वैद्यकीय व वैद्यकीय पेशाशी इतर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या सेवा कोविड काळात घेण्यासाठी पाठपुरावा करणार – पशुसंवर्धनव दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार

25

✒️सचिन महाजन(विशेष प्रतिनिधी)

वर्धा(दि.2मे):- कोरोना काळात रुग्णांच्या वाढत्या संख्येला डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, नर्सेस यांची कमतरता जाणवत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्ष, नर्सिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी तसेच पॅथॉलॉजीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची सेवा घेण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून आपल्या जिल्ह्यासाठी असे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू असे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री केदार यांनी सांगितले.

धवाजारोहण कार्यक्रमानंतर श्री केदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱयांची बैठक घेतली यावेळी ते बोलत होते. सेवाग्रामच्या कस्तुरबा कोविड समर्पित रुग्णालयाला 400 बेडसाठी अखंडित ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी अतिरिक्त 20 के एल द्रव ऑक्सिजन टँकरद्वारे पुरवण्यासाठी भिलाई येथील प्रॅक्स एअर लिंडे येथून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी अतिरिक्त मागणी कळवावी, अशा सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्यात. आतापर्यंत सेवाग्रामसाठी त्यांनी दोन ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून दिले आहेत.

जिल्ह्यातील औद्योगिक कामासाठी वापरले जाणारे ऑक्सिजन सिलेंडर सद्यस्थितीत रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्याबाबत सर्व एम आय डी सी मधील उद्योगांना आदेश द्यावेत असे श्री केदार यांनी यावेळी सांगितले.

सेवाग्राम रुग्णालयात सध्या 300 बेड आहेत आणखी 100 बेड सुरू करण्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्याची तयारी करण्यात येत आहे. 400 बेड पैकी 350 ऑक्सिजन बेड आणि अति दक्षता विभागात 50 बेड होतील. त्यासाठी 20 के एल ची टॅंक आहे. तसेच 800 सिलेंडर आहेत, जे बॅक अपसाठी वापरले जातात. 20 के एल ची टाकी एक दिवसानंतर भरली जाते. त्यामुळे सदर टाकीसाठी एक दिवस आड ऑक्सिजन पुरवठा झाला तर ऑक्सिजनचा प्रश्न मिटेल अशी मागणी सेवाग्राम रुग्णालयाचे डॉ गंगणे यांनी केली.

समर्पित कोविड हॉस्पिटल म्हणून दर्जा आहे, त्याप्रमाणात साधन सामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार सागर मेघे यांनी केली.

या बैठकीला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बड़े, कस्तूरबा रुग्णालयचे सागर मेघे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, सेवाग्राम आयुर्विज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ नितीन गंगणे, डॉ अभ्युदय मेघे, पालकमंत्री यांचे ओ एस डी डॉ. इंगोले, तसेच इतर अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.