परळीच्या जुन्या पिढीतील प्रसिद्ध निर्भिड पत्रकारतथा सा.जगमित्रचे संस्थापक संपादक भास्करराव जोशी यांचे निधन

25

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी वैजनाथ(दि.27एप्रिल):-येथील गणेशपार भागातील प्रतिष्ठित व सर्व परिचित असलेल्या तथा जुन्या पिढीतील निर्भिड जेष्ठ पत्रकार, संपादक भास्करराव जोशी यांचे आज दि.२६ रोजी औरंगाबाद येथे निधन झाले.क्षेत्रोपाध्याय वामनगुरु जोशी व ना.धनंजय मुंडे साहेबांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने परळी व बीड जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातील जुना,जाणता, मार्गदर्शक हरवल्याची शोकभावना व्यक्त होत आहे. भास्करराव जोशी यांच्यावर औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात गेल्या २५ दिवसांपासून उपचार सुरू होते.या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी ते ७५ वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात वामन व प्रशांत ही दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिवंगत भास्करराव जोशी यांच्यावर औरंगाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मनमिळाऊ स्वभाव, सामाजिक व न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याची वृत्ती , निर्भिड बाणा, रोखठोक पत्रकारिता असा त्यांचा सर्वदुर परिचय होता.अनेक वर्षे त्यांनी परळीत सक्रिय पत्रकारिता केली.जुन्या परळीच्या जडणघडणीत पत्रकार म्हणून त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे.परळीतील विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक स्तरावर त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला.ते साप्ताहिक जगमित्रचे संस्थापक संपादक होते. जुन्या गावभागातील एक मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून भास्करराव जोशी परिचित होते. त्यांच्या निधनाने परळी व बीड जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातील जुना,जाणता, मार्गदर्शक हरवल्याची शोकभावना व्यक्त होत आहे.

*जुन्या पिढीतील निर्भिड संपादक व मार्गदर्शक हरवला- ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना*
दरम्यान भास्करराव जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी स्विय सहाय्यक प्रशांत जोशी व कुटुंबियांचे सांत्वन करुन धीर दिला. भास्करराव जोशी (भाऊ) हे आमचे पारिवारिक सदस्य होते. वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन राहिले. त्यांच्या निधनाने परळीतील जुन्या पिढीतील निर्भिड संपादक व मार्गदर्शक हरवला असल्याची शोकभावना ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.