आरोग्यव्यवस्था कोलमडली

23

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कडक निर्बंध, लॉक डाऊन असे उपाय योजूनही रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आजही राज्यात दररोज ६० हजारांहून अधिक लोक कोरोनाने बाधित होत आहेत. जी अवस्था राज्यात आहे तीच अवस्था देशातही आहे. देशातही दररोज साडेतीन लाखांहून अधिक रुग्ण कोरोनाने बाधित होत आहेत. कोरोनाने मरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी आलेली कोरोनाची लाट भयंकर आहे. या लाटेने देशातील आरोग्यव्यवस्थेचे विदारक चित्र समोर आणले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्यव्यवस्था कोलमडून पडली आहे. बेडस, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे, इंजेक्शन यांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.

केंद्र सरकारकडून उपलब्ध करुन देण्यात येणारा ऑक्सिजन आणि रेमडेसीवर इंजेक्शनचा कोटा राज्यांना रुग्णसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध व्हावा ही माफक अपेक्षाही पूर्ण होताना दिसत नाही. राज्यात लसीकरण सुरू झाले असले तरी लशींच्या पुरावठ्याअभावी राज्यात लसीकरण मोहिमही ठप्प आहे अनेक केंद्रावर लस संपली असल्याच्या बोर्ड पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याचा जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात एककिडे आरोग्यव्यवस्था कोलमडून पडली असताना राजकीय नेते मात्र राजकारणाचा खेळ खेळण्यात मश्गुल आहेत. राजकीय साठमारीत सर्वसामान्य जनता मात्र अकारण भरडली जात आहे.

त्यातच पुढील तीन महिन्यात भारताची स्थिती आणखी भयंकर होणार असल्याची भीती अमेरिकेतील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. मे महिन्यात कोरोनाचा कहर आणखी वाढेल असा इशारा काही संस्थांनी दिला आहे तर स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले आहे. हे सर्व अंदाज खोटे ठरावेत अशी प्रार्थना करतानाच त्यासाठी तयारीही ठेवावी लागणार आहे. मागील वेळी जी चूक आपण केली त्याची पुनरावृत्ती झाली तर इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही. मागील वर्षी कोरोनाची रुग्णसंख्या घटल्यानंतर कोरोना देशातून हद्दपार झाला अशा भ्रमात आपण राहिलो.

पंतप्रधानांनीही आपण कोरोनावर विजय मिळवला असे जाहीरपणे सांगितले त्यामुळे शासन, प्रशासन आणि नागरिक बेसावध राहिले त्याच्याच फायदा घेत कोरोनाने संधी साधत दमदार पुनरागमन केले. त्याच्या दमदार पुनरनागमनापुढे देशातील आरोग्यव्यवस्था हतबल ठरली. त्यामुळे मागील वेळेला झालेल्या चुकीची पुनरावृत्ती टाळून तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्याकडे डोळझाक न करता तो गंभीरपणे घ्यावा. राजकीय नेत्यांनी राजकारणाच्या पुढे जाऊन एकत्रितपणे संकटाला सामोरे जाण्याची भूमिका घ्यावी. प्रशासनानेही येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज राहावे. नागरिकांनी प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करावे. स्वयंशिस्त पाळावी. कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. शासन, प्रशासन आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नानेच आपण कोरोनावर विजय मिळवू . नजर हटी… दुर्घटना घटी… या म्हणीप्रमाणे थोडीशी चूकही मोठ्या संकटाला आमंत्रण देणारी ठरू शकते.

✒️श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)