गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये विराजमान !

29

[शकुंतला देवी स्मृती दिन]

दि.४ नॊव्हेंबर १९२९ रोजी बंगलोरमध्ये शकुंतला देवी यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब म्हणजे पारपंपिक कन्नड ब्राह्मण होते. पण त्यांचे वडील नव्या युगातले, त्यांनी आपल्या भिक्षुकीच्या पारंपरिक व्यवसायाला आणि मंदिरातील परंपरागत पुजारी होण्याला नकार देऊन सर्कसमधील आड वाटेवरची नोकरी धरली. त्यांचे वडील सर्कसमध्ये काम करत होते. तीन वर्षाच्या शकुंतलाला पत्त्याचे खेळ शिकवताना तिच्या अफाट स्मरणशक्तीचे त्यांना ज्ञान झाले. त्यांनाच शकुंतला देवीमधील झपाट्याने गुणाकार-भागाकार करण्याच्या शक्तीची पहिल्यांदा ओळख पटली. सर्कस सोडून ते शकुंतलाचेच रोडशो करू लागले. वयाच्या ६व्या वर्षी शकुंतला देवींनी म्हैसूर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले होते.
शकुंतला देवी इ.स.१९४४ मध्ये लंडनला गेल्या. लंडनला गेल्यावर पुढे त्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रवास केला आणि आपल्या बुद्धिमत्तेचे व गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून त्यांनी संपूर्ण जगाला चक्रावून सोडले.

इ.स.१९७६ साली आपल्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी संगणकापेक्षा अधिक वेगाने आकडेमोड पूर्ण करून त्याची उत्तरे परीक्षकांसमोर अचूक सादर केली. इ.स.१९७७ मध्ये डलास विद्यापीठात त्यांचा मुकाबला तत्कालीन सर्वात जलद काॅम्प्यूटर ‘युनिव्हॅक’शी झाला. तेथे शकुंतला देवींनी एका २०१ अंकी संख्येचे २३वे मूळ ५० सेकंदात काढले व फळ्यावर लिहिले. हेच मूळ काढायला काॅम्प्यूटरला ६२ सेकंद लागले होते. दि.१८ जून १९८० मध्ये त्यांना ७६८६३६९७७४८७० आणि २४६५०९९७४५७७९ या दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या. हे आकडे लंडनच्या इम्पीरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडलेले होते. शकुंतला देवी यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करुन दाखवत केवळ २८ सेकंदामध्ये १८९४७६६८१७७९९५४२६४६२७७३७३० हे उत्तर दिले. १३ आकडी दोन संख्यांचा गुणाकार त्यांनी फक्त २८ सेकंदात पूर्ण केला. त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना ह्यूमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाऊ लागले व शकुंतला देवी हे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये विराजमान झाले.

शकुंतला देवी यांच्या अंगी एक अदभुत प्रतिभा होती की अख्ख्या भारतास त्याची दाखल घ्यावी लागली. गुगलने त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त डुडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली होती. भारतात परतल्यावर इ.स.१९८८ मध्ये त्यांना अमेरिकेतून बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठामधील मानसशास्त्र विभागाचे विशेष आमंत्रण आले. या विभागातील प्रा.आर्थर जेनसन यांनी त्यांच्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली. प्रा.आर्थर जेनसन यांनी देखील त्यांच्यावर असंख्य प्रयोग केले. कोणत्याही अवघड बहुअंकी संख्येचे घनमूळ काढणे किवा कोणत्याही बहुअंकी संख्येचा सातवा किवा आठवा घात काढायला सांगण्यास उशीर की शकुंतला देवी यांचे उत्तर हजर असायचे.
दि.२१ एप्रिल २०१३ रोजी वयाच्या ८३व्या वर्षी बंगलोरमध्ये शकुंतला देवी यांनी अखेरचा श्वास घेतला व हा जगप्रसिद्ध ह्यूमन कॉम्प्युटर – मानवी संगणक काळाच्या पडद्याआड झाला.
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे त्यांच्या तल्लख बुद्धिमत्तेला स्मृती दिनी विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.(मराठी साहित्यिक व शैक्षणिक विचारवंत.)
मु. पिसेवडधा, ता. आरमोरी.जि. गडचिरोली (९४२३७१४८८३).
इमेल – Krishnadas.nirankari@gmail.com