रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक येथील डॉक्टर जाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांनी आपला प्राण गमावल्याच्या घटनेतून महाराष्ट्र सावरत नाही तोच विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत १२ रूग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. लागोपाठ घडलेल्या या दोन भीषण दुर्घटनांनी महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. राज्यात कोरोनाने कहर केलेला असताना अशा प्रकारच्या दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. राज्याच्या पाठीमागे लागलेले आगीचे हे शुक्लकाष्ट थांबायचे नाव घेत नाही. मागील महिन्यांत भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा निष्पाप बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील भांडुप येथील ड्रीम मॉलला आग लागली. या मॉल मध्ये सनराईज नावाचे रुग्णालय होते.

या रुग्णालयात ७६ रुग्ण उपचार घेत होते त्यात काही कोव्हीड रुग्ण देखील होते. आग लागल्यानंतर अग्निशमन जवानांनी काही रुग्णांना वाचवले असले तरी या आगीत रुग्णालयातील बारा रुग्णांचा जळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली. सातत्याने होणाऱ्या या दुर्दवी घटनांनी राज्यात खळबळ माजली आहे. राज्यात अलीकडे मॉल संस्कृती उदयास आली आहे. या मॉलमध्ये विविध प्रकारच्या चीजवस्तू विकायला असतात. काही मॉलमध्ये विविध प्रकारच्या सेवाही दिल्या जातात पण मॉलमध्ये रुग्णालयही असते हे पहिल्यांदाच समजले. मॉलमध्ये रुग्णालय कसे असू शकते हा प्रश्न जनतेला पडला आहे. मॉलमध्ये रुग्णालयाला परवानगी मिळालीच कशी? मॉल आणि रुग्णालय या दोन्ही भिन्न गोष्टी आहे. या मॉलमध्ये रुग्णालय उभारताना अग्नी सुरक्षेचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले होते हे त्या अग्नी तांडवावरुन स्पष्ट झाले.

भंडारा आणि भांडुपमध्ये जो निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा दिसून आला तोच नाशिक आणि विरारमध्ये पाहायला मिळाला. नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाली. एककिडे राज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्ण दगावत आहेत तर नाशिक सारख्या शहरात ऑक्सिजन गळतीमुळे रुग्ण दगावत आहे. ज्या कंपनीने नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट बसवला त्या कंपनीचा तंत्रज्ञ व्यक्ती ऑक्सिजन प्लांटवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिथे असणे गरजेचे होते पण तिथे ऑक्सिजनचे नियंत्रण करणारा कोणताही तंत्रज्ञा नव्हता. ही अक्षम्य चूक आहे. रुग्णालय आणि प्रशासनाच्या अक्षम्य चुकीमुळे २४ निष्पाप रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. विरारमधील रुग्णालयातही वातानुकूलित यंत्रणेत स्फोट झाल्याने आग भडकली असा प्राथमिक अंदाज आहे याचाच अर्थ रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्तीकडे आणि फायर ऑडिटकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले.

रुग्णालय प्रशासनाच्या या अक्षम्य चुकीमुळे निष्पाप रुग्ण मृत्यूच्या दाढेत जात आहेत. सुरक्षेचे नियम न पाळल्यानेच या दुर्घटना घडत आहेत. भंडारा, भांडुप, नाशिक आणि विरार येथील दुर्घटना म्हणजे नियमांच्या पायमल्लीचा कडेलोट आहे म्हणूनच रुग्णालयात घडलेल्या या दुर्घटनांची कसून चौकशी व्हायला हवी. विरारमधील अग्नितांडवास तसेच नाशिकमधील ऑक्सिजन गळतीस जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी. या अग्नितांडवानंतर रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रुग्णालयाला आग लागण्याची ही देशातील पहिलीच घटना नाही. भंडाऱ्यातील दुर्घटना तर ताजीच आहे. गुजरात, राजस्थान, दिल्ली या राज्यातही रुग्णालयांना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

इंटरनॅशनल जनरल ऑफ कम्युनिटी मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ च्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की गेल्या दहा वर्षांमध्ये देशातील रुग्णालयांमध्ये आगीच्या ३३ मोठया दुर्घटना घडल्या आहेत. १० वर्षात ३३ दुर्घटना घडून त्यात शेकडो रुग्णांचा प्राण जाऊनही प्रशासन त्यातून धडा घेत नाही. दुर्घटना घडल्यानंतर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोग नेमला जातो. या आयोगाचे पुढे काय होते हे कोणालाही समजत नाही. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर काय कारवाई होते हे देखील गुलदस्त्यात राहते. पुढची दुर्घटना घडल्यानंतर पुन्हा तेच प्रश्न उपस्थित केले जातात पण आग लागूच नये यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाही. जोवर आग लागू नये म्हणून ठोस उपाययोजना केल्या जात नाही तोवर रुग्णांच्या जीवाशी हेळसांड होतच राहणार.

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौड,जिल्हा पुणे)९९२२५४६२९५

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED