ईद-उल-फितर : विश्वशांतीची रुजवण !

29

(रमजान ईद विशेष)

रमजान ईद अर्थात ईद-उल-फितर होय. हा मुस्लिम बांधवांचा एक महत्त्वाचा धार्मिक सण आहे. याला ईद-उल-सगीर असेही म्हटले जाते. ईद उल फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. तर फितर म्हणजे दान करणे. अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फितर हा मुस्लिम शरीयत कायद्यातील मापदंड आहे. पवित्र रमजान महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत दररोज उपवास म्हणजे रोजे पाळले जातात. यामध्ये सूर्योदयापूर्वी अन्नग्रहण केले जाते. सूर्यास्तापर्यंत उपवास पाळला जातो. सूर्यास्ताला प्रार्थना झाल्यावर उपवास सोडला जातो. या काळात पवित्र कुराण ग्रंथाचे वाचन व चिंतन-मनन केले जाते. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाहच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात. ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिलावर्गात मोठा उत्साह दिसून येतो.

पहिल्या दुसऱ्या रोजापासून घरात त्या शेवया तयार करायला सुरुवात करतात. मात्र, हे चित्र आता केवळ ग्रामीण भागातच दिसते. शहरी भागात सगळ्याच गोष्टी तयार मिळायला लागल्या आहेत. ईदला आपल्या घराला रंगरंगोटी करून आप्तजनांना आपल्याकडे शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित करतात. रमजान ईदचा दुसरा दिवस हा ‘बासी ईद’ नावाने ओळखला जातो.
ईद-ए-मिलाद म्हणजे अल्लाहचे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस. जगभर ‘ईद-ए-मिलादुन्नबी‘ हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुस्लिम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह. ईद उल फितर ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे.

याउलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्म इ.स.५७१ मध्ये सौदी अरेबियाच्या मक्का या गावी झाला. जन्माअगोदरच महंमद पैगंबर यांचे पितृछत्र हरपले होते. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांच्या मातोश्रींचा पण मृत्यू झाला. लहानपणीच माता-पित्याचे छत्र हरपलेल्या अशा या एकाकी पडलेल्या बालकाचे त्याच्या चुलत्याने संगोपन केले. बालपणापासूनच शिक्षणापासून वंचित राहिलेला हा बालक धर्माचा संस्थापक बनला. आपल्या जीवनकाळात हजरत मोहंमद यांनी समस्त मानवजातीला उदारता, समता, विश्वबंधुत्व, विश्वशांती, सामाजिक न्याय आणि समरसतेची शिकवण दिली. त्यांची शिकवण केवळ काही विशिष्ट जाती धर्मापुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी होती.

हजरत महंमद पैगंबर यांच्या शिकवणीप्रमाणे रमजान ईदच्या दिवशी विशेष प्रार्थना केली जाते. या प्रार्थनेला ‘सलत’ असे म्हटले जाते. यामध्ये दोन भाग असतात. प्रार्थना सामान्यत: गावातील किंवा गावाबाहेरील मोठ्या मोकळ्या पटांगणावर केली जाते. या जागेला ‘ईदगाह’ असे म्हटले जाते. प्रार्थना संपल्यावर ती चालविणारा मुख्य इमाम ‘खुत्बा’ पढतो. खुत्बा म्हणजे कर्तव्यांचा उपदेश. या उपदेशानंतर सर्वजण अल्लाहकडे आपल्या सर्वतोपरी कल्याणासाठी मागणे मागतात, ज्याला ‘मुनाजात’ असे म्हणतात. ते झाल्यावर इमाम ‘आमीन’ म्हणजेच ‘शांती असो’ असे म्हणतात. हा प्रार्थनेचा कार्यक्रम संपल्यावर सर्वजण एकमेकांना आलिंगन देऊन भेटतात आणि ‘ईद मुबारक’ अर्थात ‘ही ईद तुमच्यासाठी आनंददायी असो!’ असे म्हणून एकमेकांना शुभेच्छा देतात. नंतरच्या दिवसभरात परिचितांसह मेजवान्या, मित्र नातेवाईकांच्या भेटीगाठी, असा आनंदोत्सव केला जातो.

या ईदच्या शुभ पर्वाला गरीब, अनाथ मुस्लिम बांधव आनंदापासून वंचित राहत असेल तर ती ईद मुस्लिम धर्मासाठी आनंदाची नाही, असे मानले जाते. मुस्लिम धर्मातील तळागाळातील व्यक्तीला ईदच्या पावन पर्वाचा आनंद घेता यावा, यासाठी जकात व फितराची तरतूद मुस्लिम शरीयत कायद्यामध्ये करण्यात आली आहे. जकात हे ईदच्या आधी दिले जाते. कारण त्यांनाही वर्षांतून एकदा येणार्‍या या महान पर्वाचा – ईदचा आनंद सर्वधर्मीयांही लुटता यावा, अशी पवित्र व आपुलकीची भावना त्यात दिसून येते.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे सर्व मुस्लिम बंधुभगिनींना, “ईद मुबारक” !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री निकोडे कृष्णकुमार गुरुजी(मराठी-हिंदी साहित्यिक तथा संत-लोक साहित्याचे अभ्यासक.)मु. एकता चौक – रामनगर, गडचिरोली.जि. गडचिरोली, व्हा.नं. ९४२३७१४८८३.