कट्टरपंथीयांच्या आंदोलनाने इम्रान खान अडचणीत

31

कोरोना, महागाई आणि आर्थिक मंदी यामुळे पिचलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. पाकिस्तानमधील इम्रान खान यांचे सरकार कट्टरपंथी लब्बेक या संघटनेच्या मागणीने चांगलेच पेचात पडले आहे. कट्टरपंथी लब्बेक या संघटनेने पाकिस्तानने फ्रांसशी असलेले सर्व संबंध तोडून टाकावेत अशी मागणी इम्रान खान यांच्याकडे केली आहे. इम्रान खान यांनी त्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यावर या संघटनेने पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. त्यात अनेक आंदोलनकारी व पोलिसांचा जीव गेला असून शेकडोजन जखमी झाले आहेत. या आंदोलनामुळे पाकिस्तानमधील सर्व वाहतूक ठप्प झाली असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

या आंदोलनामुळे पाकिस्तानमधील सर्व व्यवहार, महामार्ग व दुकाने बंद आहेत. तेहरिक ए लब्बेक पाकिस्तान ( टी ए एल पी ) ही पाकिस्तान मधील मोठी कट्टरपंथी संघटना असून या संघटनेतील कार्यकर्त्यांचे जाळे पाकिस्तानभर पसरले आहे. या संघटनेने ११ पोलिसांचे अपहरणही केले होते त्यांना सोडण्यासाठी स्वतः इम्रान खान यांना या संघटनेच्या प्रमुखांशी बोलावे लागले होते. या आंदोलनामुळे पाकिस्तानमध्ये मोठी अराजकता माजली आहे. मागील वर्षी फ्रान्सचे अध्यक्ष ईमॅन्युअल मॅक्रॉन यांनी आपल्या देशातील इतिहासाच्या शिक्षकाला आदरांजली वाहिली. या शिक्षकाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलताना विद्यार्थ्यांना वादग्रस्त चित्र दाखवले होते. इस्लाम धर्माचा अवमान करणारे ते चित्र होते. या घटनेनंतर चेतन बंडखोर असलेल्या एका अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याने या शिक्षकाची हत्या केली होती.

फ्रांसच्या अध्यक्षांनी या शिक्षकाला आदरांजली वाहून इस्लामचा अपमान केला आहे म्हणूनच पाकिस्तानने फ्रान्सशी असलेले सर्व संबंध तोडून टाकावेत अशी मागणी ही संघटना करत आहे. लब्बेक संघटनेने पुकारलेले हे आंदोलन वाढतच चालल्याने फ्रान्सच्या पाकिस्तानमधील राजदूतांना परत पाठवण्याचे आश्वासन इम्रान खान यांच्या सरकारने या संघटनेला दिले आहे. हे आश्वासन देऊनही ही संघटना मागे हटण्यास तयार नाही. लब्बेक संघटनेच्या दबावाखाली येऊन पाकिस्तानने फ्रान्सशी संबंध तोडले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची मोठी नाचक्की होईल. पाकिस्तानने फ्रान्सशी असलेले संबंध तोडून टाकले तर युरोपियन युनियन पाकिस्तानवर बहिष्कार टाकू शकते आणि जर तसे झाले तर पाकिस्तान आणखी गर्तेत जाऊ शकतो. पाकिस्तानचा वस्त्रोद्योग हा युरोपीय देशांवर अवलंबून आहे.

पाकिस्तानने फ्रान्सशी संबंध तोडल्यास युरोपमधून पाकिस्तानला होणारी मदत ठप्प होऊ शकते. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था इम्रान खान यांची झाली आहे. या अडचणीतून मार्ग काढण्याची मोठी कसरत इम्रान खान यांना करावी लागणार आहे. यातून ते कसा मार्ग काढतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)