नेत्यांनो, शहाणे असाल तर या भस्मासुरांना आवरा !

21

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर सोशल माध्यमात गेले काही दिवस अतिशय विकृत पोस्ट केल्या जात आहेत. अलिबाग आणि विवेक ओबेरॉयचा संदर्भ देत त्यांच्यावर फार अश्लिल आणि विकृत टिप्पणी चालू आहे. खरेतर सोशल माध्यमातली ही भुतं अतिशय हलकट आणि विकृत आहेत. अमृता फडणवीस यांच्या बाबतच्या टिका-टिप्पणी खुपच किळसवाण्या आहेत. अमृता फडणवीस यांनी काय करावे, काय नाही करावे ? हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा कुणाला अधिकार नाही आणि डोकावण्याचा काय संबध ? त्यांच्यावर व्यक्तीगत चिखलफेक करणे कितपत योग्य आहे ? ते ही ज्या महाराष्ट्राच्या संस्कृतीने परस्त्रीचा गौरव करायला शिकवले त्या महाराष्ट्रात ही नालायकी व्हावी ? हे दु:खदायक आहे.

विशेष म्हणजे या सर्व पिलावळी छत्रपती शिवरायांच्या, संत तुकोबारायांच्या महाराष्ट्रात फोफावत आहेत. तुकोबारायांच्या अभंगवाणीतून “परावया नार आम्हा रखूमाई समान !” असा लाखमोलाचा संस्कार जिथे दिला त्याच महाराष्ट्रात असल्या विषवल्ली माजत आहेत याचे वाईट वाटते. राजकीय विचारधारेला व नेत्यांना विरोध करता करता त्यांच्या पत्नी-मुलींच्यावर घसरणे, त्यांच्या अब्रुचे धिंडवडे काढणे, आई-बहिणीवरून अश्लिल शिवीगाळ करणे कितपत योग्य आहे ? अमृता फडणवीस यांच्या चारित्र्याचे धिंडवडे काढणारी पिलावळ सभ्य व सुसंस्कृत समाजाला लागलेली किड आहे. अमृता फडणवीस यांच्या बाबतीतला प्रकार कुठल्याही सुसंस्कृत माणसाला लाज-शरम वाटणारा आहे. सदर प्रकार खरा की खोटा ? या पेक्षा सोशल मिडीयातले हे भस्मासुर ज्या पध्दतीने बदनामीचे सत्र चालवतात ते भयंकर आहे. स्त्रीयांच्या इज्जतीची लक्तरे काढणारे, त्यांच्यावर अश्लिल टिका-टिप्पणी करणारे हे भस्मासुर तमाम सुसंस्कृत समाजाच्या आरोग्याला झालेला कँन्सर आहेत.

देशभरातील सर्व पक्षियांनी वेळीच भानावर यायला हवे. या सर्वांच्याकडे थोडा जरी शहाणपणा असेल तर त्यांनी या भस्मासुरांना आवरायला हवे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाने जोपासलेली आय टी सेलवाली पिलावळ भयंकर आहे. हे भस्मासुर जर मस्तावले तर भविष्यात सर्वच राजकीय नेत्यांना, पक्षांना व लोकशाहीला जड जाणार आहेत. कुठल्याही सत्तेच्या, नेत्याच्या विरोधात उठणारा प्रत्येक आवाज अशाच पध्दतीने दाबला जाणार आहे. लोकशाहीचाही गळा घोटला जाणार आहे. आयटी सेलची लावारिस पिलावळ अलिकडे सगळ्याच पक्षांनी जोपासली आहे. गेल्या चार-दोन वर्षात सगळेच पक्ष ही हलकटांची फौज घेवून राजकीय युध्द जिंकू पहात आहेत पण हा डाव चांगूलपणाच्या, सभ्यतेच्या आणि संस्कृतीच्याच मुळावर उठणारा आहे. सत्तेच्या मस्तीत धुंदावलेल्या नेते मंडळींना या भस्मासुरांच्या धोक्याचे भान नाही. या लोकांना जर वेळीच भान नाही आले तर फारच बिकट परस्थिती उदभवू शकते.

देवेंद्र फडणवीस स्वत:च्या पत्नीच्या बदनामीचे सत्र पाहून या धोक्याबाबत जागरूक झाले असतील तर नशीब. त्यांना या हलकट वृत्तीचा धोका लक्षात आला असेल तर ते ख-या अर्थाने शहाणे म्हणायला हरकत नाही. त्यांनी स्वत: पुढे येवून भाजपाने जोपासलेली लावारिसांची हलकट पिलावळ आणि तिचे उद्योग थांबवावेत. स्वत:पासून व स्वत:च्या पक्षापासून त्यांनी सुरूवात करावी. इतर पक्षांनाही त्यांनी तसे आवाहन करावे. देवेंद्र फडणवीसांनी यातून बोध घेत पश्चाताप म्हणून या विकृतीविरूध्द आघाडी उघडावी.

खरेतर या देशात सर्वात आधी ही शौचकुपातली हलकट पिलावळ भाजपानेच जन्माला घातली. भाजपानेच ही विषवल्ली देशात पेरली आहे. मोदी-शहांच्या राजकीय झुंडशाहीतून जन्माला आलेली ही पिलावळ आज त्यांनाही जड जात आहे. भाजपाच्या आयटी सेलला तोंड देण्यासाठी बहूतेक पक्षांनी व नेत्यांनी ट्रोलर गँग उभारली आहे. सोशल माध्यमातून एकमेकांवर किंवा त्यांच्यावर टिका करणा-यांच्यावर ही ट्रोलर गँग तुटून पडते आहे. अश्लिल शिव्यांची लाखोली वाहिली जाते आहे. त्यात विरोधी नेते, पत्रकारांना टार्गेट केले जाते आहे. मोदी, शहा, फडणवीस व योगींच्या नावाने धिंगाणा घालणारी ही आयटी सेलवाली बांडगुळं माणुसपणालाच कलंक आहेत. संघ आणि भाजपाचा इतिहास काढला तर तो याच विकृतींनी भरला आहे.

आजवर या विकृतांनी महात्मा गांंधी, पंडीत नेहरू, इंदीरा गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, शरद पवार, वसंतदादा पाटील, शालिनताई पाटील अशा अनेकांच्या चारित्र्यावर चिखलफेक केली आहे. अनेक इतिहास पुरूषांच्यावरही या विकृतांनी अशाच पिचका-या मारलेल्या आहेत. या पेशवाई किड्यांनी लोकांची बदनामी करणारी कुजबुज यंत्रणा कॉम्प्युटर युगातही अत्याधुनिक साधनांनी जोपासली. सोशल मिडीयाला आपल्या मस्तकातील विकृतीचे शौचकुप करून टाकले आहे. त्यांनी इतरांना शह देण्यासाठी, त्यांची बदनामी करून त्यांना नामोहरम करण्यासाठी जे विष पेरले होते ते आता तरारूण उगवताना दिसते आहे. त्याचाच परिपाक म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या अब्रुचे धिंडवडे काढले जात आहेत. खरेतर हे खुप वाईट आहे. याचे समर्थन होवूच शकत नाही पण भाजपानेच याची सुरूवात केलीय. त्यांनीच हा भस्मासुर जन्माला घातलाय. दुस-याच्या अंगावर घाण टाकताना स्वत:चे हात बरबटणारच याचे भान भाजपवाल्यांना राहिले नाही. अमृता फडणवीस यांच्या बदनामीच्या रूपाने ती परतफेड होतेय असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.

कारण जे पेराल तेच उगवेल ! असा नियतीचा नियम आहे. परवा नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीसांना “टरबुज्या टरबुज्या” म्हणून हाका मारल्या गेल्या. या हाका सुध्दा त्याचाच परिपाक होत्या. भाजपाने आणि भाजपाच्या नेत्यांनी आता तरी सुधरावे आणि पश्चाताप म्हणून हे भस्मासुर आवरावेत. सर्वच पक्षातल्या जबाबदार व जाणत्या नेत्यांनी या पिलावळींचा बंदोबस्त करावा. हे मस्तावलेले भस्मासुर सगळ्यांचीच राख करणारे आहेत. म्हणूनच त्यांना गाडून टाकावे लागेल. अमृता फडणवीस यांच्या अब्रुचू निघणारे धिंडवडे अस्वस्थ करणारे आहेत. त्या चुकीच्या आहेत की बरोबर ? या पेक्षा त्यांच्यावर केली जाणारी चिखलफेक योग्य नाही.