पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा पुतळा उजनी जलाशयात बुडवून महिलांचा आर्त टाहो

27

🔺अतुल खुपसे पाटलांनी केले आंदोलन

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)

सोलापूर(दि.25एप्रिल):- जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातून ५ टी.एम.सी. पाणी इंदापूरला नेला असून या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी झाली आहे. इंदापूरकरांसाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याच्या बातम्या सोलापूर जिल्ह्यात धडकल्या आणि याच निर्णयाविरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये रणकंदन माजले. पालकमंत्री भरणे यांच्या या सोलापूर जिल्ह्यावरील अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात शेतकरी नेते अतुल खूपसे-पाटील यांनी आंदोलन करत पालकमंत्री भरणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची तिरडी करून अंत्यविधी करत पुतळ्याला उजनी जलाशयात बुडवुन निषेध व्यक्त केला.

यावेळी बोलताना अतुल खूपसे पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळ हटवण्यासाठी उजनी जलाशयाची स्थापना केली. यशवंतरावांच्या आव्हानाला उजनी परिसरातील शेतकऱ्यांनी साथ दिली. उजनीच्या निर्मितीसाठी परिसरातील शेकडो गाव आणि हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या. इथल्या लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. त्यामुळे उजनी जलाशयाच्या पाण्यावर फक्त आणि फक्त सोलापूर जिल्ह्याचा अधिकार असल्याचे त्यावेळी त्यांनी ठासून सांगितले होते. मात्र आज सोलापूरकरांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारला जात आहे. एकीकडे जिल्ह्याचे ‘पालक’मंत्री म्हणून घ्यायचे आणि दुसरीकडे जिल्ह्याला ‘अनाथ’ करायचं हा पालक मंत्री भरणे यांचा दुतोंडी खेळ आहे.

भलेही इंदापूरकर साठी ही बातमी आनंददायी असली तरी सोलापूर घरांसाठी वेदनादायी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा येणाऱ्या काळात याबाबत तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून पुतळ्यासमोर महिला वर्गांनी ‘भरणेंना सोलापूरचा पालकमंत्री केलं गं बया, यांनी उजनीचं पाणी इंदापूरला न्हेलं गं बया’, मामा असं कसं केलं ओ, आमच्या हक्काचं पाणी का चोरलं ओ, अशा ओव्या गावुन रडारडी केली. त्यानंतर पुतळा घेवुन अंत्ययात्रा काढली तर अंत्यविधी करुन पाणी पाजण्याऐवजी अतुल खुपसे-पाटील यांनी त्यांचा पुतळा उजनी जलाशयात बुडविला. यावेळी विठ्ठल मस्के, राणा महाराज, जयसिंग पाटील, दिपाली डिरे, सुवर्णा गुळवे, दत्ता डिरे, हणु कानतोडे, अतुल राऊत, सुरज कानतोडे उपस्थित होते.