डॉ. अक्रम पठाण : वैचारिक परिप्रेक्ष्यातील नवा आविष्कार

26

डॉ. अक्रम हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा मित्र होता. तसे अनेकांशीच त्याचे स्नेहाचे संबंध होते. त्यामुळे सोशल मीडियावर अक्रमच्या निधनाची बातमी दिसताच महाराष्ट्रभरातून मला फोन आले. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, श्रीपाद अपराजित, डॉ. अशोक कांबळे, बाळासाहेब घोंगडे, डॉ. मनोहर नाईक, सुरेंद्र गोंडाणे, प्रशांत वंजारे, इरफान शेख, डॉ. विजय जाधव, डॉ. सुधीर भगत, डॉ. रमेश राठोड, प्रा. श्याम मुडे, पत्रकार मनोहर चव्हाण, विशाल इंगोले, प्रा. संजय काळे, डॉ. सुशील मेश्राम, डॉ. कोमल ठाकरे, सपन नेहरोत्रा, सुभाष चव्हाण, प्रा. ताराचंद चव्हाण, प्रा. सरदार राठोड, शेषराव राठोड, विठ्ठल मते, मोहन जाधव, मटाचे मा. मोहिते सर, प्रा. ईश्वर दहीकर, मोहन इंगळे, सुधाकर जाधव अशा अनेकांचे फोन आले. विश्वास वाटावा अशी ही बातमीच नव्हती. या घटनेची सत्यता पडताळून पाहणारे हे फोन होते. या सगळ्याच मंडळींना माझे, अक्रमचे आणि डॉ. सर्जनादित्य मनोहरांचे संबंध माहीत होते. आम्ही रोजच एकमेकांशी बोलायचो. सतत चर्चा करायचो.

व्याख्यानांनाही आम्ही सोबतच असायचो. कार्यक्रमाच्या आयोजक मंडळींपर्यंत आमचे मैत्रीचे नाते पोहोचले होते. आम्हा तिघांनाही एकाच विचारमंचावर निमंत्रित केले जायचे. डॉ. अनमोल शेंडे, डॉ. मनोहर नाईक हेही अनेकदा सोबत असत. आम्ही कोणाचे विद्यार्थी आहोत?, आमच्या भूमिका काय आहेत?, आम्ही कोणत्या विचाराने प्रेरित आहोत? हे सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीत काम करणाऱ्या मंडळींना जवळजवळ पाठच झाले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनपेक्षितपणे दिसलेल्या बातमीच्या संदर्भात खात्रीलायक माहिती आम्हीच देऊ शकतो हे या मंडळींना माहीत होते. ही बातमी खोटी आहे असे आमच्याकडून त्यांना कळावे अशीही एक वेडी अपेक्षा काहींच्या बोलण्यातून डोकावत होती. पण मृत्यूच्या बातम्या शक्यतोवर खोट्या नसतात हेही त्यांना माहीत होते. डॉ. अक्रम पठाण गेले ही खरीच बातमी होती. परंतु हे खरे असले तरी मन मात्र मानत नसते. सत्य माहीत असतानाही त्याला पुरावे हवे असतात. हा प्रेमाचाच भाग असतो.

डॉ. अक्रम पठाण आपल्यातून कायमचे निघून गेले. त्यांचे असे अकस्मात निघून जाणे ही असह्य, अविश्वसनीय आणि अंतर्मुख करणारीच घटना आहे. ही घटना डॉ. अक्रम पठाण नावाचा एक माणूस गेला हेच केवळ सांगत नाही; तर महाराष्ट्राच्या वैचारिक परिप्रेक्ष्यातील प्रचंड बौद्धिक सामर्थ्याचा एक नवा आविष्कार गेला, आविष्काराच्या नव्या शक्यता गेल्या याचे स्पष्ट सूचनच या घटनेने केले आहे. केवळ मुस्लिम समाजालाच नव्हे तर एकूणच मराठी साहित्याला परिवर्तनाचे मोल सांगणारा, आधुनिकतेचे, विज्ञानवादी विचाराचे आणि मानवतावादाचे धडे देणारा उमद्या मनाचा शूर सेनानी गेला हा त्याच्या जाण्याचा अर्थ आहे. म्हणून अक्रम पठाणांच्या निधनाचे वृत्त कळताच महाराष्ट्रातील प्रबुद्ध वर्ग हळहळला. महाराष्ट्रातील या जाणत्या वर्गाला अक्रमने अल्पावधीत केलेले लेखनही माहीत होते आणि त्याच्यातल्या भावी शक्यताही माहीत होत्या.

डॉ. अक्रम पठाण नावाचा धडधाकट शरीरयष्टीचा आणि दिलदार मनाचा तरुण लेखक मुस्लिम समाजाचे मानसशास्त्र बदलू पाहत होता. या समाजाला आधुनिकतेची प्रशस्त प्रकाशवाट तो दाखवू पाहत होता. कुराणचे नवे अन्वयार्थ तो लावू पाहत होता. या समाजातील मुल्ला – मौलवींच्या कर्मठतेवर प्रहार करताना डॉ. अक्रम पठाण म्हणतात, “मुस्लिम समाजातील कर्मठ मुल्ला मौलवींनी इस्लामचा मानवतावादी चेहरा रसातळाला नेलेला आहे. या मुल्ला-मौलवींची विचारधारा ही समाजाच्या भौतिक आणि शास्त्रीय प्रगतीला पोषक नाही.” (मुस्लिम समाजाचे नवे क्षितिज, भूमिका, पृ. ६) मुस्लिम समाजाचेच नव्हे तर भोवतीच्या एकूणच सांस्कतिक विचारविश्वाचे मानसशास्त्रच तो बदलू पाहत होता. या मानसिकतेवर साचलेली प्रतिगामी विचाराची धूळ तो झटकू पाहत होता. समाजमनाला रोगट करणाऱ्या सामग्रीला तो बेचिराख करू पाहत होता.त्याच्या व्यक्तिमत्त्वात अशा अनेक देखण्या शक्यता होत्या.

त्यामुळे महाराष्ट्रातील सांस्कृतिक विश्वाचे हळवे होणे हे डॉ. अक्रम पठाण नावाच्या मानवी देहासाठी नव्हते तर या मानवी देहात असलेल्या मानवतावादी लेखकासाठी आणि त्याच्यातल्या लेखकाने घेतलेल्या जीवनवादी भूमिकेसाठी होते. ही भूमिका बुद्धिवादीच होती. विज्ञानवादी समाज साकार करणे हाच या भूमिकेचा ध्येयवाद होता. प्रमोद वाळके म्हणतात, “डॉ. अक्रम पठाण यांनी कवितेतील विद्रोह सांगताना, मुस्लिम स्त्रियांच्या संघर्षाविषयी समीक्षा करताना, जोतीबा फुले, मौलाना अबूल कलाम आझादांच्या व्यक्तिमत्त्वावर विचार व्यक्त करताना मुस्लिम समाजाच्या नव्या क्षितिजाचे सिद्धान्तन केले आहे. अक्रमच्या स्वप्नातून प्रगट झालेला हा भास नव्हे; हा त्यांचा ध्यास आहे. मुस्लिम समाजामध्ये समतामूलक जीवन सिद्ध व्हावे हे त्यांचे लक्ष्य आहे.

मंजिल आहे ही त्यांची.” (मुस्लिम समाजाचे नवे क्षितिज, पृ. १३ – १४)डॉ. अक्रम पठाण हे प्रखर पुरोगामी विचाराचे लेखक होते. विज्ञानवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी जीवनदृष्टीचे समीक्षक होते. ‘मुस्लिम मराठी साहित्य’ (२०१४), ‘मुस्लिम समाजाचे नवे क्षितिज’ (२०१४), ‘संग्रामकवी अमरशेख’ (२०१५), ‘यशवंत मनोहरांची युद्धकविता’ (२०१८), ‘कवितेची युद्धशाळा’ (२०२०), ‘सभ्यतेचा गौरव : हिफजूर रहेमान’ (२०२०) असे त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. ‘मुस्लिम मराठी कवितेचा अग्निप्रवाह’ हा त्यांचा महत्त्वाचा समीक्षाग्रंथ आता येतो आहे. काही महत्त्वाची संपादनेही त्यांनी केली आहेत. डॉ. यशवंत मनोहर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘बदलते विश्व आणि साहित्यापुढील आव्हाने’ (२०१८) या गौरवग्रंथाचे संपादन आम्ही दोघांनी मिळून केले आहे. तसेच ‘संविधाननिष्ठ आंबेडकरी चळवळच सर्वांच्या हिताची’ (२०२०) हे त्यांचे स्वतंत्र संपादन आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ मधून त्यांनी सदरलेखनही केले आहे.

या सर्वच प्रकारच्या लेखनांमधून आणि संपादित ग्रंथांमधून त्यांच्या विज्ञानवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी जीवनदृष्टीचे अत्यंत उत्कट दर्शन घडते.डॉ. अक्रम पठाण यांची प्रागतिक जीवनदृष्टी डॉ. यशवंत मनोहर यांच्या बुद्धिवादी कार्यशाळेत घडत होती. मनोहर सरांची विभागात अध्यापनाच्या रूपाने सुरू असलेली औपचारिक कार्यशाळा संपली की सायंकाळी पाच – साडेपाचला सरांच्या घरी मैफल जमायची. त्यात वामन निंबाळकर, भाऊ पंचभाई, डॉ. प्रकाश खरात आणि इतरही साहित्यिक असत. आम्हा विद्यार्थ्यांनाही सर आवर्जून बोलावून घेत. त्यात मी, डॉ. प्रभंजन चव्हाण, डॉ. इंद्रजित ओरके, डॉ. अक्रम पठाण, डॉ. सर्जनादित्य मनोहर, डॉ. मनोहर नाईक, डॉ. अनमोल शेंडे, डॉ. रमेश राठोड, डॉ. योगेश राठोड, डॉ. प्रमोद अणेराव, डॉ. शंकर मोटघरे असे अनेक विद्यार्थी असत.

सेवानिवृत्तीनंतर विद्यापीठ प्राध्यापक निवास सरांना सोडावे लागेल. त्यानंतर ही वैचारिक मैफल ‘लुम्बिनी’ नावाच्या सरांच्या मालकीच्या घरात सुरू झाली. प्रमोद वाळके हे लुम्बिनी’च्या मैफलीचे सदस्य आहेत. या मंडळींमध्ये साहित्य, समाज, राजकारण, धर्म, संस्कृती अशा अनेक विषयांवर चर्चा चाले. या चर्चेने आणि सरांच्या वर्गातील प्रत्यक्ष अध्यापनाने आम्हा विद्यार्थ्यांना साहित्याकडे आणि मानवी जीवनातील प्रश्नांकडे पाहण्याची एक नवी विचक्षक दृष्टी दिली. ही दृष्टी डॉ. अक्रम पठाण यांच्या लेखना-चिंतनात दिसते. या संदर्भात डॉ. पठाण म्हणतात, “१९९५ पासून माझ्या जीवनाची जडणघडण ‘डॉ. यशवंत मनोहर वैचारिक मिलिटरी स्कूल’मध्ये झाली. या ‘स्कूल’चे प्रशिक्षण फार वेगळे आहे. या ‘स्कूल’मध्ये माणसांच्या हिताची बाजू घेण्याचे प्रशिक्षण दिले जाते.” ते पुढे म्हणतात, “एम. ए. भाग १ मध्ये मी वर्गात शेवटच्या बाकावर बसत होतो. सरांनी वर्गातील विद्यार्थ्यांसमोर मला म्हटले की ‘अक्रम तुझी जागा शेवटच्या बाकावर नाही.

तुझी जागा पुढच्या बाकावर आहे. त्या शब्दांनी माझ्या जीवनाची दिशा आणि स्थिती बदलवून टाकली. … प्रा. डॉ. यशवंत मनोहर सर हे माझे वैचारिक विद्यापीठ. या विद्यापीठाचा मला विद्यार्थी होता आले याचा सार्थ अभिमान आहे. त्यांच्या वैचारिक रसायनातून माझ्या वैचारिकतेला बहर आला. हा बहर कधी करपू नये याची त्यांनी सातत्याने काळजी घेतली. … माझ्या लेखणीला वैचारिक रसद सरांनी पुरविली परंतु चुकूनही माझा अंगठा मागितला नाही.” (मुस्लिम मराठी साहित्य, भूमिका, पृ. ८) ही कृतज्ञताही फार बोलकी आहे. डॉ. यशवंत मनोहरांमुळेच ते इथल्या क्रांतिपरंपरेचे अनुयायी झाले आणि प्रखर पुरोगामी जीवनदृष्टीचा एक विचारवंत लेखक म्हणून महाराष्ट्राच्या वाङ्मयविश्वात ते सुपरिचित झाले.डॉ. अक्रम पठाण यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे मूलभूत वाङ्मयीन अवस्थांतर त्यांच्या साहित्याच्या रूपाने उभा महाराष्ट्र आज पाहतो आहे.

या वाङ्मयीन आणि वैचारिक अवस्थांतराची बिजे त्यांच्या संविधाननिष्ठेत आहेत. डॉ. अक्रम पठाण यांच्या ‘मुस्लिम मराठी साहित्य’ या ग्रंथाच्या ‘मुस्लिम मराठी साहित्यातील आधुनिकतेचे पडघम’ या मथळ्याच्या प्रस्तावनेत डॉ. यशवंत मनोहर म्हणतात, “अक्रम भारतीय संविधानाला एकूणच मानवी जीवनाचे क्रांतिकारक विधान मानतो. तो सर्व मार्गदर्शक तत्त्वांची, मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची पौर्णिमा संविधानाच्या प्रीॲम्बलमध्ये पाहतो आणि धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे या निखळ क्रांतीच्या नजरेने किंवा या आधुनिक मूल्यांच्या मनाने तो संपूर्ण संविधान वाचतो.” (पृ. १२) या वाचनाने डॉ. अक्रम पठाण यांना भोवतीच्या प्रश्नांचे वाचन आणि पुनर्वाचन करण्याची नवी दृष्टी दिली. ही दृष्टी सर्वकल्याणकारी स्वरूपाची आहे. मानवत्वाच्या कल्याणासाठी ती तडजोड करीत नाही. ही दृष्टी निखळ बुद्धीप्रामाण्यवादी आशयाची आहे. ही प्रखर विज्ञानवादी आणि प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी जीवनदृष्टी डॉ. अक्रम पठाण यांच्या साहित्यात आहे.

म्हणून याच प्रस्तावनेत डॉ. यशवंत मनोहर पुढे लिहितात, “मी अक्रममध्ये उद्याचा अझगर अली इंजिनिअर पाहतो. फकरुद्दीन बेन्नूर पाहतो. राजन खान पाहतो आणि विशेष म्हणजे हमीद दलवाई पाहतो; त्याच्यात मला मला असे काही पहावेसे वाटणे यातच काही गोष्टी आलेल्या आहेत. हा त्याचा गौरव नव्हे पण ही अपेक्षा मात्र नक्कीच आहे आणि तो या अपेक्षेला त्याच्या प्रत्यक्ष जीवनात चालते-बोलते रूप देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करील ही खात्री मला आहे.” (पृ. २३) ही खात्री फुले-आंबेडकरवादी चळवळीला आणि महाराष्ट्रालाही होती. परंतु ऐन वाङ्मयीन उमेदीच्या काळात काळाने डाव साधला आणि एक अफाट बौद्धिक सामर्थ्याचा आणि मोठ्या शक्यतांचा डॉ. अक्रम पठाण नावाचा परिवर्तनवादी विचारवंत काळाच्या पोटात गडप झाला. मी त्यांच्या परिवर्तनवादी प्रतिभेला विनम्र आसवांजली अर्पण करतो.
_______________________________
✒️लेेखक:-डॉ. प्रकाश राठोड, नागपूर
चलभाष : ९९२३४०६०९२