हुलेवाडी येथे वीज अंगावर पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू व एक जण गंभीर जखमी

39

✒️लोहा प्रतिनिधी(शुभम बेद्रे)

लोहा(दि.10मे):-शेतात काम करताना अचानक वीज कोसळून मूकबधिर आईवडिलांचा आधार असणाऱ्या १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सावरगाव परिसरातील हुलेवाडी येथे शेतामध्ये कांदे काढण्याचे काम चालू असताना घडली.
रविवारी दुपारी १.३० वाजता शेती मालक बालाजी दिगंबर हाके यांचा गट नंबर १५० मध्ये सदर घटना घडली.यामध्ये सोनेराव संजय चव्हाण (वय १७ वर्ष) रा.चिखली तांडा.राणीसावरगाव ता.गंगाखेड जिल्हा.परभणी या मुलाचा मृत्यू झाला. तसेच विष्णू उत्तमराव राठोड रा.डोंगरगाव तांडा ता.लोहा जी. नांदेड.(वय ३५) हे गंभीर जखमी झाले . हुलेवाडी ग्रामस्थांनी उभ्या पावसात जखमींना शंकरराव चव्हाण जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हुलेवाडी परिसरात नातेवाईकांचा मन भेदून टाकणारा आक्रोश कानी पडत होता. यावेळी धीरज हाके यांनी पोलिस स्टेशन माळाकोळी येथे रीतसर तक्रार दाखल केली. पोलीस स्टेशनचे जमादार व तलाठी अजय कासले यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला व. तहसीलदार परळीकर यांना कल्पना देण्यात आली. लोहा शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शेव विच्छेदन करून सायंकाळी ६.३० नातेवाईकांच्या हाती मृतदेह सुपूर्द करण्यात आला. लवकरात लवकर मृत तरुणाच्या नातेवाईकांस आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा ग्रा. प.सदस्य गोविंद कोपनर यांनी प्रशासनाकडे केली. अशा या कठीण प्रसंगी हुलेवाडी ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न दिसून आले.
सर्व सावरगाव पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.