आतातरी आयपीएलचा तमाशा बंद करा

आयपीएल मधील कोलकाता नाईट रायडर या संघातील वरून चक्रवर्ती आणि संदीप वारीयर या दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली असल्याने सोमवारी होणारा कोलकोता नाईट रायडर विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू हा सामना रद्द करण्याची नामुष्की आयपीएल आयोजकांवर आली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू बायो बबलमध्ये खेळत होते तरीही त्यांना कोरोनाने गाठलेच. खेळाडूच नाही तर चेन्नई सुपर किंग्स या संघाचे सीयीओ काशी विश्वनाथ, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि तांत्रिक संघातील एका सदस्यालाही कोरोनाची बाधा झाली आहे. एकीकडे देशात कोरोनाने थैमान घातले असताना आयपीएल खेळवणे गरजेचे आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. आयपीएल जरी बायो बबलमध्ये ( जैव सुरक्षा वातावरणात ) खेळवली जात असली तरी खेळाडूंना कोरोनाची बाधा होऊ शकते असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता.

या इशाऱ्याकडे बीसीसीआयने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आयपीएल खेळवण्याचा अट्टाहास केला त्याचा फटका आता खेळाडूंना बसत आहे. वास्तविक आयपीएल सुरू होण्यापूर्वीच कोरोनाने आयपीएलमध्ये शिरकाव केला होता. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच कोलकोता नाईट रायडरच्या नितीश राणा व दिल्ली कॅपिटलच्या अक्षर पटेल या दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली होती. महेंद्रसिंग धोनी याच्या चेन्नई सुपर किंग्स या संघातील एका तंत्र विशेषतज्ज्ञाला देखील कोरोनाची बाधा झाली होती. केवळ खेळाडूंनाच नाही तर मुंबईच्या दहा ग्राऊंडसमनला देखील कोरोनाने गाठले होते. आयपीएल सुरू होण्याच्या आधीच कोरोनाने आयपीएलमध्ये शिरकाव करूनही बीसीसीआयने त्यातून धडा घेतला नाही.

बीसीसीआय आयपीएल रद्द करत नसल्याने ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी तसेच भारताच्या रवीचंद्रन अश्विन या खेळाडूने याआधीच आयपीएलमधून माघार घेतली आहे. जर बीसीसीआयने आयपीएल रद्द केली नाही तर आणखी खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडतील त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल रद्द करणेच योग्य ठरेल. जर बीसीसीआयने आयपीएल खेळवण्याचा अट्टाहास केला तर आणखी खेळाडू कोरोनाच्या विळख्यात सापडतील. मुळात बीसीसीआयला खेळाडूंच्या जीवाशी काहीही देणेघेणे नाही. केवळ पैसे कमावणे हाच एकमेव उद्देश बीसीसीआयचा आहे. पैशासाठी बीसीसीआय खेळाडूंचा जीव धोक्यात घालत आहे.

बीसीसीआयला खेळाडूंच्या जिवापेक्षा पैसा महत्वाचा वाटतो म्हणूनच बीसीसीआय खेळाडूंचा जीव धोक्यात घालून आयपीएल खेळवत आहे. बीसीसीआयने आतातरी शहाणे होऊन आयपीएल रद्द करावी. खेळाडूंचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार बीसीसीआयला कोणी दिला? कोरोनामुळे ऑलम्पिक सारखी जागतिक स्पर्धा रद्द होऊ शकते तर आयपीएल का रद्द होऊ शकत नाही ? जगातील सर्व महत्वाच्या स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आलेल्या असताना आयपीएललाच सरकार का परवानगी देत आहे? बीसीसीआयने आयपीएल रद्द केली नाही तर केंद्र सरकार किंवा माननीय न्यायालयाने ती रद्द करण्याचा बीसीसीआयला आदेश द्यावा.

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)९९२२५४६२९५

पुणे, महाराष्ट्र, लेख, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED