मानवता व विश्वव्यापी निरंकारी मिशन !

[निरंकारी जगताचा मानव एकता दिवस पर्व]

मानवाने सांप्रत काळी विज्ञानाच्या मदतीने खुप प्रगती साधली आहे. नवनवी उत्पादनं काढली, शोध-संशोधनं लावली, सुखसुविधायुक्त अनेक साधनं निर्माण केली आहेत. आज माणसाला कोणतीही कामं हातानं करावी लागत नाहीत. तरीही तो सदैव असमाधानीच दिसतो. यांनाही तो कंटाळत चालला आहे. हायड्रोजन-नायट्रोजन बाँब व अॅटमबाँब यातील विषारी वायू हे मानवाच्या मृत्यूचेच सामान तर ठरत नाही ना? अशी शंका येऊ लागली आहे. विज्ञानाची प्रगती खुंटावी, असा आपला भाव मुळीच नाही. परंतु या वैज्ञानिक प्रगतीबरोबरच मानवीय गुण, मानवीय मूल्ये व ईश्वरीय गुणांचासुद्धा विकास होत असावा. आत्मज्ञानाशिवाय आत्मपरीक्षण करता येत नाही. त्याशिवाय बंधुभावाच्या भावना उत्पन्न होत नाहीत. प्रेम, दया, आपुलकी व मानव जातीच्या कल्याणाची भावना वाढीस लागू शकत नाही. म्हणून अध्यात्मज्ञान हा पाया आहे आणि विज्ञान हे त्यावर उभे शोभायमान सुंदर वास्तुशिल्प आहे. अध्यात्म हे सुद्धा एक विशेषज्ञान – विज्ञान आहे. त्याचे रहस्य नेहमी गुरु, पीर, पैगंबर वा प्रेषित समाजावून देत आले आहेत. मनुष्याच्या मनात विशालता भरणे, मिळूनमिसळून राहणे व बंधुप्रेमाची शिकवण शिकवत आले आहेत.

आत्मज्ञानानंतर हीच वैज्ञानिक प्रगती आमच्यासाठी सुखदायी ठरावी, दुःखदायक नव्हे! संतश्रेष्ठ ग्रंथकार हरदेवसिंहजी महाराज म्हणतात : सम्पूर्ण हरदेव बाणी : पद क्र.२३५ – “मानव के कर्मों से धरती बसती और उजड़ती है। मानव के कर्मों से दुनिया बनती और बिगड़ती है। सन्तमति को धारण करके सुन्दर हम व्यवहार करे। कहे ‘हरदेव’ मिलवर्तन से सुखमय कुल संसार करें।”
विभिन्न जाती, जमाती, भाषा, पोषाख, देशविदेशातील लोकांनी अगदी एकसारखं रहावं, व्हावं किंवा वागावं अशी अजिबात गरज नाही. गरज आहे ती सर्वांच्या व्यवहार-वर्तनात ताळमेळ व मनमिळाऊपणा असावा. दुसऱ्याला सहन करण्याची व समजून घेण्याची क्षमता वाढेल यासाठी प्रयत्नशील असावे. आपले मत एखाद्यावर लादणे व त्याला आपल्या विचारांचाच बनण्याची सक्ती करणे कदापिही योग्य नाही. असे केल्याने एकप्रकारे आपण त्याचा वैचारिक विकास कुंठीत करत आहोत, असे तर नाही ना? त्याचा विकास, प्रगती व बुद्धिमत्ता थांबली तर त्याच्या मनात सूड – बदल्याची भावना उद्दीपित व्हावयास कितीसा वेळ? त्यापेक्षा आपण एकमेकांच्या विचारांची कदर करणे, आदर ठेवणे, ते सहन करणे, त्या विचारांमागची भावना व कार्यकारण भाव समजून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे.

त्यामुळे आपापसातील प्रेम, करुणा व आपुलकी वृद्धिंगत होईल. मनमिळाऊ वृत्तीची जोपासना होईल. जेव्हा सर्व लोक एकमेकांच्या विचारांना मान देतील, एकमेकांना सहन करतील, दुसर्‍यावर आपली हुकूमत – अधिकार गाजवणार नाहीत, तेव्हा अखिल मानवजातीत अतूट संबंध स्वाभाविकपणे प्रस्थापित होतील. त्यांच्यातले बंधुभावानचे नाते प्रगाढ होतील आणि त्यांच्यातील मानव एकता बळकट होत जाईल, असे युगप्रवर्तक मानव एकता संस्थापक संतशिरोमणी गुरबचनसिंहजी महाराज आपल्या परमशिष्यांना सांगत असत. ज्ञानसूर्य राष्ट्रपितामह महात्मा जोतीरावजी फुले उपदेशाचे डोस पाजताना म्हणतात : महात्मा फुले समग्र वाङ्मय : अखंडादि काव्यरचना : विभाग २रा – अखंड-१ – “देशधर्मभेद नसावा अंतरी।।भावंडांचे परी।। घरी सर्वां।।३।। असे बा शिक्षक सर्व ठाई नेमा।। आदीसत्य नमा।। जोती म्हणे।।४।।”

संत निरंकारी मिशनच्या वतीने तत्कालीन सद्गुरू युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी महाराज दुरदेशाच्या ज्ञानप्रचार दौर्‍यावर होते. त्यांनी दि.२४ एप्रिल १९८० रोजी विश्वबंधुत्व साकारून मानव एकता प्रस्थापित करण्याच्या कामी बलिदान दिले. त्यांच्या साथोसाथ सेवायोगी सेवादार वीरतेचे प्रतिक चाचा प्रतापसिंहजींनीही बलिदान दिले. या महान गुरूशिष्यांच्या हौतात्म्याचे व मानव एकता या यज्ञात प्राणार्पण केलेल्या शहीदांचे स्मरण व श्रद्धासुमने अर्पण करण्यासाठी दरवर्षी २४ एप्रिल हा दिवस ‘मानव एकता दिन’ संपूर्ण निरंकारी जगतात पाळण्यात येत असतो. सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराजांनी दिशानिर्देश दिले आहेत, त्याप्रमाणे घराघरातूनच श्रद्धासुमने अर्पित करण्यात यावीत. संतशिरोमणी ग्रंथकार अवतारसिंहजी महाराजांनी नकलून ठेवले : सम्पूर्ण अवतार बाणी : पद क्र.३१८ – “कोई हिन्दू कोई मुसलम कोई सिक्ख ईसाई ए। हर किसे ने अपणी दुनिया वक्खो वक्ख बणाई ए। एका कदी वी हो नहीं सकदा जे इक दी सोझी आवे ना। कहे ‘अवतार’ बिनां सत्गुर दे इस नूं कोई समझावे ना।”

आम्ही मानव एकमेकांविषयी प्रेम, जिव्हाळा, परोपकारीवृत्ती व सहकार्याची भावना मनमानसात उतरवू. एक दुसऱ्यास समर्पित होऊ. तेव्हाच हे संपूर्ण जग ‘आपला एक परिवार आहे’ असे अभिमानाने सांगता येईल. मी हिंदू, मी मुसलमान, मी सिंधी, मी गुजराती, मी मराठी, मी मारवाडी, मी अमेरिकन, मी चीनी, मी अरबी, मी पंजाबी, मी स्त्री, मी पुरुष, मी लहान, मी मोठा, मी गोरा, मी काळा, मी राजा, मी प्रजा अशा आपल्या भेदभावाच्या विचारानेही मानवात दरी निर्माण होते, ते विचार आधी काढून फेकावे. कोरोना महामारीच्या प्राणघातक प्रकोपामुळे त्या विचारांना आज बळकटीच मिळत आहे. कोणी तडफडो, कोणी रडो भरडो, कोणी मरो वाचो वा कोणी मदतीची प्रार्थना करो, याला प्रतिसाद न देणेच योग्य ठरत आहे. ही विपरीत वेळ का आली? मानवाच्याच विकृत करणीने! अतिवृष्टी, अल्पवृष्टी, आम्लारीवृष्टी, भूकंप, ज्वालामुखी, हिमस्खलन, कोरोनासारखी संसर्गजन्य महामारी या सर्व आपदा त्याचाच परिणाम म्हणणे योग्य राहिल. अशाही परिस्थितीत संत निरंकारी मिशन आपली मानवता अबाधित ठेवत आहे. जीव धोक्यात घालून मदत कार्य, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व कमतरता लक्षात घेऊन रुग्णालयास हजारो खाट-गाद्यांची व्यवस्था पुरवत आहे.

याचा एकच उद्देश की विश्वबंधुत्व साकारून ‘मानव एकता’ बळकट करणे हेच होय. मिशनच्या या पवित्र कार्यात सर्व मानवमात्रांनी सहभागी होऊन सहकार्य करण्याची हीच वेळ आहे. ग्रंथकार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मानवास समजाविले आहे – पवित्र सार्थ ग्रामगीता : लोकवशीकरण पंचक : अध्याय ६वा – संसर्ग प्रभाव – “ईश्वरे जग केले निर्माण। त्याचे कार्य अजूनि अपूर्ण। ते आपल्यापरी कराया पूर्ण। सद्बुद्धि दिली मानवा।।१।। एकापासूनि अनेक व्हावे। अनेकांसि एकत्वि आणावे। हा आपुला मूळ संकल्प देवे। चित्ती घातला सर्वांच्या।।२।।” मोठ्या प्रेमाने बोलुयाजी, धन निरंकारजी!!
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे मानव एकतेस समर्पित जीवन जगलेल्या सर्व शहीद महापुरुषांना मानव एकता दिनी विनम्र अभिवादन !!

✒️लेखक:-‘बापू’ – श्रीकृष्णदास निरंकारी. (मराठी साहित्यिक विदर्भ प्रदेश.)C/O – प. पू. गुरुदेव हरदेव कृपानिवास.मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली. जि. गडचिरोली, व्हा.नं. ९४२३७१४८८३.
इमेल – Krishnadas.nirankari@gmail.com

गडचिरोली, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED