महिला व अनाथ बालकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवा- ना. ऍड.यशोमती ठाकूर

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

अकोला(दि.3मे):- महिला व अनाथ बालकांकरीता असलेल्या योजना प्रभावीपणे राबवा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी येथे दिले. ना.ऍड ठाकूर यांनी आज अकोला येथे महिला व बाल विकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी यांच्या दालनात ही आढावा बैठक घेण्यात आली. आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वर्षा खोब्रागडे, महिला बालकल्याण अधिकारी विलास मरसाळे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, समाज सेविका आशा मिरगे आदि उपस्थित होते.

यावेळी महिला व बालविकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ विभागाच्या विविध योजनेबाबतची माहिती सादर करण्यात आली. ज्या बालकांना आई-वडील नाही अशा अनाथ बालकांना प्रमाणपत्र मिळवून द्यावे. तसेच जिल्ह्यातील सर्व अनाथ बालकांना रेशनकार्ड उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश ना.ऍड ठाकूर यांनी संबंधित विभागाला दिल्या. कोविडमुळे आई व वडीलांचा मृत्यू झालेल्या बालकांचा शोध घेवून त्यांच्या पालनपोषणाकरीता नियोजन करण्याचे सूचना त्यांनी यावेळी दिल्या. कोरोना काळात महिला आर्थिक विकास महामंडळव्दारे केलेल्या उपक्रमाची माहिती सादर करण्यात आली. महिला बचत गटांना अधिक बळकट करण्यासाठी नवीन उपक्रमांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महिला आर्थिक विकास महामंडळाला दिल्या.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED