चला, हसू या !

आजूबाजूला थोडे निरीक्षण केल्यावर लक्षात येते की काही व्यक्ती सदैव हसतमुख, आनंदी असतात.सकाळी सकाळी अशा व्यक्तीची भेट झाली की पूर्ण दिवस जणू आनंदात जातो. कारण, दिवसाची सुरुवात हस्याने होते.हे हसरे व आनंदी चेहरे पाहून मनाला उभारी येते. आपले दुःख, आपला त्रास जणू क्षणात नाहीसा होतो, किमान त्यावेळी तरी. सकाळी योगा वर्ग असतात. तेथे देखील असे आवर्जून हसायला लावतात. कारण एकच असते ते म्हणजे आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी. हो ना ? मग तुम्ही विचार करा ,जर का आपण असे रोज खळखळून हसलो, आनंदी राहिलो फक्त योगा क्लास मध्ये नव्हे तर घरात देखील तर आपल्या जगण्यावर त्याचा किती सकारात्मक परिणाम होऊ शकतो ! घरातील सर्वांच्या हसण्यामुळे घरातील त्या निर्जीव भिंती देखील हसतील.

घरातील वातावरण आनंदी होईल. कारण आपण घरात जे बोलतो, जे करतो तेव्हा ती वास्तू तथास्तु म्हणत असते. म्हणजे तुम्ही सर्व जण असे सुखी, आनंदी रहा. किती छान कल्पना आहे नाही का ? बरं हे करण्याला काही पैसे लागत नाहीत. काही फारसे कष्ट करावे लागत नाही. मस्त घरातील एखाद्या व्यक्तीने छान जोक सांगावा अथवा एखादी स्वतःच्या जीवनातील गोष्ट जेणे करू सर्व पोट धरून हसतील . किती मस्त ना ? आजूबाजूच्या लोकांना ही हेवा वाटावा .कारण आज काल हे हास्य दुर्मिळ होत आहे.मग हेच तर आपल्याला करायचे आहे. रोज असे छोटे छोटे प्रसंग येतात जे चेहऱ्यावर सुंदर हास्य आणतात ते जगले पाहिजे.अनेक व्यक्ती सतत आनंदी जीवन जगतात. मग काय त्यांच्या जीवनात समस्या अथवा दुःख नसते का ? असतात तर. मात्र त्यांच्यात ना ह्या दुःखांवर मात करण्याची ताकद असते .प्रचंड इच्छा शक्ती असते. त्यामुळे दुःखाचा बाऊ न करता ते त्या अडचणींचा सामना धैर्याने करतात व यशस्वी होतात.

हास्य हा मनुष्याला लाभलेला सुंदर दागिना आहे तो ज्याच्या जवळ आहे तो ह्या जगातील सर्वात सुखी व सुंदर व्यक्ती आहे. अशी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटत असते. त्याला अनेक मित्र मैत्रिणी असतात. कारण ह्या व्यक्तीमध्ये ते सामर्थ्य असते की ती स्वतःबरोबर इतरांना देखील आनंद देऊ शकतो. आज काल तर ह्या ताण तणावात व स्पर्धेच्या युगात मनुष्य स्वतःचे हे हास्य हरवून बसला आहे. सतत टेन्शन व उद्याची चिंता करता करता तो वर्तमानात जगायचे विसरून गेला आहे.खरं तर सूख हे आपल्या मानण्यावर असते.नाही का ? काही लोक खूप श्रीमंत अथवा प्रसिद्ध, प्रतिष्ठित असून देखील संतुष्ट नसतात. तर एखादी अती सामान्य व्यक्ती कितीही मोठी समस्या असली तरी त्यावर मात करत हसून खेळून जीवन जगते. कारण जे नाही त्याची खंत करण्यापेक्षा जे आहेत त्यात ते आनंदी व समाधानी असतात.हे करणे वाटते तेवढे सोपे नसते .पण ही व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील अवघड गणित सोप्या पद्धतीने सोडवते. अनेक अपंग,गतिमंद,मतिमंद व्यक्ती दिसतात. मात्र त्यांच्या कडून शिकण्यासारखे खूप असते.

त्यांचे धैर्य,त्यांच्यातील चिकाटी ,त्यांचा प्रामाणिकपणा त्यांना इतरांपासून वेगळे बनवते.मी जिंकणार , मी करून दाखवणार हे सकारात्मक विचार त्यांच्या अंतर्मनात रुजलेले असतात. त्यामुळे स्वतःच्या अपंगात्वर मात करून ते यशाचे शिखर गाठतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य , ते समाधान ,ते तेज त्यांचे आयुष्य उजळून टाकते.आता तुम्हीच सांगा जर ते अशक्य गोष्टी देखील शक्य करू शकतात तर आपण का नाही ? संकटांकडे एक संधी म्हणून पाहिले तर नक्कीच आपण ही जिंकू शकतो. लहान सहान दुःखात देखील आपण तोंड पाडून बसतो .हसायला जणू विसरून जातो.हे बरोबर नाही. परमेश्वराने तर आपल्याला सर्व काही दिले आहे. हे सुंदर शरीर ही तर अनमोल देणगी आहे.मग तरी आपण निराश का ? मस्त हसून तर पहा . सर्व वातावरण देखील सुंदर होईल. आणि ह्या समस्या देखील तुमच्या समोर खूप लहान वाटतील.आनंद द्या व आनंद घ्या.

त्याप्रमाणे हसवा व हसत राहा .मग बघा आयुष्य देखील तुमच्या कडे पाहून हसेल. हास्य ही तर सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे.हसल्यामुळे ,आनंदी राहिल्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य देखील उत्तम राहते व इतर कोणत्याही औषधांची गरज भासणार नाही व कोणतेही आजार जडणार नाही.अनेक व्यक्ती दिसतात जे ब्रँडेड कपडे परिधान करतात, गाडीतून फिरतात पण विचार करा जर त्यांचा चेहरा पडलेला, असेल निस्तेज असेल तर कोणीही त्याच्या जवळ जाणार नाही. ह्या उलट एखादी सामान्य व्यक्ती मस्त गप्पा गोष्टी करते . दुसर्यांना हसवते .तर ती व्यक्ती सर्वांना आपलीशी वाटते.हसायला सुंदर दिसणे महत्त्वाचे नाही तर सुंदर असणे महत्त्वाचे आहे. ह्याचे उत्तम उदाहरण चला हवा येऊ द्या मधील भाऊ कदम. भाऊ दिसायला फार सुंदर नाही. मात्र त्याच्या हास्याने सर्वांची मने तो किती सहज जिंकतो. तो सर्वांना हसावतो.हसवने की एक कला आहे. स्वतःवर हसून दुसऱ्याला हसवने अतिशय कठीण पण ते हे काम तो अगदी सहजासहजी करतो.

त्यामुळे त्याला भेटण्यासाठी ,त्याच्याबरोबर बोलण्यासाठी लोक आतुरतेने त्याची वाट पाहतात. ही पूर्ण टीम व त्यातील सर्व कलाकारांनी सर्वांच्या जीवनात हास्य लहरी आणल्या हे अतिशय अनमोल काम त्यांनी केले आहे व आज ही करतात .त्यामुळे ते सर्व लाडके व लोकप्रिय व्यक्ती झाले. शेवटी सुख तर आपल्या मानण्यावर असते.संपत्ती,प्रसिद्धीच्या मागे धावता धावता आपले हास्य गमावू नका. नाती गोती जपा. सर्वांशी जोडून रहा. कारण हीच नाती आपल्या सुखी आयुष्याची श्रीमंती आहे.आज काल सगळीकडे मुखवटे आहे. आत एक बाहेर एक. हास्य देखील खोटे आहे . फसवे आहे. जणू लोकांना दाखवण्यासाठी आहे.हास्य फक्त फोटोसाठी सिमीत न रहाता मनापासून, हृदयापासून हसा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आपले जीवन सुखकर बनवा.हास्य दीर्घायुषी जीवनाची गुरुकिल्ली आहे.काय मग हसताय ना ? हसायलाच पाहिजे. कारण आयुष्याला वन्स मोर नाही!

✒️लेखन:- रश्मी हेडे

▪️संपादन:-देवेंद्र भुजबळ(मो:-9869484800)

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED