गंगाखेडच्या गोदापात्रात पाण्यासाठी हाय होल्टेज ड्रामा

28

🔹पाणी कमी पडू देणार नाही – आ. गुट्टे

🔹शहरवासीयांची भटकंती नको – यादव

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.24एप्रिल):- गंगाखेड शहरासाठी आरक्षीत असलेल्या गोदावरीत असलेल्या कच्च्या बंधाऱ्यावर काल रात्रीपासून हाय होल्टेज ड्रामा झाला. रात्रीतून पाणी सोडून देण्यात येवू नये म्हणून पोलीसांनी तेथे दंगा नियंत्रण पथक नेमले. तर आज सकाळी त्याच ठिकाणी झालेल्या बैठकीत या पाणीसाठ्याचे ऑडीट करून शिल्लक राहणारे पाणी खालील गावांसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मी शहरासाठी पाणी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आ. रत्नाकर गुट्टे यांनी दिली. तर शहरवासीयांची कोरोना काळात भटकंती होवू नये, एवढाच आपला ऊद्देश असल्याचे कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी यावेळी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून गोदापात्रातल्या कच्च्या बंधाऱ्यातील पाण्यावरून वातावरण चांगलेच तापलेले आहे. आ. रत्नाकर गुट्टे यांनी खालच्या भागातील गावांसाठी हे पाणी सोडण्याची आग्रही भुमिका घेतली. तर कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी हे पाणी शहरवासीयांसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने सोडण्यास तीव्र विरोध केला. यादव यांच्या तक्रारीवरून येथे पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे. या दरम्यान काल ) दि. २३ ) रोजी आ. गुट्टे यांचेसह काही पदाधिकाऱ्यांनी सदर पाणी सोडण्याची तयारी केली होती. ही बाब समजताच गोविंद यादव, नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी जिल्हाधिकारी डॉ. दीपक मुगळीकर, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांचेशी संपर्क साधत हा प्रकार थांबवण्याची मागणी केली. पो. नि. वसुंधरा बोरगावकर यांनी लगोलग बंधरास्थळी धाव घेत तेथे हजर असणारांना पाणी सोडण्यापासून रोखले.

जिल्हाधिकारी आणि आ. गुट्टे यांच्यात दुरध्वनीवरून झालेल्या चर्चेनंतर आज न. प. प्रशासनासोबत बैठक घेण्याचे ठरले. बंधारास्थळीच आज ( दि. २४ एप्रिल ) रोजी ही बैठक पार पडली. ऊपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी स्वरूप कंकाळ, ऊपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे, न. प. च्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता पाटील आदी यावेळी ऊपस्थित होते. आगामी दोन महिण्यांत शहरासाठी आवश्यक असलेले अंदाजे ९ कोटी लीटर पाणी याच बंधाऱ्यात सुरक्षीत ठेवून ऊर्वरीत पाणी खालच्या भागातील शेती आणि मुक्या जनावरांसाठी सोडण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला.

खालच्या भागातील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेटून मागणी केल्यामुळेच आपण ही भूमिका घेतली असल्याचे आ. रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी सांगीतले. हे पाणी कमी झाले तरी शहरासाठी कुठल्याही परिस्थितीत पाणी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगर परिषदेची असून ती पार पाडण्यासाठी हे पाणी आवश्यक असल्याचे नगराध्यक्ष विजयकुमार यांनी सांगीतले. तर खालच्या भागातील गावांसाठी अतिरीक्त पाणी मागवून घ्यावे, अशी मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केली. ऐन ऊन्हाळा आणि कोरोना काळात शहरवासीयांची पाण्यासाठी भटकंती होवू नये, एवढीच अपेक्षा असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले. जि. प. सदस्य प्रल्हाद झोलकर यांनी झोला, पिंप्री, मसला आदि गावांमधील शेतकऱ्यांच्या अडचणी मांडत या शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याची मागणी आक्रमक होत मांडली. शिवसेना जिल्हा ऊपप्रमुख विष्णू मुरकुटे यांनी डिग्रस बंधाऱ्यातील पाणी सोडण्यास कोणीही विरोध न केल्याचा मुद्दा मांडत पाणी सोडण्यास विरोध केला. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष माधव भोसले, बजरंग दलाचे संजयलाला अनावडे, युवा नेते सुशांत चौधरी, धनगर साम्राज्य सेनेचे अध्यक्ष सखाराम बोबडे, नगरसेवक बाळासाहेब राखे, दीपक तापडिया, शेख साबेर, गोविंद ओझा, धारखेडचे सरपंच प्रा. मुंजाजी चोरघडे, विहींप चे सुधाकर चव्हाण, माजी सरपंच नारायण घनवटे, ऊद्धव धारखेडकर आदिंसह बहुसंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी ऊपस्थित होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.