प्राजक्ताची फुलं

22

काही व्यक्ती आपल्या जीवनात येतात आणि सहजपणे आपल्याला सुगंध देतात. आजूबाजूचं वातावरण त्यांच्या अस्तित्वानं भारून जातं. हा त्यांचा गुणधर्म असतो. आपण काही वेगळं करतोय, जगावर खूप उपकार करतोय, यातून मान मरातब मिळावा, पैसा मिळावा, असाही त्यांचा काही हेतू नसतो. अशा निरलसपणे कार्य करणाऱ्या व्यक्ती भेटल्या की मला खूप आनंद होतो.असं वाटतं ,जीवन यांना कळलं हो !. असंच इतरांचं जीवन सुगंधित करणारं एक व्यक्तिमत्व मला भेटलं आणि मी नत मस्तक झालो. खरं म्हणजे, आज आपण बघतो की जीवन इतकं धावपळीचं होत आहे की, आपल्याला आपल्याच मुलांकडे बघायला वेळ मिळत नाही. त्यातून जर ते मूल दिव्यांग असेल, गतिमंद असेल, तर त्या पालकांना किती कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागत असेल,याची आपण कल्पनाच करू शकत नाही. नेमकं हेच दिव्य काम पुणे येथील डाँ. प्राजक्ता कोळपकर अत्यन्त आवडीनं करत आहे. आता लेखाच्या शिर्षकात तिचं नाव तर आलं आहेच पण मी फुलंही लिहिलं आहे ते प्राजक्ताच्या संस्थेत असणाऱ्या मुलांमुलींना उद्देशून. ही सर्व मुलं प्राजक्ताच्या सहवासात इतकी छान रमतात ना, की ते पाहून आपणही नकळत त्यांच्यात रमतो. किती निरागसपणे बोलतात,वागतात, खेळतात सर्व जणं. तिथे मी जेव्हा जेव्हा गेलो,त्यांच्यात रमलो, तेव्हा मला वाटलं, अरे ही मुलं गतिमंद नाहींयत. गतिमंद तर आपण आहोत ! जीवनात नको त्या गोष्टींच्या मागे धावत पळत राहिलो. स्पर्धा संपल्यावर लक्षात आलं ,कशासाठी आपण धावत होतो ? जे हवं होतं, ते खरंच मिळालं का ? मुळात हवंच काय होतं ते तरी कधी आपल्याला कळालं का ? म्हणूनच जीवनाचा खरा सूर गवसलेली ही प्राजक्ताची फुलं !

पुणे येथे स्थायिक असलेली प्राजक्ता मूळची विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी . प्राजक्ताला मुळातच अभ्यासाची आणि विशेष म्हणजे त्या बरोबर मैदानी खेळांची खूप आवड . अभ्यासाच्या आवडीतूनच तिनं बी.ए, एम.एस. डब्लू, मास कम्युनिकेशन, एम.एफ.ए. (नाटक),पीएच.डी.(समाज कल्याण) इतक्या एकाहून एक सरस पदव्या संपादन केल्या. तर खेळांच्या बाबतीत म्हणाल तर
वेस्ट झोन , विशाखापट्टणम -१९९२,
ज्युनियर नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशीप,गांधीनगर , गुजरात-१९९३, इंटर युनिव्हर्सिटी, कालिकात, केरळ-१९९५, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी, पटियाला, पंजाब-१९९५,अशा राष्ट्रीय स्पर्धात तिनं भाग घेतला. याशिवाय तिनं सतत एन एस एस,एन सी सीत सक्रिय सहभाग घेतला.
एन एन एस कॅम्प, नागपूर, महाराष्ट्र-१९९६ ,एन सी सी नॅशनल कॅम्प व दिल्ली परेड – १९९७ यात सहभाग घेतला. हे कमी की काय म्हणून, प्राजक्ता अभिनय, वक्तृत्व, वादविवाद,नृत्य स्पर्धा यात २०० हून अधिक बक्षिसांची मानकरी आहे ! यातील प्रमुख म्हणजे अल्फा करंडक एकांकिका स्पर्धा, पुणे “उत्कृष्ट अभिनेत्री “- २००१ ही होय.

प्राजक्ता नागपूर आकाशवाणी व दूरदर्शनमध्ये निवेदिका देखील होती.तिनं लिहिलेली “परिवर्तन” डॉक्युमेंटरी फिल्म महाराष्ट्रातील कारागृहात दाखवण्यास महाराष्ट्र शासनानं मान्यता दिली. प्राजक्ताची शैक्षणिक पात्रता,क्षमता पाहिली तर ती पूर्णवेळ शिक्षक,प्राध्यापक, पत्रकार ,अभिनेत्री नक्कीच होऊ शकली असती.पण तिनं नेहमीची वाट न निवडता,आपली आवड ओळखून मुलांच्या क्षेत्रात पूर्णवेळ काम करण्याचं ठरविलं.
त्यानुसार प्राजक्तानं २००७ मध्ये ‘गार्गीस फन वर्ल्ड’ हे पाळणाघर सुरू केलं. त्याच्या अनुभवाच्या आधारे तिनं २०१० मध्ये पिन्याकल रिक्रिएशन अकॅडमी ही दिव्यांग मुलांसाठीची संस्था सुरू केली. याच संस्थेत ती आणि तिची मुलं खूप रमलेली आज आपल्याला दिसतात. प्राजक्ताचे इतर उपक्रम म्हणजे ‘”गोष्टीची गोष्ट'” हा मराठी शाळेच्या मुलांसाठी गोष्टी व गाण्याचा कार्यक्रम,”संवाद माझा माझ्याशी” ही पालकांसाठी कार्यशाळा “गोष्ट कशी तयार करावी ?” ही शिक्षकांसाठी कार्यशाळा ती घेत असते. याशिवाय ती नियमितपणे कथा , कविता, ललित लेखन करीत असते.

महाराष्ट्र टाइम्सच्या शनिवारच्या मैफल पुरवणीतील बालक पालक हे सदर,गोव्याच्या गोवन वार्ता मधील रविवारचं भन्नाट हे सदर,प्रभात वर्तमानपत्रातील मोरपीस हे दर शुक्रवारचं सदर ,अशी प्राजक्ताची विविध सदरे वाचक प्रिय ठरली आहेत. महाराष्ट्र टाइम्सच्या सदराचा मी देखील नियमित वाचक होतो. मला खात्री आहे, या सर्व सदारांचं संपादन करून ती पुस्तकांच्या रुपात आपल्यासमोर नक्कीच येतील.

प्राजक्ताला आजवर मिळालेले काही पुरस्कार म्हणजे कथा यात्रा इंटरनॅशनल कॉन्फरन्स, पुणे-२०१२, स्वयंसिद्धा पुरस्कार (लायन्स क्लब ऑफ पुणे एलिट ग्रुप )-२०१५, इंटरनॅशनल पीस सोशल अवॉर्ड – २०१५, भारत शिखर सन्मान पुरस्कार, मध्यप्रदेश- २०१५,महात्मा फुले नॅशनल सन्मान पदक,दिल्ली- २०१६,राष्ट्रीय प्रज्ञारत्न विदश्री अवॉर्ड,मध्यप्रदेश-२०१६,राष्ट्रगौरव पुरस्कार,पुणे -२०१६,सिध्दार्थ तथागत कला साहित्य पुरस्कार सिद्धार्थनगर,नेपाळ-२०१७,राष्ट्रीय लोक कल्याण मानवसेवा पुरस्कार, मुंबई-२०१७,शिक्षक गौरव पुरस्कार-लायन्स क्लब-२०१९,सावित्रीबाई फुले फेलोशिप,दिल्ली-२०,पुणे महानगरपालिका गौरव -२०२०, राष्ट्र रत्न पुरस्कार,नागपूर- २०२०,रोटरी एक्सलेन्स अवॉर्ड, पुणे-२०२ हे होत. एखादी स्त्री एकाच वेळी इतक्या गोष्टी करू शकते ही आश्चर्य आणि कौतुकाची गोष्ट आहे.

आधुनिक अष्टभुजा देवीच जणू. अशा या प्राजक्ताचं स्वप्न आहे, आपली संस्था भाड्याच्या जागेत न राहता संस्थेला स्वतःची वास्तू असावी, मोठी जागा असावी,जेणेकरून ती अधिक मुलांच्या जीवनात अधिक आनंद निर्माण करू शकेल. मी तर तिला मदत करायचं ठरवलंच आहे. आपणही करणार ना ? –

✒️लेखक:-देवेंद्र भुजबळ(मो:-986948480)