रक्तात भिम नाही

22

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शाहीर, गायक आपल्या कलेतून आमच्या रक्तात भिम आहे अशा उपमा देऊन लोकांच्या टाळ्या व पैसा मिळवतात. रक्तामध्ये भिम दाखवून आम्ही स्वतः ला मोठे समजतो. मुळात आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेतांना त्यांचे विचार डोक्यात गेले नाही ही शोकांतिका आहे. काही शाहीर, गायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भांडवल बनवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने केवळ मनोरंजन करतात प्रबोधन करत नाहीत. आणि मनोरंजनामध्ये गुंतल्याने आम्हाला प्रबोधनाचे भान राहीले नाही. सर्वच कलाकार भांडवल बनवत आहेत अस मत नसले तरी बहुतांश प्रबोधन कमी आणि मनोरंजन जास्त आहे. याला अपवाद म्हणजे लोकशाहीर वानमदादा कर्डक. वामनदादा यांनी कोणत्याही आमिष्याचा मोह न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गाव वस्ती तांड्यापर्यंत पोहचवले.

प्रबोधन केले. लोकशाहीर वामनदादा कर्डक चे नाव घेऊन त्यांच्याच रचना गाणारे लोक लाखों रुपयाची मागणी करतात तेव्हाच कळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत शाहीर वामनदादा कर्डक यांचे सुद्धां भांडवल झाले आहे. वामनदादांना आदर्श माणून गाण्याची सुरवात करणारे अनेक गायक आहेत. एकिकडे वामनदादांना आदर्श मानायचे आणि दुसरीकडं दादांच्या विरोध गाणे तयार करायचे. हे वाचून कोणालाही चिड येईल राग येईल. परंतू हे सत्य आहे. वामनदादा म्हणतात..

भिमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीला तयांच्या न्यारेच टोक असते
वाणीत भिम आहे, करणीत भिम असता
उत्तर साऱ्याच पिलांचे चोक असते

थोडक्यात काय तर वामनदादांनी सुद्धां बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु विचाराचा माणूस सापडला नाही. वाणीत म्हणजे फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर भाषणे देऊन, गाणे म्हणून जयभीम बोलुन भिमाचे काम होत नाही तर आपल्या करणीत अर्थात आपल्या आचरणात भिम पाहिजे. आणि सर्वात मोठी शोकांतिका आज आचरणात भिम नाही. जे रक्तात असते तसेच मानुस वागत असतो, जर बाबासाहेब रक्तात असते तर आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने वागलो असतो. परंतु आमच्या रक्तात बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नाहीत. म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराविरोधात आम्ही आमचे कर्म करतो.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात स्वतः चा कधीच विचार न करता नेहमी मानव समाजाचा विचार केला. जिवन कसे जगायचे याची शिकवण दिली, जिवन जगताना स्वाभीमान, सन्मान मिळवून दिला, प्रगतीची सगळी रस्ते मोकळी करून दिली, विज्ञानाचा धम्म दिला, शिक्षणासाठी शिक्षच संस्था दिली, सत्तेसाठी राजकीय पक्ष दिला, सामाजिक आणि राजकीय प्रगती व्हावी आणि याची सुरवात उत्तर रितीने व्हावी म्हणून हजारो वर्षांच्या गुलामगिरी मध्ये खितपत पडलेल्या महिलांना पुरुष आणि महिला भेद न करता समान स्थान दिले. शिक्षण, नोकरी, वेतन, हक्क अधिकार केवळ स्रि आहे म्हणून नाकारता येणार नाही किंवा पुरुषांपेक्षा कमी सुद्धां देता येणार नाही एवढी समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केली. सामाजिक चळवळ वाढण्यासाठी सुशिक्षित महिलांनी समोर यायला पाहिजे ही अपेक्षा असताना अपवाद वगळता महिला बघितल्या तरुणी बघितल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अपुर्ण आहे असेच वाटतं.

भिमजंयती, विजयादशमी, बौद्ध पौर्णिमा, इतर काही प्रादेशिक सामाजिक कार्यक्रमामध्ये तरुणी आणि महिला पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, चांगला मेकअप करून सार्वजनिक ठिकाणी जमतात. तिथे महिलांच्या बाबतीत विचार केला तर वैचारिकता कमी आणि सौदर्य स्पर्धाच जास्त अनुभवायला मिळते. नटण्या सजण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच मिळाला, आणि चांगले रहायलाच पाहिजे, सुंदर दिसायलाच पाहिजे. पण शारीरिक सौदर्य दाखवताना डोक्यात जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असतील आणि ते कृतीत असतील तर त्या महिलेसारखी देखणी महिला जगात शोधून सापडणार नाही. फक्त फेटे मोठमोठे झेंडे हातात घेऊन फोटो काढून आपण उत्सव साजरा करू शकत नाही तर खरा उत्सव तेव्हाच जल्लोषात होईल जेव्हा डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार पेरण्यासाठी भिमाच्या मुली कणखर पणे रस्त्यावर उतरतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार निर्भिडपणे पेरतील.

आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोक्यात नसल्याने विचारावर कमी आणि देखाव्यावर जास्त लक्ष दिले जाते. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ चालवायची असेल तर महिलांचे विषेशतः तरुण तरुणींचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. म्हणून विचार जोपासले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे शिक्षण घेऊन, बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागामुळे शासकीय नोकरी करून घर पैसा कमवणारा व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे पालन करत नसेल तर त्याचे शिक्षण पैसा आणि नोकरी शुन्य आहे. अशा लोकांच्या रक्तात भिम आहे हे कसे म्हणणार? स्वतः ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी समजून घ्यायचे आणि मनुस्मृती चे पालन करायचे अशा लोकांना विषेशतः तरुणांना काय म्हणावे? सरकारी नोकरी आहे म्हणून लग्नासाठी सुंदर मुलगी शोधने, सरकारी नोकरी आहे म्हणून मुलींकडून हुंड्याची रक्कम फिक्स करणे, सरकारी नोकरी लागली म्हणून सरकारी नोकरदाराचीच मुलगी करणे अशा प्रकारचे नियम ठरवून लग्नाचा करार करणाऱ्या लोकांच्या रक्तात बाबासाहेब असु शकतात?

शिक्षीत आणि सरकारी नोकरदार तरुण तरुणीच्या अकलेची माती तेव्हा दिसून येते ते अंधविश्वासावर विश्वास ठेवून जिवन जगत असतात. आणि याची सुरवात होते लग्नापासून दोघेही सुशिक्षित समजणारे जेव्हा मनुस्मृती चा आधार घेऊन संसार जोडत नाही तर करार करतात आणि तो करार करण्याची विधी विज्ञानाशी सुसंगत नसते. फक्त त्रिशरण आणि पंचशील घेऊन विधी पार पाडला म्हणजे आपण अनुयायी झालो असे मुळीच नाही. लग्नाची तयारी करताना रविवारी लग्न असेल तर शनिवारी हळद लावता येत नाही म्हणून शुक्रवारी हळदीचा स्वतंत्र कार्यक्रम ठेवून रात्रभर नाचुन साजरा केला जातो याला काय विज्ञानाचा आधार आहे? लग्नात कपाळाचे बाशिंग आणि फेटा उतरवून च ठेवावा लागतो मग बाशिंग बांधुन कोणती विद्वत्ता दाखवली जाते? हळदीच्या दिवसापासून कमरेवर कट्यार सुद्धा लावले जाते, त्याचा निंबु कापायला सुद्धां वापर होत नाही वापरले जाते यातून काय सिद्ध होते? स्वतः ला पुरोगामी, विज्ञानवादाची समजून अज्ञान आणि अंधविश्वासाचा स्विकार करून जगणाऱ्या व्यक्तीच्या रक्तात खरचं भिम असेल! राजकीय नेते, चळवळीच्या नावाखाली स्वतः चे घरे भरून समाजाचा वापर करणाऱ्या लोकांच्या रक्तात भिम राहणार का?

भिमजंयती साठी लोकवर्गणी गोळा करून त्यावर तरुण तरुणींना नाचवणाऱ्या आणि शिक्षणासाठी कोणालाही एक रुपयाची मदत न करणाऱ्या लोकांच्या रक्तात भिम असेल असे म्हणणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्या सारखाच आहे. एखाद्या गरजु विद्यार्थ्यांला शैक्षणिक मदत न करता तरुणांना दारु पाजणारे अनेक आहेत. आज आपण आजुबाजुला बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार समजून घेऊन चालणारे खुप कमी लोक आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणारे लोकच आज दिसत नाहीत तर रोडवर जोरजोरात आम्ही भिमाची पोरं, आमच्या रक्तात भिम आहे असे ओरडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणे कमी जरी केला तरी खुप मोठे परिवर्तन होईल. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुलींच्या हाती पुस्तक देऊन वाचायला शिकवले, बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले पुस्तक बाजूला सारून नाचायला लागल्या याचे दु:ख वाटतं. बाबासाहेब आंबेडकर समजून घेतले असते आणि त्यांच्या विचाराने चालले असते तर आज चळवळीचे तिन तेरा झाले नसते, राजकीय पक्षाचे तुकडे झाले नसते. किमान बाबासाहेब समजले असते विचार समजले असते तर चळवळीचा अर्थ स्वतः च्याच मताने काढला नसता.

खरचं बाबासाहेब समजले असते तर भाषण करते नाही शासनकर्ते झाले असते. म्हणून जोपर्यंत बाबासाहेब आमच्या आचरणात येणार नाही तोपर्यंत ते आमच्या रक्तात राहणारच नाही. तरुण तरुणींनी सामाजिक चळवळीला बळकटी देऊन स्वतः नाचण्याकडे लक्ष कमी केले आणि चळवळ वाचवण्याकडे लक्ष केंद्रित केले तर पुन्हा बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित सर्वसमावेशक चळवळ उभी राहुन बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची पेरणी होऊन, बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असल्याचे समाधान वाटेल व जिवन जगण्याचे सार्थक होईल.
*************************************
✒️लेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगांव ता. मेहकर(मोबा: ९१३०९७९३००)
*************************************