भारतरत्न,विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीदिनी महामानवाला कवितांनी आदरांजली

28

🔹राष्ट्र सेवा दल,शिक्षक भारती,शिक्षक साहित्य संमेलन संस्था,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाण,महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ यांचे संयुक्त विद्यमाने अॉनलाईन कविसंमेलन

✒️नेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नेरी(दि.16एप्रिल):-डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त दि.१४ एप्रिल २०२१ रोजी गुगल मीटवर कविसंमेलनाचा कार्यक्रम राष्ट्र सेवा दल,शिक्षक भारती,शिक्षक साहित्य संमेलन संस्था,महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.

कविसंमेलनाचे उद्घाटन शिक्षक साहित्य संमेलन संस्था,मुंबईचे अध्यक्ष जयवंत पाटील यांनी केले.कविसंमेलनाचे अध्यक्ष कवी अरुण झगडकर होते.प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह व शिक्षक भारती नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे,सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक ॲड.भूपेश पाटील,प्रकाश ब्राह्मणकर,नागपूर विभागीय अध्यक्ष,शिक्षक भारती नागपूर विभाग हे उपस्थित होते.

उद्घाटक जयवंत पाटील सरांनी मराठवाडा विद्यापिठ नामांतर आंदोलनातील आठवणी आणि त्यात गायले जाणारे गीत घरघरतं वं जातं….हे गीत सादर केलं.बंडोपंत बोढेकर सर यांनी साहित्य हा समाजजीवनाचा आरसा असल्याचे प्रतिपादन केले.त्यांनी त्यांच्या पुस्तकातील महासुर्य हा अभंग सादर केला.

भाऊराव पत्रे यांनी उपक्रमाचे कौतूक केले.त्यांनी धन्य भीम भगवान हे तुकडोजी महाराजांनी बाबासाहेबांवर लिहिलेले भजन सादर केले.ॲड.भूपेश पाटील यांनी बाबासाहेबांच्या चळवळीला साहित्याने खूप मोलाची साथ दिली आहे.अशी कविसंमेलने ही चळवळीला पोषक असल्याचे प्रतिपादन केले.प्रकाश ब्राह्मणकर यांनी घराघरात लिहिणारे आणि वाचणारे तयार झाले पाहिजे असा आशावाद व्यक्त केला.

कविसंमेलनात ज्येष्ठ कवी भानूदास पोपटे,कवयित्री सोनाली सहारे,कवी सतिश डांगे,कवयित्री सविता पिसे,सुरेश डांगे,भाऊराव पत्रे,बंडोपंत बोढेकर,विरेनकुमार खोब्रागडे यांनी कविता सादर केल्या.कविसंमेलन अध्यक्ष अरुण झगडकर यांनी अॉनलाईन कविसंमेलनाच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्याच्या उपक्रमाचे कौतूक केले.

प्रास्ताविक राष्ट्र सेवा दल मंडळ सदस्य,शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे विभागीय कार्यवाह सुरेश डांगे यांनी केले.सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कवी विरेनकुमार खोब्रागडे यांनी केले.अॉनलाईन कविसंमेलनाला रविंद्र उरकुडे,रामदास कामडी,नंदकिशोर शेरकी,कैलाश बोरकर,राजेश धोंगडे आदी उपस्थित होते.तंत्रसहाय्य नंदकिशोर शेरकी यांनी केले.