पुनरुज्जीवन : जैनधर्म व श्रमणसंघ !

26

(भगवान वर्धमान महावीर जयंती)

केवलज्ञान प्राप्त केल्यानंतर महावीरांनी असे शिकवले की अहिंसा, सत्य, अस्तेय – चोरी न करणे, अपरिग्रह व ब्रह्मचर्य ही पंचमहाव्रते आध्यात्मिक मुक्तीसाठी आवश्यक आहेत. त्यांनी अनेकान्तवाद म्हणजे अनेक बाजूंनी केलेले सापेक्ष कथन व स्याद्वाद यांचे सिद्धांत शिकवले. महावीरांची शिकवण त्यांचे मुख्य शिष्य इंद्रभूती गौतम यांनी ‘जैन आगम’ म्हणून संकलित केली. जैन आचार्यांनी प्रसारित केलेले ग्रंथ १९व्या शतकात जेव्हा ते प्रथम लिहून ठेवले गेले होते, ते मोठ्या प्रमाणावर गमावले गेले आहेत. महावीरांनी शिकवलेल्या आगमाच्या उर्वरित आवृत्त्या काही जैन धर्माचे आधार ग्रंथ आहेत.

भ.महावीर वर्धमान (इ.स.पू.५९९-५२७) हे जैन धर्मातील चोवीस तीर्थंकरांपैकी अखेरचे तीर्थंकर ठरले. त्यांच्या आधी या धर्माचे २३ तीर्थंकर होऊन गेले, असे येथील अनुयायी मानतात. त्यामुळे ते या धर्माचे संस्थापक ठरत नाहीत; परंतु या धर्माला प्रभावशाली बनविण्याचे फार मोठे श्रेय्य त्यांच्याकडे जाते. त्यामुळे जगातील प्रमुख धर्म संस्थापकांच्या मालिकेतील गौतम बुद्धवगैरेंच्यासह त्यांचे नाव घेतले जाते. इ.स.पू.सहावे शतक हे सांस्कृतिकदृष्ट्या उलाढालीचे शतक होते. या शतकात मगध देशातील सध्याच्या द.बिहारमधील वैशाली नगरीच्या उपनगर कौंडिण्यपुरात महावीरांचा जन्म झाला. त्यांचे वडील सिद्धार्थ हे तेथील प्रमुख होते. त्यांची आई त्रिशला ही वैशालीच्या लिच्छवी वंशीय राजाची मुलगी होती. विदेहदिन्ना व प्रियकारिणी या नावांनीही ती ओळखली जात असे. भ.महावीर गर्भात असताना त्यांना देवानंदा नावाच्या ब्राह्मणीच्या उदरातून त्रिशला या क्षत्रिय राणीच्या उदरात आणण्यात आले होते, अशी एक पुराणकथा आहे. त्यांची प्रवृत्ती बालपणापासूनच चिंतनशील व वैराग्यशील होती. परंतु तुम्ही हयात असेपर्यंत गृहत्याग करणार नाही, असे वचन त्यांनी आईवडिलांना दिले होते.

आईवडिलांच्या मृत्यूनंतरही नंदिवर्धन या थोरल्या भावाच्या विनंतीवरून ते काही काळ घरी थांबले व वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. दिगंबर पंथातील अनुयायांच्या मते ते आयुष्यभर अविवाहित होते तर श्वेतांबर पंथातील अनुयायांच्या मते ते विवाहित होते; यशोधरा असे त्यांच्या पत्नीचे नाव होते. त्यांना अनुजा नावाची मुलगी सुद्धा होती.आईवडिलांनी वर्धमान असे त्यांचे नाव ठेवले होते; परंतु ते ‘महावीर’ या नावानेच विख्यात झाले. सर्पाचे हिंसकत्व नष्ट केल्यामुळे त्यांना महावीर हे नाव मिळाले, अशी कथा आढळते. त्यांना वीर, अर्हत, सन्मती व वैशालिक अशीही नावे देण्यात आली होती. ते ‘ज्ञातृ’ नावाच्या गणात जन्माला आल्यामुळे त्यांना ज्ञातृपुत्र वा नातपुत्त असेही म्हटले जात असे. आजही वैशालीच्या आसपास राहणारे जथरिया नावाच्या जातीतील लोक स्वतःला ज्ञातृवंशाचे समजतात. तर भ.महावीरांना आपले पूर्वज मानून त्यांची जयंती साजरी करतात. त्यांनी विकार जिंकल्यामुळे त्यांना जिंकणारा या अर्थाचे ‘जिन’ हे नाव मिळाले. या नावावरूनच ‘जैन’ ही प्रसिद्ध संज्ञा रूढ झाली. त्यांना केवलज्ञान प्राप्त झाल्यामुळे केवलिन असेही म्हटले जाई. त्यांचे मन गृहस्थधर्मामध्ये रमले नाही, त्यांनी गृहत्याग केला.

नंतरची १२ वर्षे त्यांनी खडतर तप केले. अखेरीस वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. त्यानंतर मृत्यूपर्यंत म्हणजेच पुढची तीस वर्षे ते धर्मोपदेश करीत राहिले. त्यांनी जैन धर्माचे व श्रमणसंघाचे पुनरुज्जीवन केले. त्यामुळेच त्यांच्याविषयी धर्म संस्थापकांइतका पूज्यभाव लोकांच्या मनात निर्माण झाला. त्यांनी जातिव्यवस्थेवर हल्ला चढविला व सर्व जातिजमातींच्या लोकांना शिष्य म्हणून स्वीकारले. एवढेच नव्हे तर स्त्रियांनाही संन्यासाचा अधिकार असल्याचे मान्य केले. सर्वसामान्य माणसांना आपला उपदेश समजावा, अशी भावना असल्यामुळे त्यांनी संस्कृत भाषेऐवजी अर्धमागधी या प्राकृत भाषेचा वापर केला.

भगवान महावीर हे वीर, अतिवीर, सन्मती व वर्धमान म्हणूनही ओळखले जात. त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी पूर्व-वैदिक काळातील तीर्थंकरांच्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणींचा विस्तार केला. वयाच्या तीसाव्या वर्षी त्यांनी सर्व ऐहिक संपत्ती, संसार व राजपाट याचा त्याग केला. आध्यात्मिक जागृतीचा प्रसार व आत्मकल्याण करण्यासाठी जैन दिक्षा घेऊन ते एक तपस्वी बनले. महावीरांनी बारा वर्षांपर्यंत महान तप आणि आत्मध्यान केले. त्यानंतर त्यांनी केवलज्ञान – सर्वज्ञता प्राप्त केले. तीस वर्षे भारतभर त्यांनी जैन तत्वज्ञानाचा प्रचार केला. ते ध्यानधारणेच्या अवस्थेत असलेले वा सिंहाकिंत चिन्हासह अशा त्यांच्या मूर्ती भारतातील जैन तीर्थक्षेत्री आढळून येतात. चैत्र शुध्द त्रयोदशी हा त्यांचा जन्मदिवस ‘भ.महावीर जयंती’ म्हणून साजरा केला जातो आणि त्यांचे निर्वाणपर्व जैन अनुयायी दीपावली म्हणून साजरे करतात. दिप+आवली म्हणजे दिव्यांची माळ अर्थात त्यांच्या उपदेशाने दिव्य अशा मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक अशा ज्ञानाची परंपरा निर्माण झाली. तेव्हापासून ज्ञानाचे अखंड दिप तेवत राहोत अशा भावनेने दिपावली साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. आश्विन वद्य अमावस्येच्या मध्यरात्री ७२व्या वर्षी भ.महावीरांना राजगृहाजवळील पावापुरी येथे निर्वाण प्राप्त झाले. तेथे त्यांचे अंतिम निर्वाणस्थळ आहे.
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे भगवान वर्धमान महावीर यांच्या पावन चरणी त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन !!

✒️संकलन व लेखन:-निकोडे कृष्णकुमार गुरुजी.
(संत व लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक.)
मु. पो. ता. जि. गडचिरोली. व्हा.नं. ७४१४९८३३३९.