संयम राखण्याची गरज

राज्यात कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालत आहे. मागील वर्षी आलेल्या लाटेपेक्षा ही लाट तीव्र आहे. राज्यात दररोज पन्नास हजारांहून अधिक लोक कोरोनाने बाधित होत आहेत. कोरोनाने मृत्यमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शासन, प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असूनही कोरोनाची साखळी तोडण्यात शासन, प्रशासनाला अपयश येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने विकएंड लॉक डाऊनचा प्रयोग करून पाहिला तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव थांबला नाही त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांची कडक संचारबंदी जाहीर केली आहे. अर्थात ही संचारबंदी मागील वर्षाच्या लॉक डाऊन इतकी कडक नसली तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ती पुरेशी आहे म्हणूनच या संचार बंदीचे स्वागत होत आहे.

सुरवातीला लॉक डाऊनला विरोध करणाऱ्या व्यापारी वर्गाने तसेच विरोधी पक्षांनीही या संचार बंदीला पाठिंबा दिला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक संचार बंदीशिवाय पर्याय नव्हता. कडक संचारबंदीमुळे काहींचा हिरमोड झाला आहे. विशेषतः ज्यांचे हातावर पोट आहे अशा गोरगरीब मोलमजुरांची या निर्णयामुळे निराशा झाली आहे. हजारो मोलमजुर विशेषतः परप्रांतीय मजूर पूर्ण लॉक डाऊन होईल या भीतीने आपल्या राज्यात जायला उतावीळ झाले आहेत. पण त्यांनी या कसोटीच्या वेळी संयम राखणे गरजेचे आहे कारण मुख्यमंत्र्यांनी संचार बंदीची घोषणा केली असली तरी हातावर पोट असणाऱ्या मोलमजुरांप्रति सहानुभूती व्यक्त करुन कोणीही उपाशी झोपणार नाही याची हमी दिली आहे. रोजी गेली तरी रोटी जाऊ दिली जाणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना तसेच फेरीवाले व रिक्षाचालकांना १५०० रुपये अर्थसहाय्य, गरिबांना ३ किलो मोफत रेशन देऊन त्यांच्या रोटीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी काही प्रमाणात सोडवला आहे शिवाय शिवभोजन थाळी मोफत करून राज्यात कोणीही उपाशी झोपणार नाही याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. रोजी गेली तरी रोटी जाणार नाही ही मुख्यमंत्र्यांची हमी दिलासाजनक आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभारच मानावे लागेल. आता संचार बंदी आणखी वाढू न देण्याची तसेच संचार बंदीचे रूपांतर कडक लॉक डाऊनमध्ये होऊ न देण्याची जबाबदारी राज्यातील प्रत्येक नागरिकाची आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी नागरिकांनी केली तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो. संचार बंदी लादली म्हणून नागरिकांनी हतबल न होता संयम राखायला हवा. नागरिकांनी संयम राखून कोरोनाचा मुकाबला केला, प्रशासनास सहकार्य केले तर कोरोनाविरुद्धचे हे युद्ध आपण जिंकू शकतो. संयम आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे हे राज्यातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आज परिस्थिती आणीबाणीची आहे. अशा आणीबाणीच्या वेळी राज्यातील जनता सरकारच्या मागे खंबीरपणे उभी आहे, हे दाखवण्याची हीच वेळ आहे.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५

पुणे, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED