शेतकरी प्रयोगवाला : शेती प्रयोगशाळा !

(श्रीपाद अच्युत दाभोळकर स्मृती दिन)

कृषी शास्त्रज्ञ श्रीपाद उर्फ मुकुंद अच्युत दाभोळकर हे महाराष्ट्रातील ‘प्रयोग-परिवार’ या संकल्पनेचे प्रवर्तक आणि जमनालाल बजाज पुरस्काराचे मानकरी होते. दाभोळकर हे कोल्हापूरचे एक गणितज्ञ होते. ते कोल्हापूरजवळच्या गारगोटी महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांचा जन्म दि.२१ऑगस्ट १९२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर या शहरात झाला. आपल्याला जन्मापासूनच प्रयोग चिकटलेला आहे, असे ते म्हणत.माठात भोपळा वाढवणे, स्वत: पपई पिकवून व खाऊन त्याच्या सालींवर व बियांवर कुकूटपालन करणे, नागफणीवर शेळी वाढवणे, स्वमूत्रावर केळी वाढवणे आदी त्यांचे प्रयोग लहानपणापासूनच सुरू होते.

आपल्या पृथ्वीवरच्या सर्व प्राणिमात्रांच्या ऊर्जेचा मूळ स्रोत सूर्य हा आपल्या प्रकाशाचे सर्वाना समान वाटप करत असतो. त्याच्या या प्रकाशाला जास्तीत जास्त हिरव्या पानांनी शोषून घेतले तर शेतकरी खूप समृद्ध होऊ शकेल, हेच ते आयुष्यभर प्रयोगाने सिद्ध करत राहिले. कोल्हापूरला कुंडीत वाढविलेल्या द्राक्षाच्या एका वेलीवरच्या प्रत्येक पानाला अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळवून देऊन त्यांनी द्राक्षाच्या तब्बल शंभर घडांचे उत्पन्न मिळवले. ते बघून शेतकऱ्यांना सूर्यशेतीची महती उमगली आणि मग महाराष्ट्रात द्राक्षाची क्रांती झाली. कुठल्याही शेतकी महाविद्यालयात न शिकवता केवळ अनौपचारिक शिक्षण देऊन दाभोळकरांनी महाराष्ट्राला शेतीत समृद्ध केले.

एका रिकाम्या सिमेंटच्या पोत्यात कुजलेल्या काँग्रेस गवतावर त्यांनी ऊस लागवड केली. भरपूर उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश वापरून पाच महिने तो ऊस यशस्वीपणे वाढवला. रसायनांच्या मागे न लागता फक्त सूर्यप्रकाशाच्या शक्तीवर शेतात साखरेची निर्मिती कशी करता येईल, हे त्यांनी दाखवले. सकाळी आंघोळ करताना आपल्या शरीराचा मळ निघून जातो. या मळात शेण कुजण्यासाठी आवश्यक असणारे कोट्यवधी जीवाणू असतात, असे दाभोळकर म्हणत.आंबा व नारळ खड्डा न करता ढीग पद्धतीने घेणे, घरातील सर्वांचे आंघोळीचे पाणी वापरून सूर्यमंडल पद्धतीने रोजच्या गरजेचा भाजीपाला एका गुंठ्यात उगवणे, सजीव बांबूंचा कुंपण-बायोगॅससाठी उपयोग आदी विविध तंत्रांची माहिती त्यांच्या पुस्तकांत आहे.

बंदिस्त शिक्षणपद्धतीबद्दल दाभोळकर साशंक असत. अशा शिक्षणपद्धतीने आपण चौकटीबाहेरचे विचार करण्यास आणि स्वप्रयत्नांनी शिकण्यास अपात्र होत जातो, असे त्यांना वाटे. वैज्ञानिकतेभोवतालचे गूढ वलय दूर करून एकमेकांबरोबर वाटलेल्या सहजसाध्य ज्ञानाच्या वाटपाने होत गेलेले शिक्षण हीच प्रयोग-परिवारामागची प्रेरणा होती. कोणीतरी आपल्याला निरस, ठराविक किंवा साचेबद्ध माहिती देण्यापेक्षा स्वतःच प्रयोगशील व्हावे. आपली निरीक्षणे इतर प्रयोगशील सभासदांबरोबर वाटून घ्यावी. आपल्या माहितीचे निरीक्षणांवर आधारित स्रोत विस्तृत करण्यास त्यांचा अधिक भर होता. वैज्ञानिक संशोधन ही काही उच्चशिक्षितांची मक्तेदारी नाही. ती काही फक्त प्रयोगशाळांतच करण्याची गोष्ट नाही. अशिक्षित शेतकरीही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करून आपल्या निरीक्षणांच्या आधारावर ठोस संशोधन करू शकतात. अशाप्रकारे त्यांची शेती हीच त्यांची प्रयोगशाळा होऊ शकते, हे त्यांनी पुराव्यासह सिद्ध केले होते.

इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळा आधीच प्रयोग-परिवाराच्या रूपाने प्रयोगशील शेतकऱ्यांचे परस्पर संपर्काचे जाळे निर्माण केले. त्याद्वारे त्यांनी अनेक यशस्वी प्रकल्पांची सुरुवात केली. तासगावासारख्या दुष्काळी भागातली यशस्वी द्राक्षशेती असो अथवा बोरांची शेती असो. सौरशेतीद्वारे अधिकाधिक उत्पादन घेऊन पर्यावरणाशी पूरक असलेली, तरीही शेतकऱ्यांना समृद्ध करू शकेल, अशी प्रयोगशील शेती हेच त्यांचे उद्दिष्ट होते.

असे असले तरी त्यांच्या संशोधनासाठी त्यांना मानसन्मान, श्रेय आणि हजारोंच्या संख्येत अनुयायीही मिळाले. सन १९९० साली ते जमनालाल बजाज या प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी ठरले. अशा या दाभोळकरांना ‘द्राक्षमहर्षी’ म्हणूनही ओळखले जात होते. वयाच्या पंचाहत्तरीतही त्यांचे प्रयोग आणि त्यांचा प्रसार हे काम अविरत चालू होते, पण अशाच एका दौऱ्यादरम्यान त्यांना मलेरिया झाला आणि त्यातच दि.३० एप्रिल २००१ रोजी द्राक्षमहर्षी श्रीपाद दाभोळकर मृत्यूमुखी पडले.

!! त्यांना व त्यांच्या अचाट कृषी प्रयोगांना पुरोगामी संदेश परिवारातर्फे विनम्र अभिवादन !!

✒️संकलक व लेखक:-श्री निकोडे कृष्णकुमार गुरूजी.
(कृषीप्रेमी तथा संत-लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक.)
रा. रामनगर वॉ.नं.२०, गडचिरोली.जि. गडचिरोली. व्हा.नं. ९४२३७१४८८३.

गडचिरोली, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED