विद्यार्थी जीवनाची अग्निपरीक्षा

28

माणसाच्या आयुष्यात परिक्षेविना कोणतीही गोष्ट घडत नाही.जीवन यशस्वी करायचं असेल तर परीक्षा देणे अनिवार्य असते.विद्यार्थी हा देशाचा खरा आधारस्तंभ असतो.त्यांच्या कार्यकर्तृत्वावर देशाची शान असते.तो देशाला उन्नत व विकसित करण्यासाठी झटत असतो.विद्यार्थी सदोदीत ज्ञानपरायन असावा.विद्यार्थी काळातील संघर्ष नवक्रांतीचा मार्ग प्रस्थ करतो. राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले ,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,भगतसिंह ,राजगुरू सुखदेव यांनी तरूणपणातच मोठा मानवतावादी संघर्ष केला त्याच्या त्यागातूनच आपण चांगल्या स्थितीत आज वावरत आहोत.डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी स्वतःला आजीवन विद्यार्थी म्हणून घेतले.या जगात असीमीत ज्ञान आहे.त्या ज्ञानाचा एक एक थेंब प्राशण करून राष्ट्राच्या हितासाठी त्यांनी उपयोगात आणला.त्यांच्या अथक ज्ञानपरिश्रमाने हजारोवर्षापासून अज्ञानाच्या काळोखात असलेल्या सर्व मानवाला नवऊर्जा देऊन क्रांतीसाठी तयार केले.

विद्यार्थी हा ज्ञानसागरात पोहणारा मासा आहे.स्वतःच्या ज्ञानक्रांतीने तो नवनवी क्षितीजे पादाक्रांत करतो.विद्यार्थी फक्त बोर्डाची परीक्षास महत्वाची नसते .तर तो भ्रुणअवस्थेपासूनच परीक्षा देत असतो.परीक्षा ही अविरत चालणारी क्रिया आहे.जीवन जगायचं असेल तर तथागत गौतम बुध्दांचा स्वयं दीप व्हा हा मुलमंत्र सर्व विद्यार्थांनी हृदयात कोरला पाहिजे.
आजच्या कोरोनाच्या महामारीने साऱ्या विश्वातील शिक्षण प्रक्रियेला ब्रेक केले आहे.भारतातील शिक्षण क्षेत्रासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहेत.अनेक परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत.विद्यार्थी मानसिक व शारिरीक दुभंगून जात आहे.ऑनलाईन शिक्षणाने देशाला दोन भागात विभागले आहे.एक शहरी व श्रीमंत भारत तर दुसरा ग्रामीण व गरीब भारत.ही निर्माण झालेली दरी आपण कशी भरून काढणार हा मोठा प्रश्न सरकार पुढे पडला आहे.कोरोनाचे जे तांडव आज उभे झाले आहे हे परतवण्यासाठी शास्त्रज्ञांनी दिलेली गाईडलाईन सर्व भारतीयांनी पाळणे गरजेचे आहे.

तरच या कठीण परीक्षेत आपण नक्कीच विजयी होवू शकतो अशी मला आशा आहे.शिक्षण हा मानवाचा अनमोल दागिणा आहे.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हा ज्ञानमंत्र राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी लोकांना दिला होती.ते शिक्षणाला समाजउत्थानाचा मुलभूत स्त्रोत समजत होते.स्त्री व बहुजन समाजाच्या अज्ञानाचे खरे कारण शिक्षण न मिळे हे होय.यासाठी अविरत लढा देऊन नवा विद्यार्थी तयार करून समाजाला नवे तत्वमुलक विचार दिले.काही विद्यार्थी परिक्षेत पास होण्यासाठी अनेक वाईट मार्गाचा अवलंब करतात.कॉपी करून परीक्षेत पास होणे ही अत्यंत धोकादायक व लाछन्न आणणारी गोष्ट आहे.वशिलेबाजी करून परीक्षेत पास होणारे विद्यार्थी देशाचे खरे आधारस्तंभ होऊ शकत नाही.विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीवर परीक्षेत यशस्वी व्हावं.हाच एकमेव चांगला मार्ग आहे.
आज भारतात कोरोनाच्या महामारीत अनेक उच्चशिक्षित माणसे काळाबाजार करत आहेत.दुःखाचा डोंगर उभा असलेल्या नातेवाईकांचे खच्चीकरण करत आहे.काही राजकिय पक्षाचे नेते अशा काळाबाजारात सक्रिय आहेत ही अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे.अशा कठीण काळात सर्व मानवाने धर्म,जात,वंश,पंथ,यांचा विचार न करता सर्व रूग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी साथ द्यावी.आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्व भारतीयांना व्हावा ही आशा आहे.

देशात घडणाऱ्या घटनेकडे विद्यार्थांनी चिकित्सक दृष्टीने बघावे.नव्या बदलांचे प्रयोजन ओळखून नवा क्रांतीपथ तयार करावा.अभ्यासाची योग्य रणनीती तयार करून यशस्वी परीक्षा द्यावी.परीक्षेच्या गर्भातूनच यशस्वीतेची प्रभा उजळत असते.विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनानुसार करीयरची निवड करावी.पालकांनी आपल्या मुलांवर बळजबरी करून घेऊ नये.मुलांचा मानसिक ,बौध्दिक ,व शारिरीक विचार करून अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे.जेणे करून मुलगा जीवनाच्या परीक्षेत पास होईल.आजच्या अग्नीज्वालेने होरपळणाऱ्या युगात आपला विद्यार्थी कसा यशस्वी होईल याचे मार्गदर्शन गुरूजीने करावे.गुरूजीने आपले धार्मिक व सांस्कृतिक विचार विद्यार्थांवर थोपवू नये तर नव्या जगाचे नवे ज्ञान द्यावे.

आमची पुरातन शिक्षण प्रणाली चांगली असा ठेंबा मिरविण्यापेक्षा वर्तमानाचे वास्तव ध्यानात घ्यावे.भारतीय संविधानिक अधिकाराची व विचारशीलतेची ओळख करून द्यावी.बुरसटलेल्या विचारांना दुर सारून नवा आत्मविश्वास विद्यार्थांत प्रज्वलीत करावा.विद्यार्थांत वैज्ञानिक दृष्टी जागृत करावी.विद्यार्थ्यांनी शिलाचे पालन करावे . आपल्याला जर जगासोबत चालायचं असेल तर नवज्ञानाची कास धरावी.तेव्हाच देशाचा व समाजाचा विकास होईल . योग्य मार्गाचा अवलंब केला तर विद्यार्थी जीवनाच्या अग्निपरीक्षेत नक्कीच यशस्वी होईल असे मला वाटते.

✒️लेखक:-संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००