राजर्षी शाहूमहाराज मराठा समाजाचे आदर्श होतील काय ?

34

प्रबोधन हा एक फक्त शब्द आणि विचारच नाही तर अवघ्या मानवी विश्वाला व त्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक स्थित्यंतरांना योग्य दिशेने, योग्य पध्दतीने प्रभावित करून किंवा संचालित करून समाजाची नव्या दमाने पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करण्याची प्रक्रिया असते.या प्रबोधनातूच लोक, समाज आणि राष्ट्राची जडणघडण होत असते.लोक प्रबोधन म्हणजे?.लोकांच्या स्वाभिमानाची जागृती,लोकांतील अज्ञानाला-अंधश्रध्देला-असहिष्णुतेला तिलांजली.लोकांना त्यांच्या स्वतंत्र व महत्त्वपूर्ण अस्तित्वाबाबत आणि चांगल्या-वाईटा बाबत सतत सजग आणि सतर्क करत राहणे. लोकांना त्यांच्या समाजाप्रती आणि राष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्यांची तसेच हक्कांची जाणीव करून देणे , लोकांना जागृत, स्वाभिमानी, ज्ञानसंपन्न, स्वयंभू आणि स्वयंप्रकाशित करण्याची प्रक्रिया असते.राष्ट्र उभारणीसाठी आणि राष्ट्रीय विकास आणि कल्याणासाठी लोक हेच बीज भांडवल ! लोक हेच सर्वस्व.लोक प्रबोधित तर समाज जागृत आणि पर्यायाने राष्ट्र उन्नत व प्रगत असते.

कोणताही देश, त्या देशातील लोक म्हणजेच पर्यायाने समाज जर जागृत नसेल तर अशा ठिकाणी विकास आणि प्रगती ह्या अवस्था आभावानेच आढळतात किंवा अर्धवट-डळमळीत स्वरुपात पाहायला मिळतात.म्हणूनच महापुरुषांच्या संतांच्या महामानवाच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर असला पाहिजे.त्यांची विचारांची आठवण करण्यासाठी त्यांचा जन्म दिन,स्मृतिदिना निमित्याने वैचारिक प्रबोधन झाले पाहिजे त्यातूनच परिवर्तन होऊ शकते त्यासाठी मी नियमितपणे जयंतीदिनी,स्मृतिदिनी आत्मचिंतन,परीक्षण करून लेख प्रपंच करीत असतो.

महाराष्ट्र राज्यात सर्वच पक्षात आणि गावात मराठा समाज आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या जागरूक आहे.असे समजल्या जाते.कारण ते ब्राम्हणांचे सर्वात मोठे लढाऊ सैनिक आहेत. त्यांच्या धडावर त्यांचे डोके जरी असले तरी त्या डोक्यातील मेंदूवर शंभर टक्के नियंत्रण भटा ब्राम्हणांचे आहे.यासाठी कोणी पुरावा मागत असेल तर आजच्या राज्यातील व केंद्रातील सरकार मधील आमदार,खासदार संख्या पहा.विशेष महाराष्ट्रात मराठा आमदारांची मोठा भाऊ व इतर मागासवर्गीय आमदार लहान भाऊ म्हणून बेरीज केल्यास राज्य कोणाचे असते?.छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य असते किंवा राजर्षी शाहूमहाराज यांच्या विचारांचे असते.पण ते आज पेशव्याचा वारसा सांगणारे आहे. कारण मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज वाचला नाही.म्हणूनच ते गर्वसे कहो हम हिंदू है म्हणतात.

विशेष मराठा समाजात आज ही राजर्षी शाहूमहाराज यांचे महत्व पाहिजे त्या प्रमाणात नाही.मराठा सेवा संघ आणि त्याच्या ३२ कक्ष गेल्या ३० वर्ष. छत्रपती शिवाजी महाराज,शाहूमहाराज समजावून सांगत आहेत. २६ जून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती असते, आणि ६ मे स्मृतीदिन पहिला येतो नंतर जयंती.किती गांवात,शाळेत, महाविद्यालयात ती कोणत्या स्वरूपात साजरी होते तिचे जरा लोकसंख्येच्या हिशेबाने तपशीलवार मांडा.मराठा समाज ज्या पद्धतीने पारायणे,भंडारे,पालखी सोहळे आणि ममता दिन साजरे करतात त्याच पद्धतीने शाहूमहाराज जयंती, स्मृतीदिन साजरा होतो का?.का होत नाही?.मग का विचारू नये.राजर्षी शाहूमहाराज मराठा समाजाचे आदर्श होतील काय ?.

शाहू भोसले जन्म २६ जून १८७४ मृत्यू ६ मे १९२२ छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय क्रांतिकारी विचारांचे समाज सुधारक आणि कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (१८८४-१९२२ दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक शैक्षणिक,आर्थिक उन्नतीसाठी त्याकाळी राजर्षी शाहू महाराजांनी खूप प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी समाजाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित अस्पुश्या व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन क्रांतिकारी विचारांच्या समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटल्या जाते.

हे सत्य बहुसंख्य सूर्याजी पिसाळच्या वंशवली मराठ्यांना काळजांना भिडते म्हणूनच ते संभाजी भिडेच्या तालमीत जातात आणि खोटा इतिहास शिकतात.फुले-शाहू-आंबेडकर हे आधुनिक महाराष्ट्राचे.पुरोगामी महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणावर जातवास्तवाचा मोठा प्रभाव असल्यामुळे महापुरुषांचा नामोल्लेख करताना ही अनेकांची अडचण होताना दिसते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत काही वर्षापूर्वी ‘फुले-आंबेडकरांचा’ महाराष्ट्र असा उल्लेख करायचे. हीच मंडळी कोल्हापुरात आल्यावर त्यात शाहूंचे नाव समाविष्ट करत. म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर शाहूंना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने स्थान दिले जात नव्हते. राज्यकर्त्यांचेही यापेक्षा वेगळे काही नव्हते. परंतु कांशीराम-मायावती यांनी उत्तरप्रदेशातील सत्तेत असताना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने राजर्षी शाहूंना स्थान दिल्यामुळे, विशेष मराठा समाजातील सत्ता धाऱ्याच्या पोटात व गोटात उलटा पालट झाली.यानंतर महाराष्ट्राच्या पातळीवरही शाहूंचे नाव घ्यायला सुरुवात झाली आणि आज ते रूढ झाले. हे सगळे पुन्हा जाती-पातीच्या समाजकारणाशीच संबंधित आहे.

महात्मा फुले यांना माळी समाजाने मना पासुन कधीच दैवत मानले नाही, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व दलितांनी आपले दैवत बनविले पण किती मानले हा प्रश्न आज आहेच?. राजर्षी शाहू महाराज यांना स्वीकारणे मराठा समाजासाठी तेवढे सोपे नव्हते. आजही नाही. आजही मराठ्यांना अडचणीचेच वाटतात. देशात आरक्षण ही संकल्पनाच राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली,कारण मराठा समाज हा देणारा होता. आपल्या संस्थानात मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बलांसाठी पन्नास टक्के आरक्षण लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय १९०२ मध्ये त्यांनी घेतला होता. वेगवेगळ्या नावांनी काम करणाऱ्या मराठा संघटना आज शिवाजी महाराज, जिजाऊ यांची नावे घेतात, परंतु शाहू महाराज अनेकांना अडचणीचे वाटतात. कारण शाहू महाराजांना स्वीकारले, तर आरक्षणाचे समर्थन करावे लागते. आणि आरक्षणाचे समर्थन करून मराठयांच्या संघटना बांधता येत नाही. म्हणूनच मराठा सेवा संघ आणि त्याचे 32 कक्ष मराठा समाजाला राजर्षी शाहु महाराज जास्त सांगताना दिसत नाही.राजर्षी शाहूमहाराज स्विकारल्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज कसे स्विकारल्या जातील ?.

समता,स्वतंत्र,बंधुत्व यांचा पुरस्कार करणारे. मागासवर्गीय बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला व क्रिडा, आरोग्य आदी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ज्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, ते आधुनिक भारताचे भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज, पारतंत्र्य, दुष्ट रूढी परंपरा, निरक्षरता, अज्ञान इत्यादी समस्यांनी ग्रासलेल्या काळात २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. शाहू महाराज नावाप्रमाणेच यशवंत राहिले. भारतमातेच्या पोटी अनेक थोरांनी, संता, महंता, राजे, महाराजे, समाज सुधारकांनी जन्म घेऊन भारतातील गोरगरीब दीन दुबळ्यांची मनोभावे सेवा केलेली आहे.पण राजर्षी शाहु महाराजा त्यांच्या पेक्षा काकन भर सरस आहेत.
बहुजन हिताय बहुजन सुखाय हे सूत्र ध्यानात घेऊन शाहू महाराज राज्यकारभार पाहू लागले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याची फळे सर्व समाजाला चाखता यावीत म्हणून त्यांनी आपले सिंहासनच पणाला लावले. अज्ञान अंधश्रद्धा, निरक्षरता सामाजिक दुजाभाव, दारिद्रृय यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी महाराजांनी आपला खजिना सताड उघडा ठेवला.

छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक बंधूभाव, समता, मागासवर्गीय समाज बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य इ. क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी खूप परीश्रम घेतले. समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देणारे ते एकमेव राजे होते. सुरूवातीस कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा कायदा लागू केला. समता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने अस्पृश्यता निवारणाकरिता जातीभेद निर्मूलन, बलुतेदारी पद्धतीवर बंदी आणली. स्त्री शिक्षण, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महिला संरक्षण कायदा, विधवा पूनविर्वाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारख्या परीवर्तनवादी मुद्दे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे धाडस त्यांनी केले व त्यांची अंमलबजावणी होते की नाही ते स्वत: खात्री करून घेत असत. स्त्री हक्क स्वातंत्र्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीसाठी शिक्षेच्या कायद्याची तरतूद केली. अनिष्ठ रुढी परंपरा उच्चाटनासाठी प्रयत्न केले. १९१७ मध्ये विधवा पूनर्विवाह कायदा व विवाहनोंदणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.शंभर वर्षापूवी शाहूराजांनी ज्या दूरदृष्टिने निर्णय घेतले, त्याच्या जवळपासही आजचे राज्यकर्ते जाऊ शकत नाहीत. मानवी जीवनाच्या विकासाचे असे एकही क्षेत्र नाही, ज्यासाठी महाराजांनी काम केले नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते असल्याचे त्यांनीच माणगावच्या परिषदेत जाहीर केले. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राधानगरी धरण बांधून सिंचनाची सोय केली. कुस्तीला प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक कार्य केले. फासेपारध्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी राबवलेली बांधकाम योजना राज्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरणारी आहे. हे सगळे करीत असताना समाजातील विशिष्ट वर्गाशी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. संघर्ष करतानाही त्यांनी विकासाची वाट आणि तळागाळातील घटकांप्रती असलेली बांधिलकी याचा कधी विसर पडू दिला नाही. प्रस्थापितांनी त्यांच्या बदनामीच्या कहाण्या रचल्या. परंतु नव्या पिढीतल्या इतिहास संशोधकांनी त्या कहाण्या म्हणजे हितसंबंध दुखावलेल्या मंडळींनी रचलेली कुभांडे असल्याचे सिद्ध केले आहे.

बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले, एवढे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत.८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. २१ मे १९१९ रोजी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला.

३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात. ६ जुलै १९०२ मागास जातींना नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली. २३ फेब्रुवारी १९१८ ला कुलकर्णी वतने बंद, तलाठी सुरू. आंतरजातीय विवाह कायदा १५ एप्रिल १९२० नाशिक येथे उदोजी मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा कोनशिला समारंभ केला.१९ नोव्हेंबर १९२१ मध्ये रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार ही केला. १६ फेब्रुवारी १९२२ दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.आजच्या बहुसंख्य मराठा समाजाला हा इतिहास माहित नाही.आमच्या सारख्या आंबेडकरी चळवळीतील लेखकांनी सांगितला तर तो त्यांना पचत नाही.मग का विचारू नये.राजर्षी शाहूमहाराज मराठा समाजाचे आदर्श होतील काय ?.

आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या मराठा मार्ग मध्ये लिहले होते की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मराठा समाजाचे राजर्षी शाहु महाराज यांनी शिक्षणा साठी खुप मोठी मदत केली. म्हणून बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले.हे आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी विसरु नये.त्याकरिता आंबेडकरी चळवळीतील जाणकार बुद्धिजीवी लोकांनी अज्ञानी अंधश्रद्धा मध्ये गुंतलेल्या मराठा समाजाच्या घरी जाऊन समाज प्रबोधन करावे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आम्हाला शाहु महाराज, सयाजी महाराज, संत कबीर, महात्मा ज्योतिराव फुले आणि तथागत बुद्ध कळाले. म्हणुन आमच्या सारखे लोक नेहमी मराठा समाजा बरोबर मंगल मैत्री करण्याचा प्रयत्न करतात.पण त्याचा अर्थ खेड्या पाड्यातील मराठा समाजातील लोक महार माजले त्यांना जास्त माझ आला असा काढतात.राजर्षी शाहु महाराज यांच्या ६ मे स्मृतिदिना निमित्य सर्व मराठा समाजाला नम्र आवहान आहे की प्रथम शाहु महाराज समजून घ्या त्यानंतर आपले खरे शत्रु कोण व खरे मित्र कोण हे समजून येईल.नंतर विचारता येईल कुठे नेऊन ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र.हीच राजर्षी शाहु महाराज स्मृतिदिना निमित्य सर्व बहुजन समाजाला विशेष मराठा समाजाला विनंती.स्मृतिदिना निमित्य त्यांच्या क्रांतिकारी विचारांना कष्ट,त्याग आणि जीद्धीला कोटी कोटी प्रणाम!!!.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे भांडुप मुंबई 9920403859.अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य