वीर हनुमानाची दिव्य रामभक्ती !

[वीर हनुमान जयंती विशेष]

हनुमान ऊर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा आहे. तो प्रभू श्रीरामचंद्रांचा महान भक्त, दास व दूत मानला जातो. त्याचा जन्म चैत्र पौर्णिमेला अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे. त्याचे वडील केसरी अर्थात पवन होय. वीर हनुमान हा अतिशय ताकदवान-महाबली होता. त्याला अनेक शक्ती व सिद्धी प्राप्त होत्या. लहानपणी त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने फेकले. त्या प्रहाराने हनुमानाचे तोंड वाकडे झाले व तो बेशुद्ध पडला. नंतर देवांनी भीतीपोटी त्याला ”तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल” असा शाप दिला. त्याची बजरंगबली, हनुमंत, मारुती, वायुसूत, पवनपुत्र, केसरीनंदन आदी नावे सांगितली जातात. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते.

या दिवशी हनुमंताच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ होते. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. परंतु मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या मृत्यूतांडवाने सर्व मंदिरे बंद आहेत. त्यामुळे घरात राहूनच हनुमान भक्तांना जयंती उत्सव साजरा करावा लागणार आहे. महाराष्ट्रात हनुमानाला मारुती म्हणतात. येथे शनिवार तर उर्वरित भारतात शनिवार व मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आहे.प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना त्याची व हनुमानाची भेट झाली. रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि रामाचा निरोप सीतेला पोचवला. याच वेळी नारदमुनींनी आठवण करून दिल्याने त्याला त्याच्या महापराक्रमी शक्तीची जाणीव झाली.

ते वर्ष इ.स.पू.५०६७ होते, असे दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च येथील संशोधकांचे म्हणणे आहे. लंकाधिपती रावणाच्या सैनिकांनी मारुतीला पकडून रावणासमोर उभे केले व त्याच्या शेपटीला कपड्यांच्या चिंध्या बांधून त्यास आग लावली. तेव्हा त्याने घरांघरांवर उड्या मारत आपल्या जळत्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली व लंका सोडली. परत जाऊन त्याने सीतामातेचे वर्तमान प्रभू श्रीरामास कळवले. प्रभूने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले. या युद्धात हनुमानाने श्रीरामास मोठी मदत केली. जेव्हा श्रीरामबंधू लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घॆतली. पर्वतावर त्याला हवी ती वनस्पती ओळखू न आल्याने त्याने पूर्ण द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले होते. वीर हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव होय. म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा प्रभू श्रीरामचंद्राचे नाव घेतले जाते तेथे मारुती हजर असतो, असे म्हणतात.

याच माहितीच्या आधाराने संतकवी तुलसीदासाने मारुतीला शोधून काढले. अशा या शूरवीर मारुतीचा उल्लेख महाभारतात देखील येतो. तो तेथे युद्धादरम्यान अर्जुनाच्या ध्वजावर बसून असतो.हनुमानाच्या जन्मतिथी व जन्मस्थानाबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. उत्तर व दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी होते. तामिळनाडूत आणि केरळात ती मार्गशीर्षात तर ओरिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी होते. चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला असे महाराष्ट्रात मानले जाते, त्यामुळे त्यादिवशी त्या राज्यात हनुमान जयंती असते. हनुमानाचा जन्म नरक चतुर्दशीच्या दिवशी झाला, असे उत्तर भारतात समजले जाते. या दिवशी महाराष्ट्रात आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि उत्तर भारतात कार्तिक कृष्ण चतुर्दशी असते. वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला.

चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते, असे म्हणतात. भारतातील दाक्षिणात्य ग्रंथांमध्ये हनुमानाला सुवर्चला नावाची पत्नी होती. ती सूर्यदेवाची कन्या होती. हनुमानाचे हे लग्न ज्येष्ठ शुद्ध दशमीला झाले, अशी नोंद पहावयास मिळते. कोरोना या प्राणघातकी संकटाला हरविण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर व सुरक्षित शारीरिक अंतर पाळत मारुतीला प्रार्थना करुया. जय श्रीराम, जय हनुमान!
!! हनुमान जयंती निमित्त सर्व भक्तमंडळींना पुरोगामी संदेश परिवाराच्या भक्तिमय हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री कृ. गो. निकोडे गुरुजी.
मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.
जि. गडचिरोली व्हा.नं. ७४१४९८३३३९.

गडचिरोली, धार्मिक , महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED