मराठी साहित्य वार्ता आयोजित पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन 1 मे रोजी

29

✒️औरंगाबाद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

औरंगाबाद(दि.30एप्रिल):- मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र मराठी साहित्य वार्ता वेब पोर्टल, फेसबुक पेज, युट्युब चॅनलला येत्या 1 मे 2021 रोजी (महाराष्ट्र दिन/कामगार दिन) एक वर्ष पुर्ण होत आहे. त्यानिमित्त पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य वार्ता युट्युब चॅनलवर आयोजित करण्यात आले आहे.

या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत अर्जुन डांगळे हे असणार आहेत. उद्घाटक म्हणुन न्यूझीलंडहुन प्रसिद्ध कवी तथा साहित्यिक निलेश पंडित उपस्थित राहणार आहेत तर स्वागताध्यक्ष म्हणुन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. डाॅ. संतोष हुशे उपस्थित राहणार आहे. पाहुणे म्हणुन ज्येष्ठ विचारवंत संजय सोनवणी, ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे, रमाई मासिकाच्या संपादक प्रा. डाॅ. रेखा मेश्राम, मेहता पब्लिकेशनचे संचालक सुनील मेहता, प्रसिद्ध कवयित्री मनीषा अतुल, अद्वैत चव्हाण आणि मराठी साहित्य वार्ताचे संपादक अमरदीप वानखडे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या सुरूवातीला सकाळी 10 वाजता शाहीर सुमीत धुमाळ, औरंगाबाद आणि संचाच्या वतीने शाहीरी जलसा होणार आहे. त्यानंतर उद्घाटन समारंभ होणार आहे. दुपारी दोन वाजता ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे, अशोक नायगांवकर, नीरजा, रवींद्र लाखे, दासू वैद्य यांच्या उपस्थितीत काव्यसंवाद हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी 3ः30 वाजता प्रा. डाॅ. मंगेश बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली ‘‘मराठी साहित्या आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये डिजिटल माध्यमांचे योगदान’’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यामध्ये डाॅ. सुनीता धर्मराव, पुणे, अॅड. लखनसिंग कटरे, गोंदिया सहभागी होणार आहेत.

सायं. 5 वाजता ज्येष्ठ गझलकारा प्रभा सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये स्नेहल कुलकर्णी पुणे, प्रमोद वाळके नागपुर, अझीझ पठाण नागपुर, उर्मिला वाणी पुणे, जनार्दन केशव ठाणे, प्राजक्ता पटवर्धन पुणे आदी गझलकार सहभागी होणार आहेत. सायं. 6ः30 वाजता ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवयित्रींचे कवीसंमेलन होणार आहे. यामध्ये संध्या महाजन जळगांव, कुसुम अलाम गडचिरोली, रंजना कराळे अमरावती, शितल राउत अमरावती, कल्पना अंबुलकर औरंगाबाद, अश्विनी अतकरे मुंबई, अंजली ढमाळ पुणे आदी कवयित्री सहभागी होणार आहेत. रात्री 8 वाजता संमेलनाचा समारोप होणार आहेत. त्यामध्ये आनंद चक्रनारायण मुंबई, धनंजय तडवळकर पुणे, प्रा. रेश्मा जाधव मुंबई आदींचे मनोगत होणार आहेत. त्यानंतर पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रा. विजयकुमार गवई औरंगाबाद, शाहीर रंगराव पाटील कोल्हापुर, प्रतिभा सराफ मुंबई, प्रा. दामोदर मोरे ठाणे, सुनंदा भावसार नंदुरबार, प्रविण बोपुलकर मुंबई, ईश्वर हलगरे रत्नागिरी, प्रा. महादेव लुले अकोला, सुषमा पाखरे वर्धा, रमेश डोंगरे बुलढाणा, डाॅ. मनोहर घुगे अकोला, प्रा. युवराज मानकर यवतमाळ, भावेश बागुल नाशिक आदींचा समावेश आहे.

मराठी साहित्य वार्ता युट्युब चॅनलवर लाईव्ह होणा-या या साहित्य संमेलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पवन गवई, संकेत म्हात्रे, राजेंद्र सोमवंशी, प्रविण बोपुलकर, प्रमोद वाळके, वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी, प्रविण सोनोने, नरेंद्र लोणकर आदींनी केले आहे.
————————–

अध्यक्षीय भाषण

उपस्थित बंधू भगिनी आणि रसिकप्रेक्षकांना माझा नमस्कार…

आज जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस. प्रथमतः आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छ्या व्यक्त करतो. याबरोबरच मराठी साहित्य वार्ताच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या डिजिटल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून आपल्याशी साहित्य आणि संस्कृती या विषयावर सुसंवाद करताना अतिशय आनंद होत आहे. या डिजिटल साहित्य संमेलनाचे उद्घाटक माननीय निलेश पंडित, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. संतोष हुशे, मराठी साहित्य वार्ताचे मुख्य संपादक आणि या संमेलनाचे संयोजक अमरदीप वानखडे यांचे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मी आभार मानतोच पण अभिनंदन देखील करतो. एक तर त्यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद देऊन माझा सन्मान केलाच पण आजच्या ह्या वातावरणात साहित्य आणि संस्कृतीच्या संदर्भात एक चर्चा, सुसंवाद घडवून आणून वैचारिक विश्‍वात जी घुसमट होत आहे ती तिला मोकळा श्वास घेण्याचा घेण्यासाठी एक छोटासा का होईना प्रयत्न केला आहे. अशा प्रकारचे संमेलन आयोजित करण्यासाठी एक दृष्टी आणि जाण लागतेच. पण कष्ट घेण्याची तयारी आणि जिद्द असावी लागते. मराठी साहित्य संस्कृतीची घुसमट होऊ नये, हा सुसंवाद थांबू नये म्हणून अमरदीप वानखडे तरुण संशोधक, अभ्यासक पुढे येतो तेव्हा आमच्यासारख्या लेखक कार्यकर्त्यांना निश्चितच दिलासा मिळतो आणि वाटते मराठी साहित्य संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी ती जपण्यासाठी तरुण पिढी पुढे येत आहे. अमरदीप वानखडे ते त्यात तरुण पिढीचे प्रतिनिधी आहेत, असे म्हणायला काही हरकत नाही.

मित्रहो! आज जगभरात जी डिजिटल क्रांती झाली आहे तिच्या पाठीशी संशोधक आणि वैज्ञानिक यांची जिद्द, चिकाटी आणि कष्ट आहेत. मानवी जीवन सुखी, समृद्ध आणि समाधानी करण्यात विज्ञानाचा मोठा हातभार आहे. विज्ञान म्हणजे काही दैवी चमत्कार नव्हे तर मानवी बुद्धीची ती एक सर्जनशील कृतिशील अविष्कार होय. आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्यासाठी रूढी, पारंपारिक समज-गैरसमज, अंधश्रद्धा, चमत्कार, धर्मांधता त्यांना ओलांडून पुढे जावे लागते. त्यातून निर्माण होणाऱ्या संशोधकाला विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याची झालर असते. हे आपणाला विसरून चालणार नाही.

विज्ञान क्षेत्रात क्रांतिकारक संशोधन करणारे आपण जर पाहिले तर आपल्याला असे दिसून येईल की, अनेक वैज्ञानिकांनी पारंपारिक धर्माधिष्ठित विचारांना झुगारून त्यांनी आपला वैज्ञानिक असा विचार मांडला. त्यासाठी त्यांना हाल-अपेष्टा, त्रास देखील सहन करावा लागला. भारताचा विचार केल्यास अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धाने आपल्या तत्त्वज्ञानात एक सिद्धांत मांडला होता. त्याला “प्रतितसमूत्पाद” म्हणजे कार्यकारणभावाचा सिद्धांत म्हणून ओळखले जाते. पण प्रतिक्रांतीमुळे हा बुद्धविचार इथल्या मातीत रुजू शकला नाही.

मित्रहो! डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी एका आपल्या “क्रांती आणि प्रतिक्रांती” या निबंधात म्हणतात की, जेव्हा समाजात एखादा क्रांतिकारक विचार किंवा वातावरण असते आणि समाजामध्ये मूलभूत परिवर्तन घडून येण्याची शक्यता असते, अशावेळी प्रस्थापित वर्ग वर्चस्ववादी प्रवृत्तीचा वर्ग हा तो विचार खंडित करण्यासाठी प्रतिक्रांती करीत असतो. बंधुंनो! विज्ञान, साहित्य, कला या गोष्टी मानवी मनाला आणि जीवनाला विकसित करणाऱ्या, सुसह्य करणाऱ्या आहेत. थोडक्यात जीवनमूल्ये बाधित ठेवणारे आहेत. निश्चितच स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही जीवनमूल्ये आपण मानतो. आणि मूल्य संवर्धित करणारी, रुजवणारी समाज मनात भिनणारी जी माध्यमे आहेत त्यापैकी विज्ञान, साहित्य आणि कला या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. आणि त्यातुन एक संस्कृती निर्माण होत असते.

साहित्य आणि संस्कृती यांचा अतूट संबंध असतो. हे आपण सर्वजण जाणतो. पण संस्कृती म्हणजे नेमके काय? याचे भान आपल्याला असणे आवश्यक आहे. आपण सर्वजण असे मानतो की, विशिष्ट पेहराव, राहणीमान, खानपान म्हणजे संस्कृती. विशिष्ट धंदे, विशिष्ट कला, विशिष्ट संस्कृती, काहीतरी विशिष्ट पदार्थ, जेवणाच्या ताटातील विशिष्ट पद्धतीने मांडणे म्हणजे संस्कृती जोपासणे असे समजतात. काही पेहरावात किंवा कपाळावर लावलेल्या उभ्या-आडव्या भस्मातून किंवा गंध टिळ्यातुन संस्कृती शोधतात. निश्चित अशा गोष्टी, त्या-त्या प्रदेशातील राहणीमान, चालीरीतीशी निगडीत आहेत. पण केवळ आणि केवळ ह्या गोष्टी म्हणजे संस्कृती नव्हे. माझ्या मते संस्कृती म्हणजे विशिष्ट वर्गाची किंवा विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नव्हे. अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे संस्कृती हा वैचारिक विश्वाचा आणि त्या विश्वात जतन केल्या जाणाऱ्या मानवी मूल्यांचा त्या मूल्यांची धारणा आणि त्या सगळ्यांचा कृतिशील अविष्कार म्हणजे संस्कृती होय. ज्यावेळी आपण सुसंस्कृत समाज असा शब्दप्रयोग करतो, त्यावेळी आपल्याला नेमके काय अभिप्रेत असते? मला वाटते स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या त्रिसूत्रीवर आधारलेला समाज आपल्याला अभिप्रेत असतो. आमची भारतीय संस्कृती फार महान आहे असे जेव्हा उच्चारले जाते तेव्हा दलित, शोषित, वंचित, आदिवासी, भटके-विमुक्त असे नाकारलेले समूह ज्यांच्या पायाखाली जमीन नव्हती, डोक्यावर आभाळ नव्हते, सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा नाकारली गेली होती. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा हिरावून घेतल्या होत्या असे हे समूह. नाकारलेले समूह ही संस्कृती महान आहे हे स्वीकारतील काय? काय ते भारतीय नव्हते? का ते देशाचे रहिवासी नव्हते? म्हणून मग मी म्हटले आहे की, संस्कृति ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नव्हे.

विसाव्या शतकाने या सर्वहारा वर्गाच्या हातात हत्यारे दिली. औद्योगीकरण, विज्ञानातील प्रगती शिक्षणाचा प्रसार, आधुनिक जीवनमूल्ये बाळगणारी मानवतावादी दृष्टी अशा अनेक गोष्टी आहेत. आपण आपल्या महाराष्ट्रात जिथे मराठी भाषा बोलली जाते, जिथे मराठी संस्कृती जपली जाते त्याला आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. मग आपल्याला कोणती संस्कृती अभिप्रेत आहे? आम्हाला अभिप्रेत असलेली संस्कृती घडवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या पहिल्याच निबंधात “कास्ट इन इंडिया”मध्ये सामाजिक पुनर्रचनेचा विचार मांडला. आणि ज्या वेळी भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधान तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र, समता आणि बंधुत्व या त्रिसूत्रीवर आधारित अशी राज्यघटना या देशाला दिली. माझ्या मते, भारतीय संविधान हीच भारतीय संस्कृती आहे. आणि संविधानाचे संवर्धन करणे, जपणूक करणे, अंमल करणे हीच खरी भारतीय संस्कृती जोपासायला हवी.

मी संस्कृती संबंधी जे बोललो त्याचे कारण हेच की साहित्य आणि संस्कृती यांचे अतूट असे नाते असते कारण संस्कृती घडविण्यात जे काही घटक आहेत त्यात साहित्याचा फार मोठा वाटा आहे. महाराष्ट्रात तर नक्कीच आहे. कारण ज्या शिवरायांनी महाराष्ट्र उभा केला तो एका व्यापक आणि सर्वसमावेशक पायावर. व्यापक आणि सर्वसमावेशक मराठी राज्याच्या ज्यावेळी त्यांनी चंग बांधला त्यावेळी त्यांच्याजवळ बलाढ्य अशा मोगलांशी लढण्यासाठी अपुरी साधने होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्माचे मावळे एकत्र केले. भेद, धर्म भेद पाडला नाही. मराठी साम्राज्याची स्थापना झाली त्याचवेळी महाराजांचे पदरी अनेक महत्त्वाच्या पदावर वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक होते. खऱ्या अर्थानं ते रयतेचे राजा होते. अशा या महाराष्ट्रात मराठी साहित्याला मोठी परंपरा आहे.

ती संत वाङ्ममयाची परंपरा आहे, शाहिरांची परंपरा आहे, लोकसाहित्याची ती परंपरा आहे, लोककलेची ती परंपरा आहे. मराठी संत वाङ्मयाला, मराठी साहित्याला जरी पांडुरंगाच्या भक्तीची ओढ असली तरी भक्तिमार्गाला सामाजिकतेचा किनारा आहे. अठरापगड जाती संत साहित्यात दिसतात. पण पांडुरंगाच्या ठायी असलेल्या भक्ती-भावाला भेदा-भेदांचा लवलेश देखील नाही. विठ्ठलाच्या चरणी ते सर्व काही विसरुन एकरुप होतात. प्रत्यक्ष समाज व्यवहारात सामाजिक चौकट जरी मोडल्या गेली आणि तरी संत साहित्याने जरी देवाच्या दारी अध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित केली तरी तिला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पण मराठी साहित्यात संत साहित्याला मानाचे स्थान द्यावेच लागेल. संत साहित्यामुळे मराठी भाषा समृद्ध तर झालीच पण ती अभंग, ओव्या, भारुड याद्वारे सर्वसामान्य जनतेच्या मनापर्यंत जाऊन भेटली. नंतरच्या काळात शाहिरी वाड्.मयाने त्यांच्या लोककलेच्या माध्यमातून देखील मराठी भाषा आणि मराठी साहित्य सामान्य जनते पर्यंत पोचवले. शाहिरी वाङ्मयामध्ये जरी आपल्याला मनोरंजनात्मकता वाटत असली तरी साहित्यातील प्रखर अविष्कार त्या वाड्.मयात दिसतो. शाहिरी वाङ्मयात सामाजिकतेचे भान आपल्याला कमी दिसत असले तरी त्या काळातील समाजजीवनाचे अनेक कांगोरे आपल्याला त्या साहित्यात दिसतात.

आधुनिक मराठी साहित्याचा इतिहास पाहिला तर कविता असो, कादंबरी असो वा वैचारिक म्हणजे सामाजिक विषयावरच्या संबंधीचे लेखन असो आज महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हटले जाते त्या पुरोगामी विचारांची बीजे ही या साहित्यात दिसून येतात. केशवसुत, ह.ना. आपटे, आगरकर, लोकहितवादी अशी कित्येक नावे आपल्याला घेता येतील. सामाजिक क्षेत्रात देखील महात्मा फुले आणि शाहू महाराज यांनी जी समाज परिवर्तनाची लढाई सुरू केली होती ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अधिक गतिमान केली. समाज परिवर्तनाच्या लढाईला साहित्यकारांचा मोठा हातभार लागलेला दिसतो. या अनुषंगाने जी वर्तमानपत्रे, नियतकालिक इ. त्या काळात निघाली एका अर्थाने आपल्याला असे म्हणता येईल की, महाराष्ट्रात वैचारिक प्रबोधनाची एक लाट निर्माण झाली. या लाटेला पूरक अशा विचारांच्या अनेक कला कलाकृती त्यावेळी अवतरल्या. मग ती कविता असो, कादंबरी असो, नाटक असो वा वैचारिक साहित्य असो.

हे अधोरेखित करण्याचा उद्देश हाच की, साहित्य आणि समाजाचे नाते अतूट असे आहे. समाजातील अनिष्ट चालीरीती, अनिष्ट प्रथा, रूढी याविरुद्ध विपुल प्रमाणात लिहिले गेले. परंतु या लेखनाला देखील सामाजिक चौकट लाभली. सगळेच लेखक हे उच्चवर्णीय असल्यामुळे जरी त्यांनी मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारून लेखन केले असले तरी त्यांच्या लेखनाचा विषय हा मर्यादित राहिला होता. विशिष्ट वर्गाचे, वर्णाचे सुख-दुःख ते रंगवीत गेले. थोडक्यात सांगायचे म्हणजे या लेखनातील किंवा साहित्यातला मानवतावाद हा तळागाळात पोहोचला नाही. त्या साहित्याला सामाजिक मर्यादेचे कुंपण घातले गेल्याचे दिसते. स्वातंत्र्याची चळवळ, नव्यानव्या विचारधारा आणि त्या अनुषंगाने झालेल्या कामगार-शेतकरी-दलित-कष्टकऱ्यांच्या चळवळी, झपाट्याने होणाऱ्या औद्योगिक क्रांतीमुळे मराठी साहित्यात अनेक बदल झाले आहे. साहित्याची चौकट ही रुंदावत गेली आहे. अनेक नवीन आधुनिक विचार करणारी साहित्यिक निर्माण झाले आहेत. जसे शिक्षण झिरपत गेले तसतशा ह्या साहित्याच्या कक्षा रुंदावल्या. ते शहरी मध्यमवर्गीय यांपासून ते गावगाड्यात मराठी साहित्य दिसू लागले आहेत. पण खऱ्या अर्थाने ते गावकुस ओलांडून गावकुसाबाहेर गेले आहे. आज आपल्याला असे म्हणता येईल की, साहित्याचे लोकशाहीकरण झाले आहे. आणि हे अत्यंत स्वागतार्ह कार्य असेच आहे.

त्यामुळे मराठी भाषा ही समृद्ध झाली आहे. आज मराठी भाषेत जे विविध साहित्य प्रवाह आहेत त्यामध्ये दलित साहित्य असो, ग्रामीण साहित्य असो, आदिवासी साहित्य असो, विद्रोही साहित्य असो यामुळे साहित्यात नवे अनुभवविश्व तर आलेच नवीन शब्दसंपदा आली. पण ह्या नाकारल्या गेलेल्या समुहाच्या भावना त्यांच्या वाट्याला आलेल्या दुःखाच्या कथा, कविता जेव्हा शब्दरूप घेऊन आल्या अशा वेळी आपल्या पलीकडेही एक वेगळे जग आहे आणि हे जग वेदनेचे तसेच विद्रोहाचे देखील आहे आणि याची जाणीव अनेकांना झाली त्यामुळे मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावल्या. मराठी मनाच्या सामाजिक जाणीवेच्या कक्षा देखील रुंदावल्या.

साहित्याच्या इतिहासात असे अनेक प्रवाह, नव्या जाणिवा व्यक्त झाल्या आहेत. तात्विक अंगाने देखील साहित्याची समीक्षा झालेली आहे. पण हे वेगवेगळे प्रवाह आणि जाणीवा व्यक्त होत असले तरी ते अंतिमतः मराठी साहित्यच आहे. हे भान आपण बाळगले पाहिजे. कारण साहित्याची भूमिका हेच मुळी सर्वांना कवेत घेणारी आहे. जोडणारी आहे, लोडणारी नव्हे. सुसंवाद वाढवण्यात आहे विसंवाद घडणारी नाही. साहित्याचे नेमके प्रयोजन काय? या विषयावर अनेकदा चर्चा झाली आहे. मनोरंजन करणे, आनंद देणे हा एक प्रयोजनाचा भाग असू शकतो आणि तो कुठल्याही कलेचा असू शकतो. पण निव्वळ मनोरंजनासाठी लिहिलेल्या साहित्यात कृतकता येणे अपरिहार्य असते कारण साहित्य आणि समाज या दोन गोष्टी विभक्त करता येणार नाही. मानवी जीवनात घडणाऱ्या भावभावनांचे इच्छा-आकांक्षाचे नवा स्वप्नांचे प्रतिबिंब साहित्यात पडलेले असते. ज्या सामाजिक वातावरणात साहित्याची निर्मिती होते त्या सामाजिक वातावरणाला देखील मानवी चेहरा आणि सुसंवाद अशी मानसिक जडण-घडण करणे हे देखील साहित्याचे प्रयोजन असले पाहिजे. कारण निकोप आणि सुसंवादी सामाजिक वातावरण असले तरच निकोप अशी मूल्याधिष्ठित अशी साहित्यनिर्मिती होऊ शकते. विषमतावादी दृष्टिकोनातून आणि द्वेषमूलक भावनेतून निर्माण होणारे साहित्य हे माझ्यामते निकोप असू शकत नाही. साहित्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन केवळ वांग्मयीन असू शकतो असू नये तर तो एका मूल्य गर्भाशयात जाणिवेतून बघणारा असावा. दुसरे महत्त्वाचे म्हणजे समकालीन वास्तवाकडे वर्तमान काळ आकडे पाठ फिरवणारे आणि भूतकाळात रममाण होणारे साहित्य ते आपल्याला आभासी जगाकडे नेणारे असते. पूर्वग्रह, दूषित दृष्टिकोन स्वीकारून साकार झालेले साहित्य ऐतिहासिक, काल्पनिक साहित्य म्हणून गणलेही जाईल. पण वास्तववादी आणि जिवंत ते असु शकत नाही. हे सांगण्याचे कारण की, आज विज्ञान, लोकशाही विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगणारे आणि यामुळे भौतिक जीवन संपन्नतेने जगणारे अनेक साहित्यिक भूतकाळाचे उदासीकरण करून त्यातील चमत्कार, कर्मकांड आणि अद्भूत अशा जगाचे चित्रण करतात तेव्हा त्यांच्या मानसिक दुभंगलेपणाची जाणीव झाल्याचे स्पष्ट दिसून येते. एके काळी हे शक्य होते, पण आज सर्वसामान्य जनता शिक्षण, विज्ञान चळवळी यामुळे चौकस झालेली आहे. त्याचे देखील भान साहित्य निर्मिती करताना ठेवायला हवे असे मला वाटते. त्याचा अर्थ साहित्याने प्रचाररक व्हावे असे मला म्हणायचे नाही. सांगायचे फक्त एवढेच की, साहित्यातील जाणिवा या मूल्यगर्भ आणि युगसुसंगत असाव्यात.

या कोरोना काळात आपल्याला घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. युगसुसंवाद करता येत नाही. अशा अवस्थेमध्ये डिजिटल साहित्य संमेलन भरवून देशभरात नव्हे जगभरात सुसंवाद करू शकतो. साहित्याच्या माध्यमातून आपण आपल्या विचारांची सुखदुःखाची भावभावनांची देवाण-घेवाण करु शकतो. हे कशामुळे शक्य झाले आहे? जी डिजिटल क्रांती झाली आहे तिच्यामुळेच. हा काही चमत्कार नाही किंवा भाकडकथा नाही तर विज्ञानामुळे हे शक्य हे शक्य झाले आहे. ही काही आध्यात्मिक किंवा दैवी शक्ती नाही. हा वैज्ञानिक क्रांतीचा सुस्पष्ट अविष्कार आहे. म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे आपण साहित्य निर्मिती करताना आपली मानसिक ठेवण युगसुसंगत ठेवली पाहिजे. भूतकाळाचा अभिमान बाळगायला हरकत नाही. उदात्तीकरणाचा प्रयत्न करू नये. एकीकडे आपण ग्लोबल म्हणजे वैश्विक बनण्याचा प्रयत्न करत आहोत. साहित्यनिर्मिती देखील ही वैश्विक मूल्य उजागर केली पाहिजे. माझा ठाम विश्वास आहे साहित्य हे संस्कारक्षम वयात मानवी मन संस्कारित करू शकते. शांत साने गुरुजींच्या “श्यामची आई” ने अनेक पिढ्यांना संस्कारित केल्या आहेत. साहित्यामुळे एकदम क्रांतिकारक बदल होतात असा भाबडा समज माझा निश्चितच नाही पण क्रांतिकारक बदल मागणाऱ्या मानसिकतेची बीजारोपण नक्कीच होते. या वरच माक्र्स-माओ-गांधी-फुले-आंबेडकर यांच्या साहित्यातून त्यांचे प्रत्यंतर येथे.

आज हि डिजिटल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना एक खंत जरूर व्यक्त करावीशी वाटते की, डिजिटल क्रांती तर होत आहे पण ह्या काळात शाळा, कॉलेज बंद झाली आहेत ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. पण आज ग्रामीण दुर्गम भागात जे गरीब, कष्टकरी वर्गातील मुले आहेत त्यांच्या जवळ संगणक मोबाइल घेण्याची ही कुवत नाही अशी मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. अशा वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याची विशाल दृष्टी साहित्याने ठेवली पाहिजे. साहित्यिकाने कथा, कविता, लेख लिहिलेले त्यांना संगणक किंवा सुविधा उपलब्ध होईल असे नाही. पण या व्यवस्थेमध्ये सगळ्यांना सामाजिक आर्थिक न्याय मिळेल अशा समाजनिर्मितीसाठी आपल्या साहित्यात या वर्गाप्रती असलेली सहसंवेदना व्यक्त करण्यास काय हरकत आहे?

शेवटी मला एवढेच सांगायचे आहे की, साहित्यात विविध प्रवाह असले तरी साहित्य हे साहित्य असते ते स्वतःच जिवंत आणि मनाला भिडणारे असे असले पाहिजे. साहित्याच्या नावाखाली शब्दबंबाळ किंवा उरबडवेपणाचे लिखाण, बटबटीत लेखन हे चांगल्या साहित्याचे लक्षण नव्हे. प्रत्येक माध्यमाची, कलेची स्वतःची अंगीभूत अशी ताकद असते. साहित्य हे शब्दाद्वारे आपल्या भावभावना, इच्छा-आकांक्षा व्यक्त करणारे माध्यम आहे. साहित्यात काव्य, कथा, नाटक, कादंबरी, वैचारिक लेखन असे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराची भाषा मांडणी आणि सादरीकरण यांची पद्धत भिन्न आहे. साहित्य निर्मिती ही अतिशय गांभीर्यपूर्वक व चिंतनशील कृतीतून साकारणारी गोष्ट आहे. आणि याच प्रेरणेतून हे सकस झाली तरच सकस आणि जिवंत साहित्यनिर्मिती करून मराठी साहित्याचे आणि संस्कृतीचे संवर्धन करू शकतो.

पुन्हा एकदा आपण मला या संमेलनाचे अध्यक्षपद दिल्याबद्दल संयोजकांचे आभार मानून. आपले भाषण संपवितो.
जय भीम… जय महाराष्ट्र…

अर्जुन डांगळे
अध्यक्ष
मराठी साहित्य वार्ता आयोजित
पहिले डिजिटल मराठी साहित्य संमेलन, 2021