गंगाखेडच्या कोविड केंद्रात जनरेटर सुरू करण्याची मागणी

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.30एप्रिल):-येथील कस्तुरबा गांधी कोविड केंद्रात जनरेटर सुविधा ऊपलब्ध नाही. विज गेल्यास याचा रूग्णांना त्रास होत असून येथे जनरेटर सुविधा तात्काळ ऊपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी पालकमंत्री नवाब मलीक, आ. सुरेश वरपुडकर व जिल्हाधिकारी डॉ दीपक मुगळीकर यांचेकडे केली आहे.

दोन दिवसांपूर्वी अचानक झालेल्या पॉवर कंझम्शनमुळे येथील वायरींग जळाली होती. यामुळे कोरोना बाधीत रूग्णांना एक रात्र आणि संपुर्ण दिवस विजेविना काढावा लागला. पंखे बंद असल्याने ऐन ऊन्हाळ्यात रूग्णांची तगमग झाली. तसेच मोबाईलही चार्जींग करता न आल्याने त्यांचा नातेवाईकांशी संपर्क तुटला. या बाबींचा परिणाम रूग्णांच्या मानसिकतेवर झाला.

नगर परिषदेचे विज अभियंता माळी यांनी पहाटेपासून सायंकाळ पर्यंत युद्धपातळीवर काम करत हा विज पुरवठा सायंकाळी सुरू केला. आता येथील विज पुरवठा सुरळीत झाला असला तरी विज गेल्यास रूग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथे जनरेटर सुविधा असणे आवश्यक असल्याने तो तात्काळ बसवण्यात यावा, अशी मागणी गोविंद यादव यांनी केली आहे.

कोविड केंद्रांचे प्रमुख डॉ सुनिल कुगणे, डॉ रीता बाराहाते यांनी दिलेल्या माहिती नुसार १०० बेड क्षमता असलेल्या या केंद्रातून आतापर्यंत जवळपास एक हजार रूग्णांवर ऊपचार करण्यात आले असून सध्या ६० कोरोना बाधीतांवर ऊपचार सुरू आहेत. तर जास्त लक्षणे नसलेल्या ९६ रूग्णांना त्यांच्या राहत्या घरी ऊपचार पुरवले जात आहेत. गंगाखेड येथील केंद्रात गंगाखेडसह पालम, सोनपेठ तालुक्यातूनही रूग्ण ऊपचार घेत असल्याने येथील सुविधांकडे जास्तीचे लक्ष देण्याची गरज असल्याचे गोविंद यादव यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED