मराठी भाषीक बालशिक्षण तज्ज्ञ : ताराबाई मोडक !

27

(ताराबाई मोडक जन्म दिवस)

प्रार्थना समाजामुळे प्रगत विचार आणि जीवनमान ताराबाईंच्या अंगवळणी पडले होते. त्यांच्या या अभिरुचिसंपन्न जीवनशैलीनेच त्यांना प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे बळ दिले. एकीकडे शिस्तबद्ध अध्ययन चालू असतानाच त्यांनी विविध छंद जोपासले. टेनिस, बॅडमिंटन तर त्या उत्तम खेळतच परंतु विविध विषयांवर वैचारिक देवाणघेवाण करण्यात त्यांना विशेष रस होता. कॉलेजमध्ये असतानाच त्यांचा परिचय के.व्ही.मोडक यांच्याशी झाला. ते एल्‍फिन्स्टन कॉलेजचे माजी प्राचार्य वामन मोडक यांचे चिरंजीव होते. ते कुटुंबही प्रार्थना समाजाशी बांधिलकी ठेवून होते. ताराबाई आणि के.व्ही.यांच्या ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले व पदवीधर झाल्यावर एका वर्षातच त्या के.व्ही.मोडकांशी विवाहबद्ध झाल्या. ते त्यावेळी अमरावती मुक्कामी होते आणि तिथे एक निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध झाले.

इ.स.१९१५ साली ताराबाई लग्न करून अमरावतीला आल्या, तेव्हा त्या तिथल्या पहिल्या स्त्री पदवीधर होत्या. त्यांचा संसार हा दोन आधुनिक, बुद्धिमान आणि प्रतिभावंतांचा संसार होता. अमरावतीच्या सामाजिक क्षेत्रात दोघांचाही दबदबा होता. सभा, संमेलनांतून उठबस होती. साहित्य, संगीत, नाटके, पाहुण्यांची सरबराई यात दिवस जात होते. याच दरम्यान त्यांच्या आयुष्याने एक वेगळीच कलाटणी घेतली.ताराबाई मोडक यांचा जन्म मध्यप्रदेशातील इंदूर येथे दि.१९ एप्रिल १८९२ रोजी झाला आणि बालपणही तिथेच गेले. त्यांचे आई-वडील प्रार्थना समाजाचे अनुयायी होते. त्यामुळे घरात प्रगत वातावरण होते. त्यांचे वडील सदाशिव पांडुरंग केळकर यांनी १९व्या शतकात ठरवून विधवेशी पुनर्विवाह केला होता. अशा या आधुनिक वातावरणात ताराबाई वाढल्या. या एक मराठी भाषीक आणि भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ज्ञ होत्या.

त्यांना भारताच्या मॉन्टेसरी म्हणतात. हे केळकर कुटुंब कालांतराने इंदूर सोडून मुंबईला स्थायिक झाले. पण ताराबाई व त्यांच्या बहिणीची रवानगी पुण्याच्या हुजूरपागेत झाली. पुनर्विवाहित आईची मुलगी म्हणून समाजाकडून त्यांना प्रसंगी हेटाळणीही सहन करावी लागली. शाळेच्या वसतिगृहात त्यांना प्रवेश नाकारला गेला. पण ताराबाईंना आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा कायमच अभिमान वाटत राहिला. शाळेत असताना त्यांनी वाचनालयाच्या ग्रंथपालांकडे भास्कराचार्यांचे ’लीलावती’ आहे का? अशी विचारणा केली होती. ग्रंथालयात ते पुस्तक नव्हते, पण ग्रंथपालबाईंना त्यावेळी या मुलीचे खूप कौतुक वाटले होते. याच दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि ताराबाई पुणे सोडून मुंबईला आल्या. इथे त्या एका इंग्रजी माध्यमाच्या अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कूलमध्ये जाऊ लागल्या. सुरुवातीला त्या शाळेत जायला नाराज होत्या. बूट घालण्यासारखे रिवाज त्यांना पसंत नव्हते.

पण लवकरच त्या शाळेत रुळल्या आणि पाश्चात्य समाजाच्या संपर्कात आल्या. सन १९१५साली अमरावतीला मुलींसाठी सरकारी हायस्कूल सुरू झाले. तेथे सन १९१८पर्यंत ताराबाईंनी नोकरी केली. सन १९२०मध्ये त्यांना मुलगी झाली. पुढे काही कारणांनी त्यांचा संसार अपयशी ठरला, त्यांनी विभक्त होण्याचा व अमरावती सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना मनाचा आत्यंतिक खंबीरपणा त्यांनी दाखवला. ज्या काळात नवऱ्याचे घर सोडणाऱ्या स्त्रीला फक्त परित्यक्ता असेच संबोधले जायचे. त्या काळात त्यांनी स्वतंत्र संसार थाटला. सोबत एक वर्षाची कन्या-प्रभा होती आणि पुढचे भविष्य अंधकारमय होते. पण त्यांना स्वावलंबी होण्यासाठी संधी लवकरच चालून आली. राजकोटच्या बार्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांना प्राचार्य पदासाठी बोलावणे आले. राजकोटची ही नोकरी उत्तम होती आणि त्यांच्यासाठी एक आव्हान होती. एकतर मुलुख गुजराती होता. त्यामुळे आधी शिकवणी लावून गुजराती शिकावी लागली. कॉलेजात नोकरीत असताना त्यांनी मानस शास्‍त्रावरील खूप पुस्तके वाचली. याच काळात त्यांनी गिजुभाई बधेका यांच्या भावनगर येथील शिक्षण प्रयोगांविषयी वाचले आणि त्या तेथे येऊन दाखल झाल्या.

गिजुभाई भावनगरमधील ‘दक्षिणामूर्ती’ या संस्थेत मॉन्टेसरी शिक्षणपद्धतीनुसार बालशिक्षणात प्रयोग करत होते. त्यांनाही त्यांच्या या कार्यात सहकारी हवाच होता आणि ताराबाईंच्या रूपाने तो मिळाला. ताराबाई स्वतः उच्चशिक्षित, शिकवण्याची कला, आवड असलेल्या आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एखादी गोष्ट स्वीकारली की, तडीस नेण्यासाठी झोकून देणाऱ्या होत्या. ताराबाई व गिजुभाईंनी शास्त्राचा आधार असणाऱ्या मॉन्टेसरी शिक्षणपद्धतीचा अभ्यास करून त्यांना भारतीय रूप देण्याचा प्रयत्न केला. आज बालशिक्षण एक शास्त्र म्हणून उदयाला आले आहे. पण त्याचे बीजारोपण करण्याचे काम गिजुभाईंबरोबर ताराबाईंनी केले. त्यामुळेच त्या त्यांना गुरुस्थानी मानत होत्या.
भावनगरमधील वास्तव्याने त्यांच्यातील लेखिकेलाही आकार दिला. सन १९२६ साली नूतन बालशिक्षण संघाची – मॉन्टेसरी संघाची स्थापना झाली आणि त्याच्यातर्फे ‘शिक्षणपत्रिका’ हे मासिक प्रकाशित होऊ लागले. या नियतकालिकाचे संपादन ताराबाईंनी केले. या मासिकाची हिंदी आणि मराठी आवृत्ती त्यांच्या बळावरच उभी राहिली. इथे असतानाच त्यांनी शंभरच्यावर पुस्तकांचे संपादन केले, काहींचे लेखन केले.

बालशिक्षणाच्या प्रसारासाठी मॉन्टेसरी सम्मेलने भरवली आणि बालशिक्षण हे त्यांचे कार्यक्षेत्रच बनून गेले. त्या भावनगरविषयी म्हणतात, “तेथेच मला माझे गुरू, जीवनदिशा व जीवनकार्य गवसले.” या काळात त्यांनी फक्त मॉन्टेसरींच्या तत्त्वांचा अभ्यासच केला नाही, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय संदर्भानुसार त्यांत बरेच बदल केले. आपल्याकडे शिक्षणाला पावित्र्याची किनार आहे. याचा विचार करून बालघरांचे रूपांतर बालमंदिरांत केले. बालशिक्षणात भारतीय नृत्यप्रकार, कलाप्रकार, लोकगीते आणि अभिजात संगीत यांचाही समावेश केला. हे तत्त्व बालकांच्या विकासाबरोबरच त्यांच्या स्वातंत्र्याला प्राधान्य देते. प्रयोग सुरू असलेला काळ हा स्वातंत्र्ययुद्धाचा होता. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य व बालस्वातंत्र्याला विशेष अर्थ होता. त्यांनी या सर्व विचारांचा, संकल्पनांचा मेळ आपल्या बालशिक्षणात साधला. बशत प्रयोग आणि त्याचा प्रसार करत असतानाच ताराबाईंनी शिक्षकांचे प्रशिक्षण हाती घेतले. त्यापाठोपाठ बालशिक्षण तळागाळापर्यंत जाण्यासाठी पालक आणि शासन यांच्या प्रबोधनाचे कामही केले. इतके सगळे करूनही त्यांना आता ध्यास लागला होता तो खेड्यातील बालशिक्षणाचा!खेड्यांमध्ये बालशिक्षणाचा प्रसार करायचा असेल, तर त्यासाठी स्वस्त साधने हवीत, शिवाय स्थानिक पातळीवरही सहज उपलब्ध होतील किंवा बनवून घेता येतील अशीही हवीत.

गिजुभाईंनी जेव्हा बालशिक्षण आजूबाजूच्या खेड्यातून नेण्याचा विचार केला, तेव्हा अशी साधने बनवण्याची जबाबदारी ताराबाईंवर सोपवली. हेच खेड्यातील बालशिक्षणाचे धडे ताराबाईंना पुढे कोसबाडला उपयोगी पडले. पद्मभूषण ताराबाई मोडक यांचे दि.३१ ऑगस्ट १९७३ ला मुंबईत निधन झाले.
!! त्यांच्या शिक्षणक्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल त्यांना जन्मदिनी पुरोगामी संदेश परिवारातर्फे मानाचा लवून मुजरा !!

✒️संकलन व लेखन:-श्री कृ. गो. निकोडे गुरुजी.
मु. श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिराजवळ, रामनगर, गडचिरोली.
पो. ता. जि. गडचिरोली.मोबा. ७७७५०४१०८६.