विवाहितेचा छळ करून घराबाहेर हाकलले- सात जणांवर गुन्हा

84

🔺हुंड्यात राहिलेल्या पैशांसाठी छळ.

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

मरखेल(दि.16एप्रिल):-लग्नातील हुंड्यात शिल्लक राहिलेले एक लाख रुपये माहेरहून घेऊन ये, तुला स्वयंपाक नीट करता येत नाही. या कारणासाठी वारंवार २५ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करणाऱ्या सासरच्या सात लोकांवर मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. लग्नानंतर ५ मे २०१७ पासून २७ मार्च २०२१ पर्यंत या विवाहितेचा छळ करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, दावणगीर येथील करिष्मा उमर फारुखपाशा पाळेकर (वय : २५) हिचे देगलूरच्या शांतीनगर येथील उमर फारुखपाशा खाजामियाँ पाळेकर याच्याशी ५ मे २०१७ रोजी रितिरिवाजाप्रमाणे लग्न करण्यात आले होते. लग्नाच्या दिवशी लग्नसोहळा पार पडल्यावर उमर फारुखपाशा पाळेकर (पती), रशियाबेगम खाजामियाँ पाळेकर (सासू), मुजीबुर रेहमान पाळेकर (भाया), अझहर नवाब पाळेकर (दीर), नूरजहान उमरसाब पाळेकर (आजी-सासू) सर्व (रा. शांतीनगर, देगलूर) व नणंद सलमाबेगम पाळेकर (नांदेड), रेश्माबेगम आसेर (रा. पुणे) या सात लोकांनी लग्नात सामान व्यवस्थित दिले नाही म्हणून नवरीला लग्नमंडपात सोडून पळून गेले.

यानंतर परत सासरी नांदायला गेलेल्या करिष्मा हिला आठ दिवस सुखाने नंदवून घेतल्यावर परत लग्नातील राहिलेले एक लाख रुपये माहेरहून घेऊन ये, तुला स्वयंपाक करता येत नाही. म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला. नणंद वगळता वरील लोकांनी २१ मार्च रोजी या विवाहितेला मारहाण करून तिचे दागिने, मुलं काढून घेऊन, तलाक देण्याची धमकी देत घराबाहेर काढल्याची तक्रार या विवाहितेने दिली आहे. याशिवाय पती उमर फारुखपाशा याने ता. (२७ मार्च) रोजी विवाहितेच्या माहेरी येऊन आई- वडिलांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी करिष्मा पाळेकर यांच्या फिर्यादीवरून मरखेल पोलिसांनी उपरोक्त सात लोकांवर गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास जमादार प्रभाकर गुडमलवार हे करीत आहेत.