ऊदंड उत्साही अलकाताई

दीड एक वर्षपूर्वीची गोष्ट. आमच्या शेजारी राहणाऱ्या आशाताई व अशोककाका कुंदप हे त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांबरोबर बाहेर गेले होते. मात्र बाहेरून यायला त्यांना उशीर झाला.त्या दिवशी आशाताई खूप टेन्शनमध्ये होत्या. त्यांनी मला फोन केला की त्यांच्या स्वयंपाक करणाऱ्या मावशी आज येणार नाही व आता काय करू ? मी त्यांत धीर देत सांगितले , तुम्ही अजिबात काळजी करू नका व संध्याकाळी माझ्याकडे पाहुणे मंडळींना घेऊन माझ्या घरी जेवायला या, मी सर्व तयारी करून ठेवते व तुमच्या पाहुण्यांना जेवायचे आमंत्रण ही देते . आदल्याच दिवशी त्यांच्याशी थोडी तोंड ओळख झाली होती. मग ती सर्व मंडळी आमच्याकडे आली.अशोककाकांनी आम्हा सर्वांशी त्यांची ओळख करून दिली.

देवेंद्र भुजबळ हे महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक पदावरील ज्येष्ठ श्रेणीचे अधिकारी तर अलका ताई एक खेळाडू व उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या व टेलिफोन एक्सचेंजमध्ये नोकरी करणाऱ्या सर्व गुण संपन्न महिला. पुढे गप्पा मारत जेवण झाले.देवेंद्र भुजबळ व अलका ताईशी मस्त गप्पा झाल्या . त्या एवढ्या मन मिळावू स्वभावाच्या होत्या की मी त्यांच्याशी पहिल्यांदाच बोलत आहे असे अजिबात वाटले नाही.एवढे उच्चशिक्षित, प्रतिष्ठित व नावाजलेले असून देखील त्यांच्यातील नम्रपणा जाणवत होता.अलकाताई तर खूप बोलक्या,उत्साही व प्रसन्न वाटल्या. ती आमची पहिलीच भेट होती, असे अजिबात वाटत नव्हते.आज अलकाताईंचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी जाणून घेऊ या …..

अलकाताईंचा जन्म मुंबई येथे मध्यम वर्गीय कुटुंबात झाला.दहावीपर्यंत त्यांचे शिक्षण व्यवस्थित पार पडले. पुढेही त्यांना शिकायचे होते. त्या दरम्यान टेलिफोन खात्याची जाहिरात पाहण्यात आली त्यांनी अर्ज केला. मुलाखत ही झाली व निवड देखील.त्यावेळी घरातील जबाबदारी,शिक्षण व नोकरी अशी तिहेरी भूमिका त्यांनी चोख निभावली. त्या सुंदर असल्याने खूप स्थळ सांगून येत.मात्र जोडीदारविषयी त्यांची एकमात्र इच्छा होती की तो श्रीमंत नसला तरी आपल्या पेक्षा जास्त शिकलेला असावा. पुढे देवेंद्र भुजबळ ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला . त्यावेळी ते भारत सरकारच्या मुंबई दुरदर्शन केंद्रात सहायक निर्माते होते.विवाहानंतर अलकाताईं अभिनय,खेळ,सांस्कृतिक कार्यक्रम, पर्यटन,विविध शिबीर असे अनेक उपक्रम पती देवेंद्र भुजबळ ह्यांचा सहकार्यामुळे करत राहिल्या. सासूबाईंची देखील भक्कम साथ लाभली. त्या त्यांच्या आई वाटत असत. त्यामुळे त्यांच्यातील उत्साह दुपटीने वाढला.

सर्वांना त्यांचा खूप अभिमान होता.पुढे ही त्यांच्या संसाराला गोड फुल मिळाले व गोंडस मुलीचा जन्म झाला.त्या नंतर देखील घरातील जबाबदारी,त्यांची नोकरी चालूच होती.पुढे त्यांची मुलगी देवश्रीची देखील मोलाची साथ त्यांना लाभली.घरातील सर्वांच्या प्रोत्साहन मुळे व पाठिंब्यामुळे त्या मनासारखे जीवन जगू शकल्या.आयुष्यातील पुढील प्रवास असाच सकारात्मक चालू होता.मात्र त्यांच्या आयुष्यात एकदम वादळ निर्माण झाले. अलकाताई आरोग्याविषयी जागरूक राहिल्याने त्यांच्या कर्करोगाचे लवकर निदान झाले व त्यावर त्यांनी यशस्वी मात ही केली. ह्या वेळी पतीची व मुलीची मोलाची साथ लाभली . मुळातच लढाऊ व धाडसी वृत्ती असल्याने त्या ह्यातुन सुखरूप बाहेर पडल्या. या स्वानुभवावर आधारित ‘ कॉमा ‘हे पुस्तक त्यांनी लिहिले.आजही त्या कॅन्सरविषयी समक्ष तसेच दूरध्वनीद्वारे मोफत समुपदेश देण्याचे मोलाचे काम करत असतात.

कॅन्सर विषयी जनजागृती करून महिलांना व त्यांच्या कुटुंबियांना मार्गदर्शन करून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचे अतिशय मोलाचे काम त्या करत आहे त्या बद्दल त्यांना सलाम. आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत केले आहे.आज पर्यंत त्यांनी देशाबरोबरच विदेशातही भरपूर प्रवास केला आहे .अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करून त्या सहभागीही झाल्या आहेत.बंदिनी,दामिनी, हे बंध रेशमाचे,पोलिसातील माणूस,जिज्ञासा या दूरदर्शन मालिकामधून विविध भूमिका साकारल्या आहेत .अशा ह्या अष्टपैलू, उत्साही,हरहुन्नरी, मनमिळाऊ व प्रेमळ व्यक्तिमत्व लाभलेल्य अलकाताईंना वाढदिवसाबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा व त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

लेखिका:-रश्मी हेडे

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED