धक्कादायक सोलापूरच्या वाटणीचे ५ टीएमसी पाणी इंदापूरसाठी?

27

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.24एप्रिल):- जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या उजनी धरणातून बारामतीकरांनंतर आता इंदापूरकरांनी पाणी पळविले आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी त्याचा चांगलाच फायदा घेत ‘उजनी’तून 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला घेऊन जाण्याचा घाट घातला आहे. त्याला आता मंजुरीही मिळालेली आहे.तरीही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहे, हे दुर्दैव म्हणावे लागेल,उजनी धरणावर सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध योजना अवलंबून आहेत. ‘उजनी’तून पाणी सोडण्यावरुन कित्येक वेळ मारामारी झाले आहे.
यंदा उजनीत पुरेशा प्रमाणात पाणी असल्याने सर्व आवर्तन वेळेवर सोडण्यात आल्याने पाण्याचा प्रश्न भेडसावला नाही. यापुर्वी ‘उजनी’तून पाणी पळविण्यात यापुर्वी बारामतीकर यशस्वी झाले होते.

मात्र, भाजप सत्तेत आल्यानंतर खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या मागणीनुसार बारामतीला जाणारे पाणी रोखले होते.आता महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर ही स्थगिती उठवून पाणी उचलण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ‘उजनी’तून इंदापुरसाठी पाणी नेण्यासंदर्भात पालकमंत्री भरणे यांनी सोशल मिडियावर पोस्ट केले आहे की, नीरा डावा कालव्यावरील २२ गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून मी प्रयत्नशील होतो.
उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यासंबंधी सतत पाठपुरावा करत होतो. माझ्या या प्रयत्नांना आज यश मिळालं. इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील शेती सिंचन व नीरा डावा कालव्यावरील २२ गावांच्या शेतीसाठी उजनी जलायशातून ५ टीएमसी पाणी उचलण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.

इंदापूरकरांसाठी आनंददायी तर सोलापूरकरांसाठी वेदनादायी इंदापूर तालुक्यासाठी हा अत्यंत आनंदाचा व ऐतिहासिक क्षण आहे. या निर्णयाने दोन्ही कालव्यांवरील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून वर्षानुवर्षे तहानलेल्या गावांचा पाणीप्रश्न आता कायमचा मिटणार आहे, अशा शब्दात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोशल मिडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.त्यांच्या ह्या आनंददायी भावना सोलापूरकरांच्या दृष्टीने वेदनादायी म्हणावा लागेल. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भावना तीव्र होण्याची शक्यता वर्तविली आहे.