डॉ.अक्रम पठाण :आंबेडकरवादी क्रांतीजाणिवाचे समीक्षक

27

डॉ.अक्रम हबीबखान पठाण यांचे दुःखद निधन झाले.ही बातमी समजताच मन सुन्न झालं.आमची काही महिण्यापूर्वी डॉ.यशवंत मनोहर सर यांच्याकडे भेट झाली होती.अत्यंत दिलदार व दिलखुश व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेलं यामुळे व्यक्तीशा माझे नुकसान झाले पण मानवतावादी विचारांच्या चळवळीची मोठी हानी झाली.माझा संबंध मुस्लिम मराठी साहित्य या ग्रंथावर समीक्षा केली तेव्हा पासून आला होता.त्याचे विचार मूल्यसापेक्ष समाजव्यवस्था निर्माण करणारे होते.वास्तववादी विचारगर्भात जाऊन साहित्याची व समाजाची ते समीक्षा करीत होते.निर्भिड व सत्यनिष्ठाता हे त्याच्या समीक्षेचे पैलू होते.मुस्लिम मराठी साहित्यावरील आंबेडकरवादी प्रगल्भ जाणीवांचा वेध त्यांनी घेतला होता.

डॉ.अक्रम पठाण यांनी आपल्या लेखानातून मानवीय दृष्टीकोन रेखाटला आहे.संविधाननिष्ठ विचारशीलतेची नवे दालन वाचकाला उपलब्ध करून दिले होते.आपल्या मराठी मुस्लिम साहित्य या ग्रंथातून मुस्लिम समाजाच्या साहित्याच्या चिकित्सक वेध घेतला होता.ते या ग्रंथात लिहितात की,”आंबेडकरवादी साहित्यामुळे मुस्लिम मराठी साहित्याला विद्रोहांचा अंतस्वर मिळाला.आंबेडकरवादी साहित्याने वेदना , विद्रोह आणि नकार या मानवीमूल्यांचा उद्घोष केलेला आहे.आंबेडकरी समाजाला येथिल अमाणुषतेने छळले आणि या अमाणुषतेने मुस्लिमांनाही छळले . आंबेडकरवादी साहित्याने या अमाणुषतेचा निषेध आपल्या साहित्यातून नोंदवला आहे.हा निषेध मुस्लिम मनालाही जाणवला .ह्या भाववेदना निराळ्या नाहीत.आंबेडकरवादी साहित्याचे बोट धरून मुस्लिम साहित्यीकांनी आपला प्रवास आरंभ केला.

ते जे मानवी जीवनाला अहितकारक आहे त्या सर्व गोष्टींचा नकार मुस्लिम साहित्यीकांनी मांडला आहे.”हे विचार मानवीय सभ्य समाज निर्मितीकरीता अत्यंत क्रांतीदर्शी असे आहेत.अक्रम सरांनी एखाद्या कलाकृतीची समीक्षा करतांना कधीही शब्दसाज चढवला नाहीतर त्या कलाकृतीचे काय वैशिष्ट्ये आहेत .ती कलाकृती हितकारक आहे की अहितकारक यांचे संदर्भाकिंत विवेचन केले आहेत.समाज परिवर्तनाच्या लढाईत त्यांनी झुंझारतेने भाग घेतला . वर्तमान काळातील बदलत्या राजकिय , सामाजिक व साहित्यीक परामर्शचा पट ते वाचकासमोर ठेवत होते.अनेक लेखाच्या माध्यमतून समाजप्रबोधन केले आहे.त्यांनी अनेक ग्रंथ लिहले आहेत.मुस्लिम मराठी साहित्य,मुस्लिम समाजाचे नवे क्षितिज,संग्रामकवी अमरशेख, यशवंत मनोहरांची युध्दकविता,सभ्यतेचा गौरव: हिफजूर रहमान,कवितेची युध्दशाळा,संविधाननिष्ठ आंबेडकरी चळवळ सर्वांच्या हिताची.या ग्रंथातून आंबेडकरवादी क्रांतीजाणिवेची मांडणी केली आहे.आंबेडकरी कवितेतील मानवतावाद व विचारगर्भिता याचा त्यांनी मोठा अभ्यास केला होता.त्यांनी मटाला सच्च्या युगासाठी हे सदर लिहले होते.

बदलते विश्व आणि साहित्यापुढील आव्हाने या डॉ.यशवंत मनोहर गौरव ग्रंथाचे संपादन डॉ.प्रकाश राठोड व डॉ.अक्रम पठाण यांनी केले होते.या ग्रंथासाठी जी मेहनत घेतली त्यावर माझ्या सोबत चर्चा केली होती.ते यामध्ये लिहितात की,”आज जग वेगवेगळ्या कारणांनी संक्रमण अवस्थेतून जात आहे.महराष्ट्रतातील व भारतातीलही परिस्थिती याला अपवाद नाही.आज देशात भावनिक राजकारणाचे मळे वाचाळपणे पिकवले जात आहेत.भावनिक आंदोलनाने राजकिय यश लवकर मिळवता येते.या भावनिक आंदोलनामुळे माणसे हिंसेविरूध्द बंड करीत नाहीत.उलट हिंसा सहन करतात . त्यांच्यावर होणाऱ्या हिंसेला मान्यताही देतात.अशा माणसेही स्वतः वर होणाऱ्या हिंसेचे सूत्रधार बनतात.जेव्हा आपण आपल्यावर होणाऱ्या हिंसेला स्वीकारतो तेव्हा आपण आपल्यातील माणसाचा पराभव स्वीकारतो.तो पराभव हा माणुसकिचा अपमानच असतो.

जेव्हा माणूस आपल्या बुध्दीवरचा विश्वास गमावतो तो क्षण माणसाच्या अंधःपतनाचा क्षण असतो.”अतिशय परखड विचार या संपादकीय मध्ये व्यक्त केले होते डॉ.अक्रम पठाण यांनी मुस्लिम मराठी साहित्याबरोबर आंबेडकरवादी विचाराची ऊर्जा कोळून पीली होती.आंबेडकरवादी महाऊर्जेने त्यांनी स्वतःला तयार केलं होतं.अनेक सामाजिक संघटनेच्या मंचकावरून वास्तविकतेचा मूल्यविचार मांडत होते.त्यांची समीक्षा आभाळातील विजेच्या प्रकाशासारखी होती.आंबेडकरवादी क्रांतीजाणिवेतून त्यांनी कलाकृतीचे समीक्षण केले आहे.वैचारिक ग्रंथ,कवितासंग्रह ,कथासंग्रह व कादंबरी यांचा समीक्षा मनोविश्लेषणात्मक पध्दतीनुसार करत होते म्हणून त्यांची समीक्षा अभ्यासकाला नवा मुल्यवर्धन आविष्कार घडवत आहे.त्याचे असे जाणे म्हणजे मानवतावादी व सैंवधानिक विचारांची मोठी हानी आहे.या दुःखातून त्याच्या आप्तांना सावरण्याची शक्ती मिळो हीच माझ्याकडून आदरांजली.

✒️लेखक:-प्रा.संदीप गायकवाड(नागपूर)९६३७३५७४००