रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या एक दिवसाच्या उपोषणाची सांगता !

31

🔹ठाणेदारांच्या उपस्थितीत उपोषण तात्पुरते मागे !

✒️इकबाल पैलवान(वर्धा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-९९२३४५१८४१

हिंगणघाट(दि.27एप्रिल):-येथील उपजिल्हा रुग्णालयात आक्सिजनच्या सोयीसह 200 बेड्सची व्यवस्था करण्यात यावी या मागणी आज सोमवार,दि.26 एप्रिलला प्रहारचे विदर्भ विभाग प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी आपल्या स्वतःच्या घरावरील छतावर 12 तासाचे लाक्षणिक उपोषण केले.
सायंकाळी 7 वा. हिंगणघाटचे ठाणेदार श्री संपत चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले.तत्पूर्वी येथील उपविभागीय अधिकारी श्री चंद्रभान खंडाईत यांनी सायंकाळी ६ वाजता व्वाट्स-उप कॉल वरून श्री कुबडे यांच्याशी चर्चा करून या मागणी बाबत प्रशासकीय पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू असून या निर्णयासाठी थोडा अवधी देण्याची विनंती केली.

रुग्णमित्र गजू कुबडे यांची प्रमुख मागणी ही शहर,ग्रामीण भाग व समुद्रपूर तालुका येथे दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे.येथील व्यवस्था अपुरी असल्यामुळे अनेक रुग्णांना बाहेरगावी उपचारासाठी जावे लागत आहे.त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड्सची व्यवस्था करावी ही त्यांची मुख्य मागणी आहे. सर्व परिस्थिती पाहता येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत आक्सिजनच्या व्यवस्थेसह 200 बेड्सची व्यवस्था केली तर या भागातील गोरगरीब रुग्णांना येथेच उपचार घेता येईल व त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेलच सोबत सावंगी,व सेवाग्राम येथील दवाखान्यांवर पडणारा ताणही हलका होईल.

या संपूर्ण बाबीचा विचार करून श्री गजू कुबडे यांनी 22 एप्रिलला जिल्हाधिकारी वर्धा याना उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन दिले होते. व या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रुग्णमित्र गजू कुबडे यांनी आज 26 एप्रिलला स्वतःच्या घराच्या छतावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. मागणी मान्य न झाल्यास प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या मागणीबाबत प्रशासन गंभीर पणे सकारात्मक विचार करीत असल्याचे संकेत आजच्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या चर्चेवरून प्राप्त झाले आहेत.