत नाही. एकिकडे देशासाठी आणि देशातील नागरिकांसाठी आपल्या आयुष्य खर्ची करणाऱ्या महापुरुषाला जातीत बंद केले आणि एकाच जातीचे लोक नाचत असतील तर त्यांना हे मान्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकाच जातीचे मसिहा आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांना संकुचित करून नाचण्यात पुरूषार्थ समजणारे लोक बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कधीच आनंदाने साजरी करू शकणार नाहीत.

सुरवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मिळालेल्या सुख सुविधाचा फायदा सर्व सामान्य लोकांना मिळत होता म्हणून त्यावेळी नाचणे सहाजिक होते हे आपण मान्य करू परंतु आजही काही लोक जयंती धुमधडाक्यात साजरी करायची म्हणून ओरडत आहेत. आज जयंती धुमधडाक्यात साजरी करायची म्हणजे नेमके काय करायचे याचा आढावा घेतला तर तेच उत्तर मिळाले की डिजे, ढोल यांच्या तालावर नाचणे म्हणजे धुमधडाक्यात जयंती साजरी करणे. आज खरचं नाचून जयंती साजरी होणार का? ज्यांना मत व्यक्त करण्याचा अधिकार नव्हता त्यांना मताधिकार देऊन देशाचा राजा बनण्याचा अधिकार बाबासाहेब यांनी दिला. परंतु ईव्हिएमने तो हिरावून घेतला, ईव्हिएममुळे कोणालाही मत दिले तर एकाच पक्षाला जाते, ईव्हिएमने एकाच पक्षाच्या नेत्याकडे आढळतात, मोठ्या कष्टाने मिळवून दिलेला मताधिकार क्षणात काढून घेतला आणि आम्ही नाचतो आहोत. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षणाची सोय करून देऊन प्रत्येकाला समान शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली गेली परंतु खाजगी शाळेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाची किंमत लाखोंच्या घरात गेली, तरी आम्ही नाचतो.

संविधानाच्या माध्यमातून विशिष्ट शिक्षण पुर्ण झाल्यानंतर शासकीय नोकरी देण्याची जबाबदारी शासनाची आहे म्हणून शासनाने संविधानाला न जुमानता प्रत्येक क्षेत्राचे खाजगीकरण करून सार्वजनिक क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती सुरू केली याचा आनंद तर वाटत नाही ना! संविधानाला डोक्यावर घेऊन आमच्या बापाने आमच्या साठी लिहले म्हणणाऱ्यांनी संविधान कधी वाचले का? आणि संविधान वाचले असेल तर कळाले का? संविधानाला स्वतः ची संपती समजणारे काही लोक आहेत चांगली गोष्ट आहे परंतू संविधाना नुसार कोणतेच काम होत नाही तर या गोष्टी ची चिड कोणाला का येत नाही? भारत हा धर्मनिरपेक्ष देश असुन मानसाला महत्त्व दिल्या गेलेले असताना आज देशात धर्मांधता वाढली आहे याचा आनंद साजरा करून नाचायचे का? जयंती साजरी करताना आनंद तेव्हाच होईल जेव्हा आपल्या महापुरुषांनी कमावलेली मालमत्ता किमान जेवढे आहे तेवढीच राहील. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली व्यवस्था जवळजवळ शेवटच्या घटका मोजत असताना आम्ही नाचण्यात गुंग झालो तर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभ्या केलेल्या व्यवस्थेचे काय? बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्षातुन उभ्या केलेल्या लोकशाहीचे संवर्धन नाचण्यातुन होणार का? संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार फक्त नावालाच उरले आहेत.

मुलभूत अधिकाराचा आज उपभोग घेता येत नाही, मत व्यक्त करता येत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून आपल्या मता नुसार राहता येत नाही. शिक्षण आरोग्य तर आज मृत्युशयेवर पडलेले दिसत आहे, सार्वजनिक संपती विकल्या जात आहेत, शिक्षणातील गुणवत्ता काढून बाजारीकरणाची फक्त जाहिरात केली जात आहे, भारतीय बांधव असलेल्या देशामध्ये जाती धर्माचे तुकडे तूकडे झालेले आहेत. महिलांना न्याय मिळत नाही, महिलांचे प्रतिनिधित्व फक्त नावाला उरले आहे. आरक्षण शेवटच्या घटका मोजत आहे. शासकीय नोकरी जवळपास बंदच झालेली आहे, महिलांवरील बलात्काराच्या वेळी जात बघुन न्याय मागितला जात आहे. लोकशाही मध्ये जनता राजा असुन प्रतिनिधी गजगंड संपतीचे मालक तर जनता भिकारी होत चालली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही मानसाच्या आणि देशाच्या हिताचे निर्माण करून ठेवले ते सर्व आज बाजूला सारून वेगळी व्यवस्था निर्माण केली जात आहे. आणि आमच्या जर नाचण्यात धन्यता वाटत असेल तर याचा अर्थ देशाचे चे वाटोळे होत आहे ते आम्हाला मान्य आहे. संविधानाची अमंलबजावणी होत नाही याचा गर्व आहे असाच अर्थ होतो.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करायची असेल तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य समाजात पेरणे आवश्यक आहे. शिक्षण नोकरी आरोग्य आरक्षण कसे नाहीसे केले या विषयी जागृती करणे आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला काय काय दिले होते त्यांचे फायदे आम्हाला काय झाले आणि आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या नुसार देश चालत नाही संविधानानुसार देश चालवत नाहीत तर काय काय तोटे झाले हे सांगुन देशातील नागरिकांना जागृत करण्याचे काम करायला सुरुवात जरी केली तरी नाचुन जेवढी जयंती जल्लोषात साजरी होणार नाही तेवढी वैचारिक जल्लोषात साजरी होईल आणि जयंती साजरी करण्याचे, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात पोहचवण्याचे समाधान चेहऱ्यावर दिसेल आणि तोच सर्वोत्तम जयंती साजरी केल्याचा आनंद असेल.

जगातील सर्वात मोठ्या विद्वानाच्या आणि जगातील सर्वात मोठ्या घटना काराच्या जयंती निमित्ताने समस्त भारतीयांना मंगलमय सदिच्छा..

✒️लेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते(रा. आरेगांव ता. मेहकर)मोबा:९१३०९७९३००